जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा, झडपोलीचा निकाल शंभर टक्के !
*ही शाळा ठरत आहे एक नवीन पाउलवाट*
पालघर / विक्रमगड, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्था यांच्यावतीने चालवण्यात येत असलेल्या जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा, झडपोली या शाळेचा निकाल हा १०० % लागला असून सर्वत्र या शाळेचे कौतुक होत आहे.
जिजाऊ संस्था ही २००८ पासून ठाणे पालघरसह कोकणांतील दुर्गम भागांत काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, महिला सक्षमीकरण या पंचसूत्रीवर संस्था अहोरात्र काम करत आहे. त्यातीलच एक उपक्रम म्हणून २०१६ साली अंध व दिव्यांग मुलांसाठी चालू करण्यात आलेली निवासी शाळा. त्यावेळी या शाळेत ४० विद्यार्थी होते. आता त्यांची संख्या १०५ आहे. त्यापैकी ६० मुली व ४५ मुले आहेत .
या शाळेतील मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच रोजच्या जगण्यात, व्यवहारात येणाऱ्या अडचणीना कसे सामोरे जायचे, यांसह बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात. त्याचबरोबर इथले पोषक वातावरण त्यांच्या गुणवत्ता वाढीस देखील उपयुक्त ठरत आहे. यांसह स्पर्धा परीक्षेसाठी देखील त्यांना सक्षम केले जात आहे.
यावर्षी लागलेल्या १० वीच्या निकालात (दिव्यांग) विद्यार्थ्यांपैकी पिंकी धिंडा ६७.२०%, सुमित्रा वाजे ६२%, अस्मिता चौधरी ६३%, रोहन लोहार ६४.२०%, सुयोग पाटील ६१.८०%, चंदना चवाथे ५८.२०% (दत्तक मुलगी) यांनी चांगले गुण संपादन केले आहेत. येथील या शाळेत शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देश्याने संगीताचेही शिक्षण त्यांना इथे दिले जात आहे. अंध मुलांचा वाद्यवृंद आता चांगला नावारूपाला देखील आला आहे. क्रीडा क्षेत्रातही या शाळेने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. बुद्धिबळ स्पर्धेसाठीही त्यांची तयारी चालू असून विविध कौशल्येही मुले प्राप्त करत आहेत.
त्याचबरोबर हस्तकला प्रशिक्षण, कॉप्युटर प्रशिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण, क्रिकेट टीम यांसारखे उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी, सक्षम बनवून भविष्यात तळागळांतील शक्य तेवढ्या सर्व अंध दिव्यांग बांधवांसाठी सहकार्याचा हात देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संस्थेचा मानस आहे. जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा हा जिजाऊ संस्थेचा प्रकल्प संस्थापक निलेश सांबरे यांच्या अत्यंत हृदयाच्या जवळचा प्रकल्प आहे. सगळे सण-उत्सव तसेच महापुरुषांची जयंती उत्सव येथे मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. या शाळेतील अंध विद्यार्थींकडून कडून दरवर्षी संस्थापक निलेश सांबरे हे राखी बांधून रक्षाबंधन साजरा करतात. तर सांबरे यांच्या मातोश्री आणि संस्थेच्या अध्यक्षा भावनादेवी सांबरे यांचा वाढदिवसही ह्याच मुलांच्या सानिध्यात मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
या शाळेतून बाहेर पडताना येथील विद्यार्थी हा सर्वार्थाने सक्षम असायला हवा तसा तो घडावा म्हणून निलेश सांबरे हे व्यक्तीगत या शाळेकडे लक्ष देत असतात. विक्रमगड तालुक्यात असलेल्या या शाळेत अनेक ठिकाणांहून येणाऱ्या या दिव्यांग मुलांसाठी जिजाऊ संस्थेची ही शाळा एक नवीन पाउलवाट ठरत आहे.
No comments:
Post a Comment