संग्रामनगर उड्डाणपुलाच्या कामावरून विरोधीपक्षनेते अंबादास दानवेंनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर !
औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि १६ : औरंगाबाद शहरामध्ये बिडबायपास येथील संग्रामनगर उड्डाणपुलाजवळील व एम आय टी कॉलेज जवळील रस्त्याचे आणि उड्डाणपूलांची कामे ही संथगतीने सुरू आहेत. या मार्गावर वारंवार होणारे अपघात, धुळीचे साम्राज्य यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत, जनसामान्यांच्या या भावना लक्षात घेऊन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या आज ठिकाणची पाहणी केली. तसेच येथील कामाच्या संथगतीमुळे होणाऱ्या दिरंगाईमुळे संतप्त होऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले.
पुलाच्या कामामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यात खड्डे खोदून ठेवल्यानंतर ते बुजवले नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची व्यथा स्थानिक नागरिकांनी काही दिवसांपूर्वी दानवे यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार रस्त्यावर खोदकाम केलेले खड्डे त्वरित बुजवण्याची निर्देश दानवे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच या प्रलंबित कामांची माहिती घेतली.
गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरु असलेल्या रस्त्याच्या आणि उड्डणपुलाच्या कामावर दानवे यांनी संताप व्यक्त केला. रस्त्यावर खोदकाम करून माती रस्त्याच्या कडेला टाकल्यामुळे मोठं मोठे मातीचे ढिगारे उभे राहिले. त्या ढिगाऱ्याच्या अडथळ्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला असल्याचे दानवे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असून त्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना कराव्यात याबाबत सूचना देखील केल्या.
यावेळी शिवसेना पश्चीमचे शहरप्रमुख विजय वाघचौरे, उपशहर प्रमुख हरिभाऊ हिवाळे, प्रदीप जाधव यांच्यासह जागतिक बँकेचे शाखा अभियंता सुनील कोळसे, उप अभियंता एस एन.सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता एन. व्ही भंडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही.पी.बडे व एमसिजीएन च्या उद्योजकांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment