मोहने येथील एन. आर. सी. प्ले ग्राउंड मैदान मुलांना खेळण्यासाठी बंद !!
"अदानी समूहाच्या निर्णयाने कामगार वर्गात संतापाची लाट"
मोहोने, संदीप शेंडगे : गेल्या १३ वर्षापासून बंद असलेल्या एन आर सी कारखान्याची संपुर्ण जमीन अदानी समूहाने विकत घेतली आहे. आणि याच आदानी समूहाने कामगारांच्या मुलांना खेळण्यासाठी असलेल्या एन आर सी प्लेग्राउंड मैदान बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून एन आर सी ग्राउंड वर कोणत्याही विद्यार्थ्यास अथवा कामगारांच्या मुलांना प्रवेश दिला जात नसून अदानी समूहाचे सुरक्षारक्षक कामगारांच्या मुलांना खेळण्यापासून मज्जाव करीत आहेत.
एन आर सी कंपनी स्थापन झाल्यानंतर कामगार वसाहती मध्ये राहत असलेल्या कामगारांच्या मुलांकरिता सुसज्ज अशी एन आर सी शाळा निर्माण करण्यात आली, याच शाळेला लागून असलेल्या एन आर सी प्ले ग्राउंडवर कामगार वसाहतीं मध्ये राहत असलेले शेकडो विद्यार्थी क्रिकेट, बास्केट बॉल, फुटबॉल, कबड्डी, खो- खो, कब्बडी, यांसह विविध खेळ खेळत असत.
शाळा महाविद्यालयांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असून या मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते त्याचप्रमाणे या मैदानावर अनेक मोठमोठे आमदार चषक, महापौर चषक, खासदार चषक यांसारखे सामने देखील झालेले आहेत. परंतु आदानी प्रशासनाने अचानक मैदानावर खेळण्यास मुलांना बंदी केल्याने मुलांमध्ये तसेच कामगार वर्गात संतापाची लाट पसरली आहे. ज्या ग्राउंड वर मोठे मोठे सामने भरवणारे राजकारणी मंडळी सुद्धा यावर एक शब्द देखील बोलायला तयार नाहीत. एन आर सी कारखाना गेल्या १३ वर्षापासून बंद असून कामगार आपली कायदेशीर देणे मिळण्याकरिता न्यायालयात आव्हान देत आहे. तारखांवर तारखा पडत असून अद्याप कामगारांना न्याय मिळाला नसून कामगार न्यायापासून उपेक्षित राहिला आहे.
आम्हाला आमची कायदेशीर देणी देऊन टाका आम्ही येथील घरे खाली करून निघून जातो. परंतु जोपर्यंत आम्ही येथील वसाहतीमध्ये राहत आहोत तोपर्यंत आमच्या मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राउंड बंद करू नये असे येथील कामगारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
खेळण्यासाठी ग्राउंड बंद केल्याने कामगारांचा कैवार घेतलेल्या युनियन मात्र एन आर सी ग्राउंड मैदान खेळण्यासाठी बंद झाले तरी आपली भूमिका स्पष्ट करायला तयार नाहीत. मग कामगारांचे खरे कैवारी कोण असा प्रश्न कामगारांना पडला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment