Wednesday, 18 January 2023

गझलेला आपले आयुष्य दिले की गझल आपली होते - 'प्रमोद खराडे'

गझलेला आपले आयुष्य दिले की गझल आपली होते - 'प्रमोद खराडे'

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दिनांक १५ जानेवारी २०२३ रोजी मकरसंक्रांतीच्या सुमुहुर्तावर दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सुरेंद्र गावस्कर सभागृहात गझल मंथन साहित्य संस्थेच्या मुंबई जिल्ह्यामार्फत मराठी गझल लेखन कार्यशाळा आणि मराठी गझल मुशायरा यांचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध गझलकार सर्वश्री डॉ. कैलास गायकवाड, श्याम खामकर आणि प्रमोद खराडे या मान्यवरांनी गझल कार्यशाळेच्या प्रशिक्षकपदाची धुरा अतिशय समर्थपणे पेलली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. सुजाता मराठे, कोकण विभाग सचिव यांनी नेमकेपणाने आणि मुद्देसूदपणे केले.

या गझल प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सिलवासासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ८० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी उपस्थित राहिले होते.  गझलमंथनच्या मुंबईत झालेल्या या पहिल्याच ऑफलाइन विनामूल्य गझल लेखन कार्यशाळेला प्रशिक्षणार्थींनी भरघोस प्रतिसाद दिला. सकाळच्या पहिल्या सत्रातील प्रशिक्षणानंतर उपस्थित प्रशिक्षणार्थींनी एक मतला आणि २ शेर लिहिण्यापर्यंत मजल मारली. त्यातील पाच निवडक प्रशिक्षणार्थींचा गझलमंथन साहित्य संस्थेमार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

दुसर्‍या सत्रात प्रमोद खराडे (पुणे) यांच्या अध्यक्षतेखाली
डॉ. कैलास गायकवाड (नवी मुंबई), शांताराम खामकर (शाम)(अहमदनगर), प्रदीप तळेकर (पुणे), पूर्णिमा पवार (रत्नागिरी), बा. ह. मगदुम (पुणे), डॉ. सुजाता मराठे (मुंबई), मानसी जोशी (ठाणे), सुनेत्रा जोशी (रत्नागिरी), ॲड. मुकुंदराव जाधव (जळगाव), यशश्री रहाळकर (नाशिक), डॉ. सुभाष कटकदौंड (रायगड), डॉ. मंदार खरे (पुणे) आणि
एस.जी. गुळवे (पालघर) हे महाराष्ट्रातील विविध भागातील सुमारे १५ नामांकित गझलकार गझल मुशायऱ्यासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या एकापेक्षा एक अशा अप्रतिम गझला सादर केल्यामुळे उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. नंदुरबारच्या विष्णु जोंधळे यांनी मुशायऱ्याचे सूत्रसंचालन उत्कृष्ट केले. संध्याकाळी उशिरापर्यंत चाललेल्या या गझल मुशायऱ्याला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली आणि वर्षाच्या सुरुवातीलाच असा देखणा आणि सुंदर कार्यक्रम दिल्याबद्दल मुंबई जिल्हा कार्यकारिणीचे सर्वच उपस्थितांनी तोंड भरून कौतुक केले. यावेळी गझल मंथन साहित्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय अनिल कांबळे पनवेल शाखेचे जिल्हाध्यक्ष माननीय रविंद्र सोनावणे, ठाण्याच्या मानसी जोशी, पुण्याचे बा. ह. मगदूम तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे बहुतांशी कार्यकर्ते गझल लेखन कार्यशाळा आणि मुशायरा यशस्वी करण्यासाठी जातीने हजर होते. कोरोना टाळेबंदी काळात विनामूल्य ऑनलाईन गझल लेखन कार्यशाळा घेणाऱ्या उर्मिला बांदिवडेकर आणि डॉ. शरयू शहा ही जोडगोळी तसेच गुरुदत्त वाकदेकर आणि शीतल करदेकर हे पत्रकार देखील आवर्जून  उपस्थित होते. पुढच्या महिन्यात नवीन ठिकाणी नव्या उत्साहाने भेटण्याचे निश्चित करून सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली, असे गझल मंथन साहित्य संस्थेचे मुंबई जिल्हा अध्यक्ष मनोज वराडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...