Saturday 30 September 2023

जेष्ठांचे रक्षण काळाची गरज__

जेष्ठांचे रक्षण काळाची गरज
--------------------------------------

                   जुनं ते सोनं ! एक काळ असा होता की, मोठ्यांना मान-सन्मान मिळत होता. भारत तर यामध्ये अग्रेसर होता. त्यावेळी सद् विचार जगभरच होता. भारत तर याची जन्मभूमी. येथे नुसता विचार नाही चोख आचारसुध्दा. वस्तू असो या व्यक्ती, सर्व जुनं ते सोनं मानुन त्याची जपणुक-राखण, पालणपोषण करण्याची आपली परंपरा. पण आज काय पहायला मिळते ? १० कोटी ३० लाख वृध्दांपैकी जवळपास प्रत्येक दुसऱ्या वृध्दांची स्थिती केविलवाणी आहे. १० पैकी ७ वृध्दांना कौटुंबिक छळ सहन करावा लागतो. शहरांमध्ये ६०% सुना तर ५०% मुलंच वृध्दांना वाईट वागवतात. वेळप्रसंगी घराबाहेरही काढतात. फारच वृध्दांची आर्थिक स्थिती चांगली आहे. ते वृध्दाश्रमाचा आसरा घेतात.  ७०% वृध्दांना खासगी नोकरीमुळे पेन्शन नाही. त्यांची अवस्था भयानक आहे. ८०-८५ वर्षांचे वृध्द शहरात आजही काही ना काही काम करुनच आपले पोट भरताना दिसतात.
                   सध्या युज अँड थ्रो ! असेच वातावरण आहे. मग ते खेळणे असो या  जिवंत  मायबाप. उपयोग किंवा  वापर  संपताच वा-यावर टाकणे हीच आजची स्थिती आहे. पण ही स्थिती समाजाला घातक ठरणारी आहे हे नाकारण्यासारखे नाही. पूँजीवादाच्या या अनीतीचा भीषण प्रसार या आपल्या देशात झपाट्याने होताना दिसत आहे. आई-वडिल, आजी-आजोबा असे अनुभवाचे भांडार अक्षरशः टाकाऊ भंगार मानले जात आहे. याला जबाबदार कोण? घरात स्थान नाही समाजात मान नाही. सरकारलाही जाण नाही. अशीच अवस्था आज असंख्य जेष्ठ नागरिकांची पहावयास मिळते.
                   जेष्ठ नागरिक म्हणजे राष्ट्राची संपत्ती असे म्हटलं जाते. लोकशाही राष्ट्रांच्या संविधनात अशीच मते व्यक्त केलेली आहेत. पण प्रत्यक्षात काय? या मतानुसार प्रत्यक्षात काय घडले नाही. घडण्याची शक्यता ही नाहीच असेच म्हणावं लागेल. वडिलधारी माणसं ही समाजाची मार्गदर्शक, आधार मानल्या जाणाऱ्या या भारत देशात तर परिस्थिती  दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत आहे. वडिलधारी माणसांसाठी आता जागा अपुरी पडायला लागली आहे. म्हणूनच वडिलधारी माणसांना घराबाहेर काढले जात आहे. जेष्ठ नागरिकांची ही अवस्था  होत असल्यामुळे सरकारने नविन कायदा करुन जेष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे, ही आनंदाची बाब आहे. पण त्या कायद्याचे पालन होते का याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सरकारच्या या कायद्याने वृध्दांची काळजी घेतली जाईल अशी अपेक्षा ठेवायला आता हरकत नाही. पित्याच्या वचनासाठी वनवास पत्करणारा राम, आई-वडिलांना कावडित घालून तिर्थयात्रा घडवणारा श्रावणबाळ, मायबापाची सेवा करणारा पुंडलीक हे येथील आदर्श आहेत. मात्र सध्या संपत्तीच्या वादात आई-वडिलांची हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात. बायकोचे बैल झालेले पुरुष जन्मदात्यांना विसरुन बायको सांगेल तसे वागवतात. बायको, मुलांच्या व स्वतःच्या वेगवेगळ्या चप्पल, बुटं ठेवायला घरात सुंदर कपाट ठेवणा-या या या बायकोच्या बैलांना ज्यांनी हे जग दाखवले, स्वतः  उपाशी राहून लहानाचे मोठे केले त्या जन्मदात्यांना त्याच्याच घरात त्यांनाच जागा न ठेवणा-या या मुलांना काय म्हणावे. काही मुलं आजही आई-वडिलांची, आजी-आजोबा यांची सेवा करणारी आहेत. पण अशांची संख्या अत्यंत कमीच आहे. जास्त संख्या ती भांडवलशाही  व चंगळवादाने बिघडलेल्यांचीच पहावयास मिळते.
                   अपत्यांकडून होणारी उपेक्षा ही बहुसंख्य वृध्द मातापित्यांच्या काळजाला व्यथित करणारी वेदनाच. रात्र -रात्र जागून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या व पदरमोड करुन लाड पुरवलेल्या मुलांकडूनच उपेक्षा होणे दुर्दैवीच म्हणावे लागेल. झोपडपट्टीपासून बंगल्यापर्यंत, अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत समाजाच्या प्रत्येक थरात मला जन्म दिलात, मोठे केलेत ते काय उपकार केलेत का? तुमचे कर्तव्य तुम्ही केलेत आसे बोलणारे वृध्दांच्या अंगावर वसकन खेकसणारे नराधम या समाजात कमी नाहीत. माता-पिता यांना कर्तव्य सांगणारे हे नराधम स्वतःचे कर्तव्य मात्र विसरून जातात याला काय म्हणायचे. वृध्द आई-बाबा यांची काळजी घेणे, त्यांचे रक्षण करणे हे अपत्यांचे मानवी, सामाजिक, नैतिक कर्तव्य पण ते आज आचरणात येताना फार कमी प्रमाणात  दिसते ही शोकांतिकाच म्हणावी लागेल असे आमचे प्रमाणिक मत आहे.
                   पांढरपेशा कृतघ्नांची रित जरा वेगळी बघायला मिळते. बाजारी पध्दतीचा ते वापर करतात. आई-वडिलांशी बोलणी करुन कोठेतरी लांब जागा घेऊन देतात किंवा वृध्दाश्रमाचा मार्ग दाखवतात. ४-५ महिन्यांनी एकदा कधीतरी औपचारिक भेट देतात. ती सुध्दा बायकोपासून वेळ मिळाला तरच आठवड्याच्या रजेच्या दिवशी बायको, मुलांना  पिकनिकला जाणाऱ्या मुलांना जन्मदात्यांचे दर्शन घ्यायची इच्छा होत नाही.पण ज्या वृध्दांना मुलांच्या, नातवंडे यांच्या सहवासात राहण्याचे भाग्य  लाभते ते स्वतःला खरंच भाग्यवान समजत असतील यात शंकाच नाही. काहीजण वृध्दांना थारा देतात पण घरची, मुलांची सर्व कामे करावी लागतील अशी ताकीदच देऊन पण हे योग्य नाही. मग पर्याय म्हणून एकांकीपणाला कंटाळून वृध्द जीव देतात. तर अनेकांच्या एकटेपणाचा फायदा घेत हत्या होतात. हे सर्व थांबवण्यासाठी तरुणांनी, समाजाने, सरकारने, प्रसिद्धीमाध्यमे, पत्रकार, वृत्तपत्रलेखक, विविध संस्था, एन.जी.ओ. यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या मुलांना योग्य सल्ला देऊन जेष्ठ नागरिकांचा स्विकारण्यास भाग पाडावे. वृध्दांचा आदर करण्याची शिकवण द्यावी तरच वृध्दांची दुर्दशा थांबेल. अन्यथा आपल्यावरही हीच वेळ येणार हे विसरुन चालणार नाही.
                एकंदरीत पुरेशी सामाजिक सुरक्षा नाही. आर्थिक सुरक्षा नाही. त्यामुळेच भारतातील बहूतेक वृध्द मिळालेल्या आस-याला अगतिकपणे चिकटून पण जीव मुठीत धरुन कसंबसं जगत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे वृध्दांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वृध्दांचा संभाळ कसा होणार हा आता यक्ष प्रश्न बनला आहे. तुम्ही आपल्या आई-वडिलांची, आजी-आजोबा यांची काळजी घ्या. नाहीतर तुमचे अनुकरण करुन तुमच्या मुलांकडूनही तुमची उपेक्षा होईल हे सत्य विसरु नका. शेवटी जेष्ठ नागरिक दिनानिमित जेष्ठ नागरिकांना शुभेच्छा !

शांताराम गुडेकर
पत्रकार /वृत्तपत्रलेखक 
पार्क साईट विक्रोळी (प.)
मुंबई -४०० ०७९
भ्रमणध्वनी -९८२०७९३७५९

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...