Wednesday, 18 May 2022

ठाणे एस टी कंत्राटी चालकांना दोन महिन्याचा दिलासा !

ठाणे एस टी कंत्राटी चालकांना दोन महिन्याचा दिलासा !


भिवंडी, दिं,१९, अरुण पाटील (कोपर) :
            राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून  संप पुकारला होता. तर मार्च महिन्याच्या अखेरीस कर्मचाऱ्यांतर्फे हा संप मागे घेण्यात आला. मात्र, संपाच्या काळात प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून  ठाणे एसटी विभागामार्फत ७६ कंत्राटी चालकांची भरती करण्यात आली होती. सध्या एसटी सेवा पूर्ववत झाली असून या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार होती. मात्र, ठाणे एसटी विभागाला चालकांची गरज असल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मे व जून महिन्यांची मुदतवाढ दिल्याने  सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
            मागील वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात पुकारलेला संप एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यशासनाशी चर्चा करून मार्च महिन्याच्या अखेरीस मागे घेतला. मात्र या दरम्यानच्या कालावधीत राज्यभरात एसटीवर अवलंबून असणाऱ्या लाखो प्रवाशांचे हाल झाले. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी राज्य शासनाने तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी चालकांची नेमणूक केली. आहे.या अंतर्गत ठाणे एसटी विभागाच्या ठाणे १ आणि २, भिवंडी, कल्याण, वाडा, विठ्ठलवाडी, शहापूर, आणि मुरबाड या आठही आगारांमध्ये कंत्राटी पद्धतीने ७६ वाहनचालकांची नेमणूक केली आहे .                 
           ठाणे एसटी विभागात एकूण कायमस्वरूपी ५६५ चालक असून चालक कम वाहकांची संख्या ९६३ इतकी आहे.ठाणे विभागातून ५२५ गाडय़ा नियमित स्वरूपात धावत आहेत. बससेवा पूर्वपदावर आल्याने कंत्राटी बस चालकांना रोजगार जाण्याची भीती होती. मात्र ठाणे एसटी विभागाचा आवाका पाहता अधिकच्या चालकांची सध्या गरज आहे. हीच बाब लक्षात घेऊन कंत्राटी चालक म्हणून रुजू करण्यात आलेल्या चालकांना मे आणि जून महिन्यापर्यंत कामावर कायम ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
              ठाणे एसटी विभागात रुजू करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची शहरांतर्गत धावणाऱ्या बसवर नेमणूक करण्यात आली आहे. या चालकांची केवळ शैक्षणिक अहर्ता पूर्ण नसल्याने त्यांची एसटी महामंडळात नेमणूक होऊ शकत नव्हती. मात्र त्यांना अवजड वाहनांसह विविध वाहने चालविण्याचा चांगला अनुभव असल्याने त्यांची कंत्राटी चालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच या चालकांद्वारे अद्याप एकही अपघात झाला नसल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.

No comments:

Post a Comment

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन !

१२ जानेवारी रोजी कुणबी समाजोन्नती संघ चिपळूण शाखेच्या वतीने युवकांना शेतीविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन ! प्रतिनिधी  - निलेश को...