Monday, 4 March 2024

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव अखेर मंजूर, सरपंच पदाचा पदभार उप सरपंचाकडे की प्रशासक ?

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव अखेर मंजूर, सरपंच पदाचा पदभार उप सरपंचाकडे की प्रशासक ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील बहुचर्चित कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती महेंंद्र भगत यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेरीस आज ११ विरुद्ध २ अशा मतानी मंजूर झाला असून यानंतर रिक्त सरपंच पदाचा पदभार उपसरपंच छाया कुडंलिक बनकरी यांच्या कडे दिला जातो की ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला जातो, हे काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत ही औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, या ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन करण्यासाठी सदस्य जिवाचा आटा पिटा करतात, मागील एक दिड वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीवर भारती महेंद्र भगत यांची सरपंचपदी वर्णी लागली होती, मात्र त्या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, त्यांचे पती ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करतात असे एक ना अनेक आरोप करत यांच्या विरोधात कल्याण तहसीलदार सचिन शेजाळा यांच्या कडे काही सदस्यांनी पत्र दिले होते. त्यानुसार तहसीलदार शेजाळ यांनी आज कांबा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अविश्वास ठरावाची सभा बोलावली होती, याकरिता सर्वच्या सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी या सरपंच अविश्वास सभेचे सूचक होते अरुण वंसत शिरोसे तर अनुमोदन सदस्य संदीप कुडंलिक पावशे यांनी दिले, याप्रसंगी सरपंच भारती भगत यांच्या विरोधात छाया कुडलिंक बनकरी, पद्माकर शिरोसे, दत्ता भोईर, उषा गांवडे, अरुण शिरोसे, इजा भोईर, संदिप पावशे, संतोष पावशे, हरिदास सवार, सुंगधा पावशे, वंदना पावशे आदी ११ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले तर त्यांच्या बाजूने केवळ दोन म्हणजे स्वतः सरपंच भारती भगत व सोनाली विजय उबाळे यांनी केले, म्हणजे सरपंचा विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ११ विरुद्ध २ मतानी मंजूर झाला आहे.
यावेळी कार्यालया बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, उद्योजक छगनशेठ बनकरी, योगेश बनकरी, आदी मंडळी उपस्थित होते तर गावातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, म्हारळ पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून पल्लवी सस्ते यांची नियुक्ती झाली आहे, मात्र त्यांना अद्यापही डहाणू बीडिओ म्हणून कार्यमुक्त करण्यात आले नाही, शिवाय राजपत्रित अधिकारी यांच्या संघटनेने या बदल्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे सध्या कल्याण पंचायत समितीवर गटविकास अधिकारी नाही, हा चार्ज अंबरनाथ गटविकास अधिकारी परदेशी यांच्या कडे देण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घातले तर हा अविश्वास ठराव पडताळणी साठी पुन्हा ग्रामपंचायतीकडे पाठवला जाईल, व त्याची पडताळणी झाल्यानंतर सरपंच पदाचा पदभार उपसरपंच यांच्या कडे दिला जाईल असे एका वरीष्ठ अधिका-याने सांगितले, त्यामुळे कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे किती दिवस रिक्त राहते? की पदभार उपसरपंच की प्रशासक हे काही दिवसातच स्पष्ट होईल. हे काही असले तरी सरपंच भारती भगत यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सदस्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

मायक्रोलिंक कॉम्प्युटर्स घाटकोपर येथे मोफत कॉम्प्युटर्स डिप्लोमा व सारथी योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ! घाटकोपर, ...