*विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा विरोधकांना इशारा*
मुंबई, अखलाख देशमुख, दि ५ - शिवसेनेच्या नादाला लागल्यास विरोधकांना नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला संबोधित करताना दिला.
शिवसेना मेळाव्याला येणाऱ्या काही शिवसैनिक महिलांना नाशिक येथे अश्लिल हावभाव करून त्यांचा विनयभंग करणाऱ्या विरोधकांना महिला शिवसैनिकांनी अद्दल घडवली. त्या महिला शिवसैनिकांचे अभिनंदन करताना विरोधकांना दानवे यांनी हा इशारा दिला.
सामान्य जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने केलेल्या दिवाळी पॅकेजमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या पॅकेजसाठी एक रुपयाही न घेता हे पॅकेज मोफत द्यावे आणि थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करावे. तसेच या पॅकेजची घोषणा करण्यापूर्वी निविदा काढली त्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली.
शिंदे गटाचे नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या शिवणा ग्रामपंचायतीने जगप्रसिद्ध अजिंठा राज्य मार्गावरील चौकाला औरंगजेब, टिपू सुलतानचे नाव देण्याच्या प्रस्तावास दिलेल्या मंजुरीवर दानवेंनी टीका केली.
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था जपणारे शिंदे गटातील आमदारच खुलेआम धमक्या,गोळीबार करायला लागलेत हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब असल्याची टीका दानवे यांनी केली.
राज्यातील शेतकरी अतिवृष्टी, पूर आदीमुळे त्रस्त आहे. बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी रुपये सरकारने दिले मात्र शेतकऱ्यांसाठी सरकारने ३४०० कोटी रुपयांची मदतीची घोषणा करूनही प्रत्यक्षात एक रुपयाचीही मदत त्यांच्या खात्यात पोहचली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा गंभीर आरोप दानवे यांनी केला. हे सरकार हे शेतकऱ्यांना रडवणारे सरकार आहे.
या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत.
विरोधकांकडे ५० खोके,५० आमदार आहेत तर आमच्याकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, असा दिवार चित्रपटातील डायलॉग मारत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.
*पोलिसांनाही दिला इशारा*
नवी मुंबईतील एका पोलीस अधिकाऱ्याने शिंदे गटात येण्यासाठी एका शिवसैनिकाला एन्काऊंटर करण्याची धमकी दिली. त्या
अधिकाऱ्याला धारेवर धरताना दानवे यांनी पोलिसांना इशारा दिला. उद्या आमची सत्ता येईल हे ध्यानात ठेवून दबावाला बळी पडू नका.
No comments:
Post a Comment