Friday, 2 June 2023

ग्रामपंचायत उमराठने केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्काराने श्रीम. वासंती आंबेकर व सौ. सविता गावणंग यांचा गौरव !!

ग्रामपंचायत उमराठने केला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला पुरस्काराने श्रीम. वासंती आंबेकर व सौ. सविता गावणंग यांचा गौरव !!

■ कोकण/गुहागर : उदय दणदणे

        महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आलेल्या आदेशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात यावा असे सांगण्यात आले होते. त्यानुसार बुधवार दि. ३१ मे २०२३ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुहागर तालुक्यातील  ग्रामपंचायत उमराठ तर्फे गावाच्या विकास कामांत सक्रिय सहभाग आणि योगदान असलेल्या उमराठ खुर्दच्या विद्यमान पोलीस पाटील श्रीम. वासंती पांडुरंग आंबेकर आणि उमराठ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ. सविता भिकू गावणंग यांचा गौरव करण्यात आला. 

         कार्यक्रमाची सुरुवात सरपंच जनार्दन आंबेकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन तसेच अहिल्यादेवीना विनम्र अभिवादन करून करण्यात आली तर उपस्थितांनी पुष्प अर्पून अहिल्यादेवीना  आदरांजली वाहिली. 

      तद्नंतर  ग्रामपंचायत क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे, त्यांचे मनोधैर्य, मनोबळ वाढावे आणि इतर महिलांना सुद्धा प्रोत्साहन मिळावे या हेतूने शासनाच्या महिला व बालविकास विभागातर्फे आलेल्या आदेशानुसार बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मुलन, लिंग चिकित्सा प्रतिबंध, महिला सक्षमीकरण, घरगुती हिंसा प्रतिबंध, महिला स्वयं सहायता बचतगट, आरोग्य, साक्षरता, मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार तसेच स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मुलन इत्यादी क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या उमराठ खुर्दच्या विद्यमान पोलीस पाटील वासंती आंबेकर आणि उमराठच्या माजी सरपंच सौ. सविता गावणंग यांचा ग्रामपंचायत उमराठतर्फे गौरव करण्यात आला. 

        सदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला गौरव पुरस्काराचे स्वरूप होते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि रू. ५००/- चा धनादेश. श्रीम. वासंती आंबेकर यांना सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते तर सौ. सविता गावणंग यांना ग्रामपंचायत सदस्या सौ.अर्पिता गावणंग यांच्या हस्ते देण्यात आला. 

       सदर छोट्याखानी कार्यकमाला ग्रामस्थांसह अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, सारीका धनावडे, वर्षा पवार, आशा सेविका वर्षा गावणंग, रूचिता कदम, महिला बचत गट सीआपी वैष्णवी पवार, बचतगटांच्या अध्यक्षा, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत कदम, प्रतिष्ठित ग्रामस्थ सुरेश पवार, शशिकांत पवार, नामदेव पवार, शांताराम गोरिवले, महेश गोरिवले तसेच बचत गटाच्या बहुसंख्य महिला आणि पुरुष मंडळी उपस्थित होती.
        सदर कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना गौरव मुर्ती वासंती आंबेकर, सविता गावणंग, तंटामुक्ती अध्यक्ष वसंत कदम, नामदेव पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्या विषयी गौरवोद्गार काढले. तर सरपंच जनार्दन आंबेकर  यांनी स्त्रीमुक्तीच्या न्याय-हक्कांसाठी लढा देणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उल्लेख करून गावातील महिलांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेऊन सक्षम व स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करावेत, ग्रामपंचायत आपणांस सहकार्य करेल असे सांगून ग्रामस्थांनी गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामपंचायतीला सहकार्याची साथ द्या, आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामांबाबत हात देऊ असेही सरपंच जनार्दन आंबेकर यांनी आश्वाशीत केले.
    कार्यक्रमाची प्रस्तावना ग्राम सेवक सिद्धेश्वर लेंडवे यांनी केली तर सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सदर  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कारकून नितीन गावणंग, डाटा ऑपरेटर साईस दवंडे यांनी मोलाचे योगदान व सहकार्य दिले.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...