निर्मल ग्रामपंचायत उमराठने राबविला एक तास स्वच्छतेसाठी - स्वच्छता हीच सेवा उपक्रम !!
[ गुहागर/निवोशी : उदय दणदणे ]
शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) टप्पा - २ अभियानांतर्गत शनिवार दि. ३०.०९.२०२३ रोजी निर्मल ग्रामपंचायत उमराठ आणि पुर्ण प्राथमिक शाळा उमराठ न.१ यांच्या संयुक्त विद्यमाने एक तास स्वच्छतेसाठी - स्वच्छता हीच सेवा उपक्रम मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.
यावेळी सुरुवातीला निर्मल ग्रामपंचायत उमराठचे ग्रामसेवक श्री सिद्धेश्वर लेंडवे भाऊ आणि उमराठ शाळा नं.१ चे शिक्षक श्री. अनिल अवेरे सर यांनी सदर उपक्रमाची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना आणि उपस्थित ग्रामस्थांना दिली. सदर स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी शाळा ते गोरिवले वाडी पर्यंत अमृत कलशासह पदयात्रा काढून जनजागृती करण्यात आली.
सदर पदयात्रेत वसुंधरेची काळजी घेऊया, आपल्या गावाला हरीत बनवूया. स्वच्छ, सुंदर व हरीत गाव, अव्वल महाराष्ट्र घडवूया. अशा प्रकारचा प्रबोधनात्मक फलक(बॅनर) अग्रस्थानी होता. तशाच प्रकारे घोषणा देत व कचरा मुक्त भारत करूया, इत्यादी घोषणा देत विद्यार्थ्यांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. सदर पदयात्रा माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले यांच्या निवासस्थानी आल्यावर त्यांच्या हस्ते मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत मुठभर माती अमृत कलशात जमा करून गोरिवलेवाडीतून पदयात्रा पुन्हा शाळेत आली.
तद्नंतर शाळा परिसरात तसेच उमराठ आरोग्य उपकेंद्र परिसरात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सदर स्वच्छता अभियानात निर्मल ग्रामपंचायत उमराठचे ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे, उमराठ शाळा नं.१ चे मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर, अनिल अवेरे, स्वयंसेवक शिक्षिका प्राची पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संदीप गोरिवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कदम, कुंदन कदम, विनायक कदम, नरेश पवार, समुदाय आरोग्य अधिकारी प्रिया उरकुडे, आरोग्य सेवक अजय हळये, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, सानिका धनावडे, मदतनीस समृद्धी गोरिवले, आशा सेविका वर्षा गावणंग, शाळा पोषण आहार अन्नदात्या वैष्णवी पवार, सानिका पवार, मानसी गावणंग, बचतगटाच्या महिला आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मल ग्रामपंचायत उमराठचे कर्मचारी नितीन गावणंग, प्रशांत कदम आणि शाईस दवंडे यांनी उत्तम नियोजन आणि मोलाचे सहकार्य केले.
No comments:
Post a Comment