Monday, 3 October 2022

कांबा येथील जमीन सरकारजमा करण्याचे आदेश प्रांताधिका-यानी देऊनही तब्बल दहा दिवसांनी कल्याण मंडलाधिकां-याकडून फेरफार मंजूर, लाखो रुपयांची लाच घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप?

कांबा येथील जमीन सरकारजमा करण्याचे आदेश प्रांताधिका-यानी देऊनही तब्बल दहा दिवसांनी कल्याण मंडलाधिकां-याकडून फेरफार मंजूर, लाखो रुपयांची लाच घेतल्याचा शेतकऱ्यांचा आरोप?


कल्याण, (संजय कांबळे) : वर्षानुवर्षे कब्जेवहिवाटिला असलेल्या आणि पिक पाणी नोंदणी झालेल्या जमीनीचा मालक हा शेतकरी नसल्याचे सिध्द झाल्याने ही जमीन सरकार जमा करून त्यावर 'महाराष्ट्र शासन, अशी नोंद करण्याचे आदेश कल्याण उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी देऊन ही तब्बल १० दिवसानंतर कल्याण मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी लाखों रुपये लाच घेऊन या संदर्भात फेरफार नोंद केली, असा धक्कादायक आरोप तालुक्यातील वाघेरापाडा, नानेपाडा, आणि कांबा गावातील शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे कल्याण तहसील परिसरात खळबळ उडाली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण तालुक्यातील कांबा या औद्योगिक ग्रामपंचायत हद्दीत संजय शहा व इतर यांची शेकडो एकर जमीन आहे, यातील सर्वे नं ७७, ६४, १२५, ५२/१, ३५/१, ३५/२ या जमीनीबाबत कल्याण तहसीलदार यांना शहा हे शेतकरी नाहीत असे आदेश १९ जानेवारी २०१६ मध्ये दिले होते. त्यानुसार २० जून २०२२ रोजी कल्याण उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी सदर जमीनीवरील ७/१२ वरील नावे कमी करुन त्याजागी 'महाराष्ट्र शासन, असे नाव लावण्यात यावे असे आदेश दिले होते. तथपूर्वी या जमीनीवर वाघेरापाडा, नानेपाडा, आणि कांबा गावातील शेतकऱ्यांची पिकपाणी, अश्या नोंदी लागल्या होत्या, तसेच कित्येक वर्षांपासून त्यांच्या ताब्यात व कब्जेवहिवाटिला ही जमीन आहे, यामध्ये भातशेती, भाजीपाला, साग, लागवड केलेली आहे.


असे असताना प्रांताच्या आदेशानंतर तब्बल १० दिवसांनी कल्याण मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी सदर जमीनीच्या खरेदीखताचे फेरफार मंजूर केले. विशेष म्हणजे ही जमीन सरकार जमा झाली असताना या जमीनीचे फेरफार मंजूर झालेच कसे असा प्रश्न येथील शेतक-यांना पडला आहे. त्यामुळे मंडळ अधिकारी पवार यांनी जमीन मालकाकडून लाखोंची लाच घेऊन हे काम केले असल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी प्रांताना पाठवलेल्या तक्रार अर्जात केला आहे. यावर लहू मांगे, सुक-या मांगे, शनिवार मांगे, विठ्ठल मांगे, एकनाथ मांगे, कमल हिंदोळे, पद्माकर हिंदोळे, यांच्या सह संतोष उघडे, चितांमण उघडे, विशाखा शेंडे, लाडीबाई हिरवे, अशोक शिंगवे, बबन शिरोशे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

या संदर्भात कल्याण प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील व तहसीलदार जयराज देशमुख यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. तर कांबा गावातील शेतकरी बबन शिरोसे यांना विचारले असता ते म्हणाले, या जमिनी वर्षानुवर्षे आमच्या कब्जेवहिवाटित आहेत, तसेच यावर पीकपाणी अशी नोद आहे, शिवाय येथे भातलागवड, भाजीपाला पिके, साग लागवड केली असून या जमीनीचा मालक हा शेतकरी नाही, त्यामुळे ही जमीन सरकार जमा करण्याचे आदेश असताना तब्बल १० दिवसांनी मंडळ अधिकारी लक्ष्मण पवार यांनी लाच घेऊन फेरफार मंजूर केले, त्यामुळे यांच्या चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आता महसूल विभागातील भ्रष्टाचार उघड होईल, असे वाटते.

No comments:

Post a Comment

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ !

टिटवाळा येथे सिद्धिविनायक मंदिरात भाविकांसाठी मोफत अन्नछत्र सुरू‌ ! *शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांचा स्तुत्य उपक्रम* टिटव...