Sunday 10 September 2023

पद्मश्री अण्णासाहेब तथा पी.डी.जाधव (माजी राज्यसभा खासदार) यांची १०१ वी जयंती सोहळा भिवंडी येथे मोठ्या उत्साहात साजरा !

पद्मश्री अण्णासाहेब तथा पी.डी.जाधव (माजी राज्यसभा खासदार) यांची १०१ वी जयंती सोहळा भिवंडी येथे मोठ्या उत्साहात साजरा ! 
                                        
ठाणे, विश्वनाथ राऊत (उपसंपादक) - पद्मश्री परीवाराचं लाडकं आराध्यदैवत... लोकोत्तर युगप्रवर्तक व द्रष्टा युगपुरुष... दीनदलित वंचितांचे कैवारी... ज्ञानगंगोत्री घरोघरी पोहचविणारे आधुनिक भगीरथ...संस्थेचे संस्थापक तथा शिक्षणमहर्षी पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांची शतकोत्तर पहिली अर्थात १०१ वी जयंती दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी मोठया उत्साहात मातोश्री उषाताई जाधव सभागृह भिवंडी येथे संपन्न झाली.

या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  *मान. श्री. अजय वैद्य (आयुक्त भिवंडी शहर महानगरपालिका, भिवंडी)* तसेच समारंभाध्यक्ष *मान. श्री.विजय पां. जाधव* प्रमुख पाहुणे- *मान. श्री.बी.डी. काळे*- (संस्था कार्याध्यक्ष) *मान. श्रीम. अरुणा प्र. जाधव*- (संस्था उपाध्यक्षा) *मान. श्री.श्रीराम भोईर* - (संस्था उपाध्यक्षा) व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम प्रमुख पाहुणे व व्यवस्थापन समिती सदस्यांच्या उपस्थितीत पद्मश्री अण्णासाहेब जाधव व मातोश्री उषाताई जाधव यांच्या समाधी स्थळाचे दर्शन व वंदन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना बी.एन. महाविद्यालयातील NCC कॅडेट कडून सलामी व मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. अजय वैद्य व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते समारंभस्थळी दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलच्या महिला शिक्षिकांकडून अतिशय सुमधूर सुश्राव्य आवाजात ईशस्तवन, स्वागतगीत व पद्मश्री अण्णांची आवडती प्रार्थना "खरा तो एकची धर्म" या प्रार्थनेचे गायन करण्यात आले. पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांचे शैक्षणिक सामाजिक कार्याचा व संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमाची ओळख तसेच अण्णांनी स्थापन केलेल्या ठाणे जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्वच शाळांची माहिती संस्था कार्याध्यक्ष मा. श्री.बी.डी.काळे सर यांच्या संकल्पनेतून चित्रफीतीच्या माध्यमातून उपस्थितांना करून देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सुधीर घागस सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. कार्यक्रमाचे महात्म्य कथन करतांना श्री. सुधीर घागस सर  म्हणाले की संस्था म्हणजेच माझे पंढरपूर असून साने गुरुजींच्या शब्दात सांगायचे म्हणजे पंढरीचा पांडुरंगासोबतच भिवंडीच्या पांडुरंगाचे साने गुरुजींना दर्शन घडले तिथे माझ्यासारख्या पामराची काय कथा. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून अण्णांच्या प्रगल्भ कार्याचा वसा कथन केला.

जयंती उत्सव कार्यक्रमात BNN महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुवर्णा रावळ यांची मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल, तसेच प्राध्यापक कुलदीप सिंह राठोड यांनी PHD साठी लिहिलेला प्रबंध ठाणे महापालिकेने स्वीकारल्याबद्दल व श्री. दिलीप वाळंज यांच्या प्रयत्नातून मराठवाडा विद्यापीठाचे बाबासाहेब आंबेडकर या नावाचे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यासाठी शासनास भाग पाडण्यासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल या तीनही निमंत्रितांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या जयंती उत्सव कार्यक्रमात १००℅ निकाल देणाऱ्या ०४  चार शाळांपैकी  एक संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प) ही आहे. विशेष गुणवत्ता प्राप्त ०७ विद्यार्थी एस.एस.सी. परीक्षेत आपल्या विषयांचा १००℅ निकाल लावण्यासाठी विशेष परिश्रम घेतलेल्या १०७ शिक्षकांचा व संस्थेतील वर्षभरात सेवानिवृत्त झालेल्या 32 शिक्षकांचा सन्मान प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा. बाळकृष्ण काळे सर  संस्थेचे कार्याध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या अण्णांच्या सोबतच्या हृदयस्पर्शी आठवणी, रात्रशाळा वाचवण्यासाठी आण्णासोबत त्यांनी केलेल्या संघर्ष कथा याप्रसंगी कथन केल्या. बंद पडत चाललेल्या रात्रशाळेत फक्त 5 विद्यार्थी राहिले होते रात्र शाळा वाचवण्याची  संपूर्ण जबाबदारी अण्णांनी  माझ्यावर सोपवली आणि त्यावेळी परिसरात फिरवून पाचचे  पन्नास विद्यार्थी रात्र शाळेत प्रवेशित केले.  शाळा पूर्ववत सुरू करण्यात आली. त्याचवेळी बीएमसी इमारतीतील वर्ग खोल्यांचा प्रश्नही निर्माण झाला होता. शिक्षणाधिकाऱ्यांनी रात्र शाळांसाठी वर्ग खोल्या न देण्याचे पत्र काढले होते. रात्र शाळा  कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ देणार नाही  ही जिद्द ठेवली. ही  सर्व हकीगत अण्णांना सांगितल्यानंतर अण्णा स्वतःच माझ्याबरोबर बीएमसी आयुक्तांकडे आले त्यांची भेट घेतली आणि रात्र शाळांसाठी वर्ग खोल्या मिळवून दिल्या. आजच्या स्थितीला रात्र शाळेचा  दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल सलग चार वर्षापासून शंभर टक्के लागत आहे. त्यामुळे त्या रात्र शाळा त्या परिसरात नावारुपाला येत आहेत. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भिवंडी मनपा आयुक्त यांचे लक्ष वेधून घेतांना श्री. काळे यांनी संस्थेच्या सेवाभावी कार्यासाठी मनपा कार्यालयाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री.अजय वैद्य याप्रसंगी बोलतांना म्हटले की,  शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे आयुक्त आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून महापालिकेकडून संस्थेला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यापुढे श्री. काळे साहेब यांच्या सारख्या वयोवृद्ध, तपस्वी, ज्ञानी माणसासाठी आमच्या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. संस्थेने केलेल्या मागण्या कायद्याच्या चौकटीत बसत असतील तर त्यांना तात्काळ मंजूरी देण्याचे आश्वासन मनपा आयुक्त श्री.अजय वैद्य यांच्याकडून संस्थेला देण्यात आले.आपल्या भाषणांतून उपस्थित समुदायाला आपल्या आधिकारासोबत कर्तव्याची जाणीव ठेवण्याचे आवाहन आयुक्तांकडून करण्यात आले.

या कार्यक्रमात श्री. कल्पेश शिंदे, सौ. सुवर्णा बनसोडे, राजीव डोंगरदिवे, श्री. दिलीप वाळंज श्रीमती कुसुम डावकर यांनी आपल्या अण्णांनी केलेल्या कार्याचा गौरव आपल्या भाषणातून केला.

संस्था उपाध्यक्षा श्रीमती अरुणा प्र. जाधव यांनी आण्णांनी दिल्लीतील केलेल्या कामाची माहिती सांगून सर्वांना मंत्रमुग्ध केले व भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान यांच्यासारख्या महनीय व्यक्तींना आपण केलेल्या शैक्षणिक कार्याची ओळख करून  देण्यासाठी त्या काळी भिवंडी शहरात आणण्याचे शिवधनुष्य अण्णांनी पेलले ही सोपी गोष्ट नाही हीच त्यांनी केलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची पोचपावती आहे.

समारंभ अध्यक्ष मा.श्री विजय जाधव याप्रसंगी  बोलतांना म्हणाले, पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांची जयंती आपल्या सर्वांसाठी सण, अण्णांच्या जयंतीनिमित्त शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलेल्या शिक्षकांचा गौरव हा अण्णांनी आपल्या सर्वांना दिलेला गुरुमंत्र असून यासाठी अण्णांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासाठी जयंतीनिमित्त संस्थेचा सर्व परिवार उपस्थित राहिला त्याबद्दल आनंद व्यक्त केला. जयंतीनिमित्त आपण सर्व जण समाधी स्थळावर एकत्र येतो व अण्णांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वर्षभर आपल्या कार्याला वाहून घेतो. अण्णांच्या प्रेमापोटी कार्यक्रम पाच तास लांबूनही आपण कोणीही खुर्ची सोडली नाही व ज्यांना बसायला जागा मिळाली नाही त्यांनी उभे राहून कार्यक्रम पहिला त्याबद्दल उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक अध्यक्षांकडून करण्यात आले.

कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार संस्था सरचिटणीस श्री. रोहित जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. संगीता जाधव, सौ. दिपमाला जाधव, सौ. निलम जाधव यांनी केले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...