Tuesday, 26 July 2022

*२६ जुलै २००५ प्रलयाची रात्र*

*२६ जुलै २००५ प्रलयाची रात्र* 
-----------------------------------------
👉२५ जुलै दिवसभर पावसाने धुतले घरात १ फुट पाणी भरले,
ते पाणी ऊपसताना रात्री आठ वाजले,
स्वयंपाक झाला नाही जे मिळेल ते खाऊन घरातले दमल्याने चांगलेच सुस्तावले.


👉 मी जागाच होतो, पाऊस सूरूच होता, रात्री १२ नंतर अंदाजे १ वाजले असावेत, भिंतीच्या कोपऱ्यातून पाण्याचे ओघळ वहात वहात अंथरूणाकडे येऊ लागले. 


च्यायला.....

मी खीडकी उघडली बाहेर पाण्याची पातळी भयानक वाढली होती, दरवाजे पाण्याने फुगल्याने घट्ट झाल्यामुळे बाहेरचे पाणी कारंजा सारखे दाराच्या फटीतून आत येत होते.


नशिब...
मी दार उघडले नाही, नाहीतर पाण्याचा सुमारे १ ते १.५ फुटांचा लोंढा घरातील झोपलेल्यांच्या अंगावर आला असता ; घरातील सर्वांना पटापट आवाज देऊन उठवले, काही सेकंदात अंथरूणे ऊचले पर्यंत घरात घोटाभर पाणी भरले देखील, घरात पत्र्याची खाट होती त्यावर जागा धरून सगळे बसले, जमेल तेवढे सामान किचन कट्टा व माळ्यावर ठेवे पर्यन्त पाणी सुमारे २ फुटावर गेले ; देव्हारा देव्हाऱ्यातील 
देवांसकट पाण्यावर तरंगु लागला, खाट जवळपास बुडालीच.


पळा.... पळा...

घरातले सगळे भारंबेच्या गच्चीवर पळाले, सगळं तसंच टाकून, मी थांबलो एकटाच, वडील चीडले 
व मला गच्चीवर चलण्याचा आग्रह करू लागले, मी घरातच थांबलो.


*पाणीच पाणी......*

बाहेरचे व आतले पाणी एक लेवल झाल्यावर दार उघडले तेही घट्ट झाल्यामुळे उघडत नव्हते,
बाहेर अंधार व लोकांचा गलबलाट, बाहेर जवळपास 
छाती येवढे पाणी भरले होते, उंच असलेल्या समोरच्या राममंदिराच्या आत गुडघाभर पाणी होते, 


*भयानक परिस्थिती...*

कोणाला कोणाकडे बघायला वेळ नाही, चांगल्या करंगळी येवढ्या जाड व वितभर लांब गोम घरात घुसत होत्या मिळाल्या तेवड्या मारल्या, पाण्यातले साप घरात घुसून ये यासाठी हातात दांडके घेऊन पहारा देत होतो,

केवळ खायाचेच नाही तर त्याचे देखील वांदे झाले होते, बाथरूम व टाॅयलेट पाण्याने भरल्याने पोटातली कळ दाबून धरण्याशिवाय पर्याय नव्हता, अन्नधान्य 
सगळे भिजले, कपडालत्ता, जिवलाऊन जमा केलेल्या वस्तू, पुस्तके, सगळे पाण्यात तरंगत होते,

पिण्यासाठी पाणी नाही, अन्नधान्य भिजल्याने व वाहून गेल्याने उपासमार, साधा चहा करावा तर कोठे करायचा सगळंच पाण्यात

बाहेर बर्‍याच जणांच्या घरातील वस्तू बाहेर तरंगत होत्या, पुढील दोन दिवस पाण्याचे तांडव सुरू होते,
पाणी घटण्याऐवजी वाढतच चालले होते, समुद्राला भरती असल्याने पाणी उलटे मागे फिरत होते, पावसाचे थैमान सूरूच होते, सकाळी देखील घरात 
पाणी होते 


तिसर्‍या दिवशी.... तर

*कहरच झाला....*

धरण फुटले पळा पळा पळा...
कधी फुटले, कुठे फुटले, कसे फुटले, कोणाला काहीच माहीत नव्हतं, 
पाणी आलं..... जवळ आलं...... रामबागेत आलंं.... जो तो पळतोय, लोकांच्या ओरडण्याचा आवाज लाटांसारखाच पाण्यासारखाच भासायचा.  ....

*उपासमार व आर्थिक मंदी*

महीना अखेर असल्याने पैसा नाही, थोडाफार होता त्यात खाणार काय ? दुकानं पाण्यात बुडालेली, जी सुरक्षीत होती त्यात साहीत्यच नव्हतं, एखादे बीस्कीट पुडा मिळाला तर मिळाला,घरातील जवळपास ८०% जीवनोपयोगी वस्तू नाश पावलेल्या , डोक्यावरचं छप्पर सोडलं तर बाकी सगळं नव्याने करावे लागणार, ८ किलो कापसाची गादी पाण्यात भिजल्याने ८० किलो पेक्षा जड झालेली तीला उचलून कचऱ्यात टाकण्यासाठी ५ माणसे लागली. 

माणसांची व जनावरांची प्रेते पुढे महीनाभर वालधुनी नदी, ऊल्हास नदी व खाडीत सापडत होती, पाण्याचा सडलेला उग्र वास व त्यानंतर पसरलेली रोगराई भयानक तांडव घालत होती, लेप्टोच्या साथीत हजारो जण दगावले, कुटुंबेच्या कुटुंबे उभ्या संसारासकट पाण्यात बुडाली....

धान्य गोडाऊने तर अक्षरशः आतील धान्य भिजून फुगल्याने शटर व भिंतीस तडे जाऊन फुटली होती,
एका साखरेच्या गोडाऊन मध्ये तर फक्त पोतीच उरली होती. ट्रक सारखी अवजड वहाने , कार बस टुव्हीलर पूरामुळे एकमेकांच्या उरावर जावून बसले होते.

*सरकारी मदतीचे गाजर*
सरकारने ५००० रूपये वाटण्याचे जाहीर केले पण ते लोकांपर्यंत पोहचलेच नाहीत, दैवाने मारले, देवाने मारले, पोटाने मारले, सरकारने देखील मारले.

*पुनर्जन्म*
९२/९३ दंगलीत वाचलो, मुंबई बाॅम्बस्फोटात वाचलो, २६/११ दहशतवादी हल्यात वाचलो
२६ जुलै पुरात वाचलो, कोरोना साथीत वाचलो, 🙏🙏
अजून कीती व कोठे कोठे वाचणार आहे त्या विधात्यालाच माहीत 🙏



🙏💐 *श्रद्धांजली....* 💐🙏

हजारो माणसं, मुकी जणावरं, हकनाक मेली, कस्पटासारखी वाहून गेली, टीव्ही चैनल मुंबई तील मृतांचा आकडा दाखवत असताना बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, कल्याण शहाड, डोंबिवली, दिवा, या शहरातील लोकांना सर्रास विसरले होते, ...

🙏🙏  *परत नको तो क्षण*  🙏🙏

पी. बी. कुंभार
उपसंपादक 
सा. सरळ बातमीदार
+91 81042 00316

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...