मराठवाड्याच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडली - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवे*
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि २ : - मराठवाडयातील पाण्याचा प्रश्न, शेती, पीक विमा, शेतकऱ्यांची आत्महत्या ते कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेले विविध घोटाळे आदी मराठवाडयातील प्रश्न, समस्यांवर विधान परिषदेत आक्रमकपणे भूमिका मांडत मराठवाडयातील जनतेला न्याय मिळावा यासाठी आक्रमकपणे भूमिका मांडल्याची माहिती विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज औरंगाबाद येथे त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती लक्षात घेऊन मराठवाड्यातील औरंगाबाद हिंगोली, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांसह राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर मुद्दे अधिवेशनात मांडल्याचे ते म्हणाले.
यात प्रामुख्याने औरंगाबाद येथिल शासकीय विधी महाविद्यालयाला लागणारा १०० कोटी रुपयांचा निधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांनी नाकारून एकप्रकारे मराठवाडयावर अन्याय व अडथळा निर्माण केल्याचा आरोप दानवे यांनी केला. पुरवणी मागण्यांमध्ये या निधीची तरतूद होणे गरजेचे होते असे देखील ते म्हणाले.
फडणवीस सरकारने हाती घेतलेला मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाबाबत देखील विचार करायला हवा होता, पाणी वाया न जाता मराठवाडयाला मिळाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या खुलताबाद, वेरूळ येथे मोठया संख्येने पर्यटक येत असतात.या महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या पाहता व येथील पर्यटन स्थळाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेऊन या परिसरात ट्रामा केअर सेंटर उभारण्यात यावे. यासाठी'खुलताबाद, वेरूळ येथे ट्रामा केअर सेंटर उभारणीसंबंधी मागणीही त्यांनी सभागृहात लावून धरली. औरंगाबाद मध्ये ही अधिकार नसताना वाळू ठेकेदार यांना वाळूपत्ता बदलून देण्याचं काम सत्तार यांनी केलं ते सभागृहाच्या निदर्शनास आणले.
बेकायदेशीररित्या गायरान जमीनीचे वाटप तसेच रत्नागिरी, औरंगाबाद, नागपूर अशा अनेक ठिकाणी न्यायालयाचे आदेश डावलून मनमानी पद्धतीने भूखंड, वाळूचे ठेके, कृषी उत्पन्न बाजार समितीची जमीन बेकायदेशीररित्या विकणे ही सर्व प्रकरणे पुराव्यासह सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती दानवे यांनी दिली.
राज्यात २९ लाख ३८ हजार कामगारांपैकी विदर्भात फक्त २ लाख ३८ हजार कामगार हे कार्यरत आहेत. एकट्या मुंबईत ५३ आयटी पार्क असून संभाजी नगर मध्ये ३ व नागपूरमध्ये ५ असे फक्त ८ आयटी पार्क आहेत. त्यामुळे मराठवाड्यात आयटी पार्क वाढविण्याबाबत सरकारने विचार करण्याची मागणी त्यांनी लावून धरली.
मराठवाड्यात पायाभूत सुविधा असून औद्योगिक विकास नाही. सूक्ष्म, मध्यम आणि लघु उद्योजकां विषयी विदर्भ आणि मराठवाडा अतिशय मागे आहे. केंद्रात या विभागाचे मंत्री हे महाराष्ट्राचे आहेत. या विभागाच्या अनेक योजना असून त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आदी मराठवाड्याच्या महत्वाच्या प्रश्नांवर विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी आवाज उठविला.
आजच्या पत्रकार परिषदेस माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर,अंकुश रंधे, शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे विधानसभा संघटक राजू वैद्य, तालुकाप्रमुख संजय मोटे, दिनेश मुथा, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप ,संपर्क संघटक सुनिता आऊलवार,सहसंपर्क संघटक सुनिता देव, समन्वयक कला ओझा आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment