Saturday 6 May 2023

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे धान्याचा काळा बाजार करणाऱ्या राईस मिलवर छापा, तिघांवर गुन्हा, टेंपो जप्त.भिवडीतही टोळी सक्रिय !

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे धान्याचा काळा बाजार करणाऱ्या राईस मिलवर छापा, तिघांवर गुन्हा, टेंपो जप्त.भिवडीतही टोळी सक्रिय !

भिवंडी, दिं, ७, अरुण पाटील, (कोपर) :
          इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील एका राईस मिलवर स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून १६ लाख २९ हजार रुपये किंमतीचा रेशनच्या तांदळाने भरलेला टेम्पो जप्त केला असुन याबाबत घोटी पोलीस ठाण्यात  तिघान विरोधात गुन्हा दाखल करून टेंपो जप्त करण्यात आला आहे. या घटनेने इगतपुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असुन घोटीतील इतर राईस मिलवरही असाच प्रकारे काळाबाजार होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
            अशाच प्रकारे भिवंडीतही धान्याचा काळा बाजार करणारी टोळी सक्रिय असून ती पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असल्याचे बोलले जात आहे.या पूर्वी पनवेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पलस्पे फाटा येथे पोलिसांनी  छापा टाकून अंतर राष्ट्रीय टोळीचा पर्दापाश केला होता.तर या पूर्वी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाईवे _दिवे गावा जवळील माईलस्टोन या गोदाम संकुलात अशीच एक टोळी सक्रिय होती.
           तर घोटी तेथील सविस्तर हकीगत अशी की, इगतपुरी तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील व्यापारी भाकचंद केशरमल पीचा यांच्या राईस मिलमध्ये रेशनचा तांदूळ काळ्या बाजारातून या मिलवर येणार असल्याची खबर पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांना मिळाली होती. पोलीस अधिक्षक उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पथकाने छापा टाकला असता राईस मिलमध्ये आलेल्या टेम्पोतील लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ जप्त केला.
           संबंधित मिल मालक तुषार नवसुखलाल पिचा, टेम्पो चालक विलास चौधरी आणि दौंड तालुक्यातील केडगाव येथील विक्रेता चेतन ट्रेडींग कंपनीचे मालक तथा ब्रोकर सिंघवी या तिघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तु कायदा कलम ३ व ७ प्रमाणे व भादवि २०१ प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.
        इगतपुरी तालुक्यातील राईस उद्योगात सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरात लाखो रुपयांचा रेशनचा तांदूळ पकडल्या गेल्याने तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांच्या पथकानेे या छाप्यात ४ लाख २९ हजार २६० रुपये किमतीचा १६ हजार ९०० किलो तांदूळ जप्त करण्यात आला. 
         स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या आधारे रेशन दुकानातून जमा केलेला तांदुळ अन्न महामंडळाच्या गोण्या नष्ट करून, सदर रेशनचा जुना तांदुळ वेगवेगळ्या कंपनीच्या गोण्यांमध्ये भरून सदरचा तांदुळ हा घोटी गावात खुल्या बाजारात विक्रीकरिता येत आहे अशी खबर मिळाली होती.
            त्या अनुषंगाने त्यांनी घोटी गावातील रेल्वे स्टेशनरोड लगत असलेल्या भाकचंद केशरमल पीचा राईस मिलमधे एक चॉकलेटी रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो (क्रं. एम. एच. १५ एफ. व्ही. ९०९४ ) हा काळ्या बाजारात विक्रीसाठी खाली करण्यासाठी उभा होता. त्याच्यावर छापा घालून सदर गाडीवरील इसमास ताब्यात घेऊन त्यास विचारणा केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली.
            पोलिसी खाक्या दाखवताच चालक विलास फकीरा चौधरी, याने सदर टेम्पो गाडीमधील माला बाबत हकीकत कथन केली की, सदरचा तांदूळ केडगाव, ता. दौंड, जि. पुणे येथील चेतन ट्रेडींग कंपनीचे मालक व ब्रोकर महेंद्र सिंघवी यांचे नावाचे बील तयार करून घोटी येथील भाकचंद केशरमल पीचा राईस मिल स्टेशन रोड घोटी येथे मालक तुषार नवसुखलाल पिचा यांचेकडे खाली करणार असलेबाबत सांगितले. तसेच त्यास अधिक विश्वासात घेवुन मालाचे पावत्यांबाबत विचारणा करता त्याने मालाची पावती सादर केली. सदर टेम्पोमध्ये जुना रेशनचा तांदुळ माल दिसुन आल्याने त्यांनी पुरवठा विभागातील निरिक्षक पी. डी. गोसावी व पुरवठा निरिक्षक अधिकारी बी. आर. डोणे यांच्या समक्ष सदर टेम्पोची तपासणी केली असता त्यामधे २९० गोण्या मिळुन आल्या. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स.पो.नि. प्रभाकर कारभारी निकम आदी करीत आहेत.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...