प्रजासत्ताक दिनी आम आदमी पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर ध्वजारोहण सोहळा साजरा करण्यात आला !
भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना आज गुरुवार दिनांक २६ जानेवारी, २०२३ रोजी देशभर ७४ वा "प्रजासत्ताक दिन" आनंदाने साजरा होत आहे.
आम आदमी पक्षाच्या वतीने राज्याच्या कानाकोपऱ्यात सर्व ३६ जिल्हे, ३५५ तालुके, विविध शहरे व गावागावांत ध्वजारोहणाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी, स्थानिक पातळीवरील माजी सैनिक, वरिष्ठ नागरिक, समाज सेवक, उद्योजक, पत्रकार, लेखक, क्रीडापटू, दिव्यांग, वकील, डॉक्टर व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्यात विद्यार्थी, तरुण तरुणी व स्थानिक नागरिक आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.
अत्यंत नियोजनपूर्वक केलेल्या या सर्व ध्वज वंदनाच्या कार्यक्रमांत भारताच्या संविधानाच्या "प्रस्तविकेचे" (preamble) सामूहिक रित्या वाचन करण्यात आले. हा देश सर्व घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे चालला पाहिजे, संविधानातील मूल्ये आपण सर्वांनी अंगिकारली पाहिजे तसेच समाजातील सर्व जात, भाषा, धर्म व पंथाच्या लोकांनी एकत्र येऊन संविधानाचे रक्षण केले पाहिजे अशी भावना प्रमुख पाहुणे तसेच अनेक प्रतिष्ठित पाहुण्यांनी केली. राज्यातील सर्व जिल्ह्यात एकूण ५०० हून अधिक झालेल्या ध्वजवंदनाच्या कार्यक्रमांत सुमारे ४०,००० हून अधिक नागरिक, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते तसेच सर्व पदाधिकारी यांनी हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडत मोठ्या उत्साहाने साजरा केला. यावेळेस ठिकठिकाणी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, रक्तदान शिबिरे, सायकल व मोटार रॅली चे आयोजन देखील करण्यात आले होते.
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिन साजरा केल्यामुळे आम आदमी पक्षाच्या हजारो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांत अत्यंत उत्साहाचे वातावरण असून राज्यातील जनतेचे जगण्याचे प्रश्न, शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी, बेरोजगारी, महिला सुरक्षा, इत्यादी संविधनिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करण्याची शपथ घेण्यात आली.
अखलाख देशमुख, औरंगाबाद
No comments:
Post a Comment