Monday, 24 July 2023

एक होती इर्शाळवाडी, लोक संख्या २१९, जिवंत १३९, मृत्यु २७, बेपत्ता ५३, या ठिकाणी कलम १४४ लागू, अहोरात्र पोलीस तैनात !

एक होती इर्शाळवाडी, लोक संख्या २१९, जिवंत १३९, मृत्यु २७, बेपत्ता ५३, या ठिकाणी कलम १४४ लागू, अहोरात्र पोलीस तैनात !

भिवंडी, दिं,२५, अरुण पाटील, (कोपर)
         रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर चार दिवसांनी शोध कार्य थांबवण्यात आले. मुंबईपासून ८० किमी अंतरावर असलेल्या या वाडीमध्ये मोबाईलवरून संपर्क साधणं कठीण आहे. तीव्र उतारावर असलेली ही वाडी दुर्गम अशा डोंगर कपारीत आहे. यामुळे दैनंदिन दळणवळणाची साधनेही नाहीत. 
        दरम्यान, दुर्घटनेत शोध कार्यात संततधार पाऊस,अंधुक प्रकाश, येण्या जाण्यास अडचण व इतर प्रचंड अडथळे आल्याने अखेर बचावकार्य थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बेपत्ता असलेल्यांच्या नातेवाईकांशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेल्या अंतिम अहवालात एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे.
         इर्शाळवाडी हे गावच दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. मात्र इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. याआधी इर्शाळवाडीत दरड कोसळणं, भूस्खलन होणे इत्यादी घटना घडलेल्या नाहीत असं अहवालात म्हटलं आहे.
        दुर्घटनेनंतर इर्शाळवाडीत बचावकार्यासाठी एनडीआरएफची चार पथके कार्यरत होती. याशिवाय टीडीआरएफ, अग्निशमन जवान यांच्या सोबत मदतीसाठी इतर स्वयंसेवी संस्था दिवसरात्र झटत होत्या. ११०० हून अधिक व्यक्ती या बचावकार्यात सहभागी झाल्या होत्या. अखेर चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आले.
       इर्शाळवाडीची लोकसंख्या २१९ इतकी आहे. त्यापैकी १३९ जण जिवंत आहेत. तर २७ जणांचे मृतदेह सापडले. इतर ५३ जणांचा शोध लागला नसून ते बेपत्ता आहेत. या शिवाय बाहेर गावाहून पाहुणे म्हणून आलेले चार जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता व्यक्ती जिवंत असण्याची शक्यताही कमी आहे.
        इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली असून प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. अशा स्थितीत मृतदेह काढणे कठीण आहे. तसंच सापडत असलेल्या मृतदेहांची अवस्था पाहता जर शोध कार्य सुरूच ठेवले तर मृतदेहांची विटंबना होऊ शकते. त्यामुळे शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेतला गेला.
         शोधकार्य थांबवले तरी अडचणी संपलेल्या नाहीत. मृतदेह गाडले गेले असले तरी मातीचा ढिगारा पावसामुळे वाहून जाऊ शकतो. यामुळे काही मृतदेह छिन्न विछिन्न स्थिती बाहेर येऊ शकतात. त्यामुळे याठिकाणी सध्या दिवसरात्र पूर्णवेळ पोलिसांचे पथक तैनात केले आहे. तसंच या जागेला कुंपण घालण्यात येत आहे. याशिवाय पुढच्या ६ ऑगस्ट २०२३ पर्यंत या ठिकाणी कलम १४४ लागू करण्यात आले असून नागरिक, पर्यटक, ट्रेकर्सना प्रवेशास बंदी घातली आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...