Monday 15 January 2024

काय सांगावे मकर संक्रांत सणाबद्दल __

काय सांगावे मकर संक्रांत सणाबद्दल....... 

     गावाकडील प्रत्येक सखा- सवंगडी  मुंबईच्या स्वप्नंनगरीत मोठी स्वप्न घेवून आला आणि खऱ्या अर्थाने सणांची महतीच विसरून गेला गावाकडची मैदानेही विचारू लागलीत की हा मुंबईत एवढा का हरवला......

    दिनदर्शिकेमधे मकर संक्रांत बघितल्यानंतर प्रथम आठवायची ती म्हणजे शेतामधे दोन दिवसात  केलेली धम्माल मस्ती......

      मकर संक्रांत लगभग १५ दिवसांवर येवून ठेपायची आणि याच कालावधीत बोरींच्या झाडांना बहर आलेला असायचा....... मग काय... शाळा सुटल्यानंतर सर्व मुलांचा घोळका हा समुद्र किनारी असलेल्या बोरींच्या झाडांकडे वळायचा. मुरुड तालुक्यात जमृतखार हा माझा गाव खेड्यात असल्यामुळे तेथील शाळा ह्या नेहमीच्याच वेळापत्रकानुसार  म्हणजे सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत होत्या त्यामुळे ५:३० वाजता सूर्य हळूहळू  अस्ताला जायला निघायचा आणि अश्या वेळी मुलांचा घोळका धावत धावत बोरे काढायला निघायचा. सूर्याचा अस्त होत असताना समुद्र किनारी पक्ष्यांचा थवा मोठ्या उस्ताहात उडताना मिळायचा जणू एक उद्यासाठी नवीनच संदेश देवून जायचा.....

कधी कधी तर बोरींच्या झाडांवर चिमण्यांचे आणि इतर पक्ष्यांचे घरटे असे विनलेले  बघायला मिळायचे  की आजच्या आर्किटेक्टला सुद्धा जमणार नाही अश्या पद्धतीचे ते घरटे संपूर्ण सुरक्षित आणि नयन रम्य असायचे. सायंकाळी समुद्र किनाऱ्यावर मुलांचा घोळका पाहून पक्ष्यांच्या मनात चल-बिचल व्हायची आणि पक्ष्यांचा गोंगाट, सुर्याचा अस्त, गुरांच्या रांगा घरच्या वाटेने जात आहेत, असा हा सारा निसर्गाचा करिष्मा अनुभवायला मिळायचा.

    संक्रांतीच्या लगभग १५ दिवसांच्या आधी दररोज सकाळी उठल्यानंतर शाळकरी मुले संक्रांतीच्या तयारी लागायची . बोरांन मधल्या बिया जमा करून सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये गावच्या बाजूला असलेल्या विशिष्ट दगडींवर नेहमी प्रमाने आपापल्या जागेवर बसून बिया फोडून त्यामधले गर काढण्यात व्यस्त असायचे.त्याच वेळेस सूर्याचा उदय होत असतानाच पक्ष्याचा किलबिल कानावर ऐकू येताच मन अगदी प्रसन्न व्हायचा.चारी बाजूस सूर्याची सोनेरी किरणे अंगावर  पडताच हळूहळू  थंडीतून मुक्त होतोय असा भास व्हायचा.

   आणि मग काय काही दिवस गेल्यानंतर उजाडायचा तो संक्रांतीचा दिवस... दिवस पण वेगळा अनुभवायला मिळायचा पशु-पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि सूर्याच्या सोनेरी किरणांनी सुरू व्हायचा जणू संक्रांतीच्या  सनाचा आनंद पशु -पक्ष्यांना पण लुटायचा आहे असा वाटायचा.

  या दिवशी प्रत्येकाच्याच घरी सांदाण हा गोड पदार्थ आवडीने बनवायचे आणि तो सांदाण तयार झाल्यावर त्यावर एवढे दिवस मेहनत घेवून बियांतून काढलेले गर लावून खायचे आणि या दिवशी सण म्हटल्यानंतर काही ना काही गोड पदार्थ बनवण्यासाठी  चूल तशी दिवस भर पेटत असायची तर इकडे शेतामध्ये लहान- मोठी मुले कोण चेंडू-फळी , खोखो, कबड्डी, तर दुसरीकडे लहान मोठ्या-मुली लंगडी, लगोरी, खोखो, कबड्डी अश्या मैदानी खेळाची रंगत भरली असायची सर्वांच्याच मनात एक आनंदचा सोहळा निर्माण झालेला पहायला मिळायचा.शेतामध्ये खेळत असताना असं वाटायचं की येथे नंदनवन बहरलं आहे ज्याप्रमाणे भगवान श्री कृष्ण वनामध्ये आपल्या सवंगड्यासोबत खेळायचे तसेच सर्वजण ताण भूक हरवून आपल्या सवंगड्यासोबत खेळत जीवनाचा आनंद लुटायचे. खरंच खुप काही सांगण्यासारखं आहे पण बोलतात ना गेले ते दिवस.....राहिल्या त्या फक्त आठवणी.... हो पण असं होईल का ? आपण पुन्हा लहान होवू का ? 
देवाला एवढच विचारू या की देवा येतील का रे असे दिवस पुन्हा..............

✍शब्दांकन :उदेश धर्मा तळेकर
मु. जमृतखार, ता. मुरुड-जंजिरा, जि. रायगड.

No comments:

Post a Comment

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !!

खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते सोमजाई मंदीर बोरघर भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !! ** खासदार सुनील तटकरे यांच्या खासदार फंडातून सो...