छत्रपती संभाजी राजे यांनी घेतली जारांगे पाटलांची भेट, राज्यात विविध ठिकाणी उपोषणाला पाठिंबा !!
भिवंडी, दिं,२६, अरुण पाटील, (कोपर)
संभाजी राजे यांनी मराठा आरक्षणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांच्याशी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चाही केली.राज्यात विविध ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यात आला आहे .
उपोषणाच्या वेळी मी चार दिवस पाणी प्यायलो नाही. मी हतबल झालो होतो. त्यामुळेच मला मनोजची फार चिंता आहे. काळजी वाटते. म्हणून मी धावपळत आलो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मनापासून आम्हाला तुमची काळजी आहे. एकच विनंती आहे. पाणी तरी घ्या. छत्रपतीच्या घरातील व्यक्ती म्हणून हे सांगण्याचा जास्त नाही पण माझा थोडा अधिकार आहे. तुम्ही आमरण उपोषण करा. पण पाणी तरी घ्या. उपोषण सुरूच ठेवा. पाणी घेऊन करा. माझी हात जोडून विनंती आहे, असं संभाजी राजे म्हणाले. तेव्हा त्यांचा कंठ दाटला होता. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या, असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी दिला.
संभाजीराजे अत्यंत भावनिक झाले होते. त्यांनी आपल्या शर्टाच्या बटनाला लावलेला माईक काढला. तो स्वत:च्या हाताने मनोज जरांगे यांच्या शर्टाला लावला. त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि काळजी घेण्यास सांगितलं. संभाजीराजे उपोषण स्थळावरून गेल्यानंतर मनोज जरांगे यांनी छत्रपती घराण्याची विनंती मान्य केली. त्यांनी बिसलेरी घेतली आणि पाण्याचा घोट घेतला. छत्रपती घराण्याचा मान म्हणून पाणी घेत आहे. पण फक्त आजच्या दिवसच पाणी घेतो, असं जरांगे म्हणाले.
कालपासून मन लागत नव्हतं. काल दसरा होता. हलता येत नव्हतं. त्यामुळे आज तडक इकडे आलो. जो माणूस प्रामाणिकपणे काम करतो त्याच्यासाठी मी जात असतो. मनोज हा अत्यंत मेहनती आणि प्रामाणिक आहे. म्हणून त्याच्यासाठी मी आलो. मी २००७ पासून महाराष्ट्रात फिरलो. गरीब मराठ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी. आज गरीब मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे. त्यांना एकत्र आणण्याचा माझा प्रयत्न होता.
२०१३ दरम्यान आम्ही पहिल्यांदा आझाद मैदानात मोठं आंदोलन केलं होतं. आम्ही सर्व होतो. आमरण उपोषण केलं होतं. तो उपोषणाचा प्रसंग मी अनुभवला आहे. माझा जन्म राजघराण्यात झाला. त्यामुळे मला सुख जास्त मिळालं. मनोज गरीब घरात जन्मला. रांगडा आहे. पण शरीर एकच असतं. मनोजने आताच आमरण उपोषण सुरू केलं असं नाही. त्याची धडपड आधीपासूनची आहे, असं संभाजीराजे म्हणाले. हे सांगत असतानाही त्यांचा कंठ दाटून आला होता. ते गहिवरून गेले होते.
छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून माझीही काही जबाबदारी आहे. जो समाजासाठी लढतो, जेव्हा समाज अडचणीत असताना लढतो, त्याला ताकद देण्याचं काम छत्रपती घराण्याचं असतं. म्हणूनच मी आज मनोजसाठी आलोय, असं ते म्हणाले.
No comments:
Post a Comment