Tuesday 12 September 2023

अखेरच्या श्रावणी सोमवारा निमित्त त्र्यंबकेश्वर शिव भक्तांच्या गर्दीने फुलला !!

अखेरच्या श्रावणी सोमवारा निमित्त त्र्यंबकेश्वर शिव भक्तांच्या गर्दीने फुलला !!

भिवंडी, दिं,१२, अरुण पाटील (कोपर) :
        श्रावणातील अखेरचा सोमवार असल्याने त्र्यंबकेश्वर  शिव भक्तांच्या गर्दीने फुलुुन गेला होता. रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने देशभरातून शिव भक्त त्र्यंबक नगरीत दाखल झाल्याने गर्दीत अधिकच भर पडली होती. सोमवारी सकाळपासून मंदिर खुले करण्यात आल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी रीघ लागली होती. शेवटचा सोमवार असल्याने अनेक भाविकांची ब्रह्मगिरी फेरीची पर्वणी साधली.

         श्रावण सोमवार म्हटला की नाशिक शहरातील अनेक महादेव मंदिरात गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दर्शनासाठी मोठी गर्दी होते. मागील तिसर्‍या सोमवारी तर गर्दीचा उच्चांक पाहायला मिळाला. त्यानंतर चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने रविवार सायंकाळपासूनच भाविकांच्या गर्दीने त्र्यंबक नगरी गजबजून गेली होती. पहाटे चार वाजता मंदिर खुले करण्यात आल्यानंतर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा मंदिर परिसरात लागल्या होत्या. तर कुशावर्त तीर्थावरही स्नानासाठी गर्दी झाली होती. नाशिकहून दरवर्षी येणारी रामवारी दिंडी सायंकाळी हरिहर भेटीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल त्यामुळे गर्दीत आणखीनच भर पडली. ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी भाविकांचा प्रचंड सहभाग पाहायला मिळाला.

         नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण पूर्णपणे भरले आहे. त्र्यंबकला होणार्‍या पावसामुळे धरण भरते, ही जाणीव ठेवत नाशिकची दिंडी त्र्यंबकराजा व संत निवृत्तीनाथांचे आभार मानण्यासाठी एकादशीला येत असते. या दिंडीला हरिहर भेटही म्हणतात. वेदांत वाचस्पती वै. जगन्नाथ महाराज पवार यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली ही दिंडी आजही सुरू असून श्रीराम वारकरी मंडळ तो वारसा चालवत आहेत. संत निवृत्तीनाथ संस्थानकडून या दिंडीचे स्वागत करण्यात आले होते.

           वारकरी मंडळातर्फे श्रावण महिन्यातील वद्य एकादशी निमित्ताने सकाळी श्री काळाराम मंदिर ते त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरपर्यंत हरिहर भेट पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता श्री काळाराम मंदिर येथे प्रभू रामाचे दर्शन घेऊन रामाच्या पादुका वरील तुळस घेऊन वारकरी त्र्यंबकेश्वरकडे टाळ मृदुंग वाजवत भजन, कीर्तन, भारुड म्हणत राम मंदिरामार्गे हरिहर भेट निमित्त पायी दिंडी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाली होती.

No comments:

Post a Comment

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा ! (विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.) ...