Thursday, 26 October 2023

मोहने येथील आरएस त्रिकोन ते स्मशानभूमी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार !!

मोहने येथील आरएस  त्रिकोन ते स्मशानभूमी रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार !!

*निविदा न काढतात ४०० मीटर रस्ता तयार*

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भ्रष्ट कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांनी कर रूपाने भरलेल्या पैशाचा ठेकेदाराने आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करुन ४४ लाख रुपयांचा अक्षरशः चुराडा केला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले होते. परंतु याच कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. प्रभाग क्रमांक १३ मध्ये विविध विकास कामे अंतर्गत मूलभूत सोयीकरिता हा रस्ता मंजूर करण्यात आला होता परंतु या कामाची निविदा न काढताच अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदाराने रस्ता पूर्ण केला आहे, असा स्पष्ट आरोप सुशील आरके यांनी केला आहे. नागरिकांनी कर रूपाने भरलेल्या ४४ लाख रुपये निधीचा गैरवापर झाला आहे असे आरके यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ठेकेदाराने कोणत्याही नियमांचे पालन न करता बेकायदेशीरपणे रस्त्याचे काम करून पालिकेला चुना लावला आहे हा रस्ता कुठे रुंद आहे तर कुठे अरुंद आहे. हा रस्ता नाल्याच्या ठिकाणी अतिशय अरुंद असून या ठिकाणाहून वाहन चालविणे अतिशय जिकरीचे झाले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या कामाचा  प्रस्ताव तयार करते वेळी या नाल्याला नवीन मान्यता का घेण्यात आली नाही तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूला गटार तयार करण्यात आले नाही असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. एकंदरीत या संपूर्ण रस्त्याकडे पाहिल्यानंतर या कामाचा कोणी प्रस्ताव तयार केला तसेच निविदा प्रक्रिया कोणत्या अधिकाऱ्याने काढली याचे आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही.

या रस्त्याची लांबी ४०० मीटर दाखवली असून प्रत्यक्षात मात्र ३०० मीटर रस्ता असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. ४०० मीटर डांबरी रस्त्यासाठी ४४ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून केवळ एक मीटर रस्ता बनविण्यासाठी पालिकेला १ लाख ३२ हजार रुपये खर्च आला आहे. एक मीटर रस्त्याच्या कामात असे कोणते मौल्यवान मटेरियल वापरले गेले आहे हे नागरिकांना समजायला मार्ग नाही. रस्ता तयार करतेवेळी कामाची संपूर्ण माहिती असलेला पत्र्याचा बोर्ड लावण्यापेक्षा ठेकेदाराने कामाचा बोर्ड केवळ एक बॅनर लावला तोही चुकीचा पद्धतीने लावला आहे. ठेकेदाराला जास्तीत जास्त फायदा पोहोचविणे आणि त्यातून आपले कमिशन मिळविणे अशी दुहेरी फायद्याचा प्रस्ताव तसेच निवीदा न काढताच काम पुर्ण करणार्या ठेकेदारांवर आणि पालिका अधिकाऱ्यांवर देखील चौकशी करण्याची मागणी सुशील आरके यांनी केली आहे. या रस्त्याच्या कामाची त्रयस्त समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी आरके यांनी केले असून या कामाची चौकशी न झाल्यास सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आरके यांनी सांगितले आहे.

याबाबत उपअभियंता हरून इनामदार यांना विचारले असता या रस्त्याच्या कामात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. असे असले तरी या रस्त्याचे काम वादात सापडले असून पालिका अधिकारी यावर कधी समिती नेमून श्वेतपत्रिका काढून भ्रष्टाचार झाला नसल्याचे जाहीर करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...