Monday, 3 October 2022

सप्तशृंगी मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळीस असलेली बंदी राज्य सरकारने उठवली, त्या बाबत दिली उच्च न्यायालयाला माहिती !

सप्तशृंगी मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळीस असलेली बंदी राज्य सरकारने उठवली, त्या बाबत दिली उच्च न्यायालयाला माहिती !


भिवंडी, दिं,३, अरुण पाटील (कोपर) :
        नाशिक येथील प्रसिद्ध सप्तशृंगी मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळी देण्यास परवानगी देणार असल्याची माहिती राज्य सरकारने नुकतीच उच्च न्यायालयात दिली. मंदिराच्या आवारात पशुबळी देण्यावर बंदी घालण्याचा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला होता. या आदेशा विरोधात आदिवासी विकास संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
          पाच वर्षांपूर्वी, २०१७ मध्ये बलिदानाच्या वेळी गोळीबार होऊन १२ जण जखमी झाल्यानंतर मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळी देण्यावर बंदी घालण्यात आली होती. मंदिराच्या आवारात पशुबळी देण्यावर बंदी घालणारा उपविभागीय अधिकाऱ्यांचा २७ सप्टेंबर २०१७ रोजीचा आदेश मागे घेण्यात यावा या मागणीसाठी आदिवासी विकास संस्थेने याचिका केली होती. न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर त्यावर नुकतीच सुनावणी झाली. त्यावेळी मंदिराच्या आवारात दसऱ्याच्या दिवशी पशुबळी देण्यास परवानगी देणार असल्याचे राज्य सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
           याचिकेनुसार, प्राचीन काळापासून आदिवासी आणि इतर समुदाय बकऱ्यांचा बळी देतात. हा विधी त्यांच्या धर्माचा अविभाज्य भाग आहे. विधी पार पाडला नाही तर अघटित होईल, अशी गावकऱ्यांची धारणा आहे. संस्थेने सहा व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे दिला होता. त्यात टोकन म्हणून फक्त एका बोकडाचा बळी देण्याची विनंती करण्यात आली होती.
             बलिदानानंतर हवेत गोळीबार करण्याचीही प्रथा आहे, असे न्यायालयाला सांगण्यात आले. अशा प्रकारे गोळीबार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे नमूद करून न्यायालयाने गोळीबार करण्यास नकार दिला आहे. संस्थेच्या प्रस्तावावर सरकारने पशुबळीसाठीची प्रमाणित कार्यप्रणाली न्यायालयात सादर केली. तसेच याचिकाकर्ते या प्रमाणित कार्यप्रणालीची अंमलबजावणी करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यानंतर याचिका न्यायालयाने निकाली काढली."

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...