पालघर येथे लेट्स री-सायकल प्रोजेक्ट अंतर्गत शालेय विद्यार्थिनींना सायकल वाटप !!
मुंबई, (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :
कोकण कला व शिक्षण विकास संस्था गेली ५ वर्षे लेट्स रिसायकल - हा प्रोजेक्ट मैलोनमैल चालत शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवत असून आज पर्यंत शेकडो विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी होणारी पायपीट थांबवण्यात संस्था यशस्वी झाली आहे. २०१८ साली सुरू झालेल्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शहरातील जुन्या सायकल जमा करून, त्या व्यवस्थित करून खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना मोफत देण्याची केलेली सुरवात.
मुंबई - पुणे सारख्या शहरातील मुले बऱ्याचदा ६ महिने ते १ वर्ष वापरलेली सायकल एका कोपऱ्यात उभी करतात आणि नवीन सायकल साठी हट्ट धरतात, पालकांची परिस्थिती चांगली असल्याने आईवडील मुलांचे हट्ट पुरवतात. पण खेडेगावातील, आदीवासी पाड्यातील मुलांना जुनी सायकल मिळणे सुद्धा काठीण असते. एकतर वेळेत वाहने उपलब्ध नसतात त्यात गाडीचे तिकीट घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नसते अशात विद्यार्थी शाळा सुटल्यावर भर उन्हात ७-८ मैल चालत येतात हे कुठेतरी थांबले पाहिजे या दृष्टिकोनातून आणि सायकल मिळाल्यास वाचलेले २ तास वेळ अभ्यासासाठी वापरता येईल या उद्देशाने या उपक्रमाची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरुवात झाली होती ती आता पालघर या ५ व्या जिल्ह्यात येऊन पोहोचली आहे.
आज पालघर येथील एस.के. पाटील विद्यामंदिर, माकूणसार, आगरवाडी येथील ११ मुलींना छोटेखानी कार्यक्रमात सायकल वाटप करण्यात आल्या यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अशोक गोलाड आणि सुरेश कोलेकर, प्रगती भोने, प्यारेलाल भाडणे, पराग पाटील, जीवन बेलकर, मनीषा चौधरी आदी शिक्षक तर स्वाती चौधरी, संयोग मोहिते आणि निलेश गुरखा हे शिक्षकेतर कर्मचारी सह संस्थेचे सुरज कदम, प्रीती पांगे, सचिन धोपट, सुविधा चव्हाण, साक्षी पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक श्री.अशोक गोलाड यांनी शाळेच्या वतीने कोकण संस्थेचे आभार मानले आणि कोकण संस्थेच्या माध्यमातून मिळालेल्या सायकलचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनि अभ्यासातील गुणसंख्या नक्की वाढवतील असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर भविष्यात संस्थेने शाळेत सायकल बँक सुरू करून ग्रामीण विद्यार्थ्यांना खूप मदत करावी अशी विनंती केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि संस्थेच्या उपक्रमांची माहिती संस्थेचे पालघर जिल्हा प्रमुख अजित दळवी यांनी केले तर सुरेश कोलेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment