Friday, 20 May 2022

मंडणगड तालुक्यात पुन्हा अवकाळी बरसला ; शेतकऱ्यांची तारांबळ !!

मंडणगड तालुक्यात पुन्हा अवकाळी बरसला ; शेतकऱ्यांची तारांबळ !!


मंडणगड, गणेश नवगरे : पालवणी गोसावीवाडी गुरुवारी मध्यरात्री कोसळल्या मुसळधार अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली, मान्सूनपूर्व नियोजनाचे काम सुरु असतानाच मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी जनावरांच्या वैरणीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हापूसचेही अपरिमित नुकसान झाले असल्याने आंबा बागायतदाराना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. अवकाळी पावसादरम्यान वीजपुरवठाही खंडित झाला होता त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेच्या अडचणींमध्ये भर पडली. 
 
काल दिवसभर पावसाळी वातावरण होते. सायंकाळच्या वेळेत काही ठिकाणी अवकाळी पावसाने सुरवात केली होती. मात्र त्यात तितकासा जोर नव्हता. काही वेळातच  पाऊस पूर्णपणे थांबल्याने शेतकरी निर्धास्त झाले होते आज तरी कोसळणार नाही अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र मध्यरात्री अचानक अवकाळी पावसाने जोरदार बरसायला सुरवात केली आणि शेकऱ्यांची तारांबळ उडाली. पाऊस कोसळू लागल्यावर शेतकऱ्यांनी झोपेतून उठून उघड्यावर ठेवलेली जनावरांची वैरण, सरपण आदी सुरक्षितस्थळी हलविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच दरम्यान वीजपुरवठा खंडित होऊन अंधाराचे साम्राज्य पसरल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला 
 
अवकाळी पावसामुळे या वर्षी हापूस पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गतमहिन्यात २७ आणि २८ च्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे हापूसची पुरती वाट लागली होती. त्यामुळे आंबा बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. त्यातून जो काही हापूस वाचला तो आता काढणीसाठी आला होता मात्र गुरुवारी मध्यरात्री झलेल्या अवकाळी पावसामुळे उरल्या-सुरल्या हापूसचे मोठे नुकसान झाले असल्याने आंबा बागायतदारांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. 
 
काल रात्री झालेल्या पावसाबरोबर सोसाट्याचा वाराही पिंगा घालत होता त्यामुळे काही गावांमध्ये वृक्ष उन्मळून पडणे, घरांची, गोठ्याची कौले उडवून जाणे अश्या घटना घडल्या आहेत. कोरोनाच्या संकटांतून हळू हळू सावरू पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठी आता निसर्ग लागल्याचे चित्र सध्या कोकणात पहावयास मिळत आहे. 

No comments:

Post a Comment

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ...

धम्माल विनोदी नाटक "वरचा मजला रिकामा" रंगमंचावर ... ** १२ जानेवारी २०२५ रोजी रात्रौ.ठिक ७:३० वाजता साहित्य संघ नाट्यगृह चर्नीरोड य...