कल्याण तालुक्यातील फळेगाव येथील कट्टर शिवसैनिक कृष्णा जाधव काळाच्या पडद्याआड !!
"ह.भ.प. कृष्णा जाधव" यांच्या निधनाने फळेगाव, टिटवाळा, कल्याण परिसरात शोकाकुल वातावरण
टिटवाळा, (संदीप शेंडगे) -: संपूर्ण कल्याण ग्रामीण तालुक्यातील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असणारे ह.भ.प. कृष्णाजी जाधव यांचे आज दिनांक २८ मे रोजी सकाळी अल्पशा आजाराने कळवा येथे रुग्णालयात उपचार घेत असताना दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
मागील आठवडाभरापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा होत आहे असे वाटत असतांनातच शनिवारी सकाळी ११:१५ घ्या सुमारास हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्रकार उमेश जाधव, माणिक जाधव व दिपक जाधव हे तीन मुलगे व एक मुलगी, पत्नी यांच्यासह नऊ नातवंडे, सुना आणि दोन भाऊ, आठ पुतणे व दोन पुतण्या असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
आपल्या युवा अवस्थेत १९८० सालापासून त्यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला तो शेवटपर्यंत खाली ठेवला नाही. एक कट्टर शिवसैनिक म्हणून कृष्णा जाधव यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने एक कट्टर शिवसैनिक काळाच्या पडद्याआड गेला असल्याचे मत अनेक शिवसैनिक व कार्यकर्ते व्यक्त करत आहे.
तालुक्यातील फळेगांव येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली ती त्यांच्याच प्रयत्नामुळे. त्यावेळी माजी कामगारमंत्री साबीर शेख व त्यांच्यावर हल्ला देखील झाला होता. तो मोठ्या हिमतीने कृष्णा जाधव यांनी परतल्याच्या आठवणी यावेळी भावनिक होत शिवसैनीकांनी जाग्या केल्या. या हल्ल्यात जाधव यांना गंभीर दुखापत देखील झाली होती.
ह.भ.प. कै. कृष्णा जाधव यांनी अध्यात्मिक वारसाही जोपासला होता. वारकरी संप्रदायाचे ते अनुयायी होते. आळंदी दिंडी असो की त्र्यंबकेश्वर दिंडीत प्रत्येक वेळी त्यांचा महत्वाचा सहभाग असायचा.
त्यांच्या जाण्याने शिवसेनेचे व वारकरी संप्रदायाचे मोठे नुकसान झाले असून या दुःखातून सावरण्याची आम्हाला तसेच त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळो अशी भावना यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा वारकरी संप्रदाय मंडळीने हरीनामाच्या जयघोषात फळेगाव येथील निवासस्थानातून काढली. त्यांच्यावर सांयकाळी येथील स्मशानभूमीत विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील सामाजिक, राजकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी ६ जून रोजी गंगा गोरजेश्वर देवस्थान मठ येथे संपन्न होणार असून शेवटचा उत्तर कार्याचा म्हणजेच तेराव्याचा कार्यक्रम ९ जून रोजी राहत्या घरी फळेगांव येथे संपन्न होणार आहे.
No comments:
Post a Comment