शिक्षक क्षमता वृद्धी तालुकास्तरीय प्रशिक्षण संपन्न !!
वसई , प्रतिनिधी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर,शिक्षण विभाग माध्यमिक जि. प.पालघर व पंचायत समिती (शिक्षण विभाग) वसई यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृध्दी तालुकास्तरीय प्रशिक्षण भास्कर वामन ठाकूर संकुल, विरार येथे २६ फेब्रुवारी ते १३ मार्च दरम्यान चार टप्प्यांत आयोजित करण्यात आले होते.
नवीन शैक्षणिक शैक्षणिक धोरणाची (२०२०) प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता ९वी ते १२वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांना व मुख्याध्यापकांना यशस्वी नेतृत्वाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक व बंधनकारक असलेले हे तीन दिवसीय प्रशिक्षण चार टप्प्यांत अत्यंत नियोजनपूर्वक व सकारात्मक वातावरणात पार पडले.
सदर प्रशिक्षणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण घेतलेल्या २४ तज्ञ मार्गदर्शकांनी नवीन शैक्षणिक धोरणात अंतर्भूत असलेल्या १२ घटकांचे अभ्यासपूर्ण विवेचन केले. संपूर्ण वसई तालुक्यातील आठशेहून अधिक शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. या प्रशिक्षण कार्यक्रमाला डॉ. संभाजी भोजने(प्राचार्य -जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था), श्री. राजेंद्र पाटील (गटशिक्षणाधिकारी, माध्यमिक वसई) यांनी आवर्जून भेट दिली.
गटसाधन केंद्र वसईतर्फे सौ. प्रिती राठोड,सौ जयश्री साबळे व सौ. सुजाता म्हात्रे यांनी समन्वयक म्हणून अतिशय उत्तमरित्या कार्यभार सांभाळला. हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, तज्ञ मार्गदर्शक, तालुका समन्वयक व शिक्षण विभागाचे मोलाचे योगदान मिळाले तसेच या प्रशिक्षणासाठी भास्कर वामन ठाकूर संकुल ट्रस्टचे सर्व सन्माननीय सदस्य व प्राचार्य यांचे विशेष सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment