Tuesday 26 March 2024

कल्याण (अंबिवली) मुरबाड नवीन रेल्वे लाईन विरोधात शेतकऱ्यांचे आत्मदहन अंदोलन ?

कल्याण (अंबिवली) मुरबाड नवीन रेल्वे लाईन विरोधात शेतकऱ्यांचे आत्मदहन अंदोलन ?

कल्याण, (संजय कांबळे) : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा शिमगा आणि राजकीय उमेदवारांची धुळवड सुरू असताना कल्याण तालुक्यातील मानिवली गावाच्या शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या कल्याण (अंबिवली) मुरबाड या नवीन रेल्वे लाईन विरोधात शेतकरी आक्रमक झाले असून आपणापुढे सामुहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सुनील गायकर या शेतकऱ्यांनी सांगितले आहे, तसे निवेदन रेल्वेच्या उप मुख्य अभियंता निर्माण कार्यालय, नवी मुंबई यांना दिले आहे.

मागील आठवड्यात कल्याण (अंबिवली) मुरबाड या २८ किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वे लाईन साठी ज्वांईट सर्वे मानिवली येथे सुरू असताना तो गावातील शेतकऱ्यांनी बंद पाडला होता, शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार या रेल्वे साठी सर्व्हे नंबर ११२ व इतर मिळकती मधील एकूण १९७० गुंठे बाधित होणार आहे. याशिवाय २५०० शे फळझाडे व २ हजार जंगली झाडे तुटली जाणार आहेत. यावर पर्याय म्हणून सरकारी गायरान सर्वे नंबर १०२ मध्ये ३३ हेक्टर ६३ गुंठे इतकी उपलब्ध आहे, शिवाय ही जमीन उंचावर असल्याने कोणतीही अडचण येणार नाही. मात्र असे असताना आम्हा शेतकऱ्यांच्याच नशिबी, मुळावर हा प्रकल्प का? असा प्रश्न उपस्थित करून यामुळे आमची राहती घरे, बागायती उपजाऊ जमीन, झाडे, ही यामध्ये बाधित झाल्यानेआमच्या वर स्थलांतर व्हावे लागणार आहे. ते आम्हांला मान्य नाही असे बोलून सरकारी जागेतून ही नवीन रेल्वे गेल्यास आमची हरकत असणार नाही पण आमच्या जमीनीतून लाईन नेण्यास आमचा तीव्र विरोध व हरकत असल्याचे सांगून आमचा राजकर्त्यावर विश्वास नाही पण भारतीय राज्यघटनेवर व न्यायव्यवस्थेवर पुर्ण भरवसा व विश्वास असून भारतीय संविधान परिछेद २१ नुसार समान न्याय मिळविण्याचा पुर्ण अधिकारी आहे, तो न्याय न मिळाल्यास आम्हाला सामुहिक आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच प्रंसगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा श्री गायकर यांनी दिला आहे. 

तसे निवेदन ठाणे जिल्हाधिकारी, उप मुख्य अभियंता, निर्माण कार्यालय जुईनगर, नवी मुंबई, तसेच कल्याण तहसीलदार यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर  सुनील दत्ता गायकर, चंद्रकांत गायकर, सुनील दगडू गायकर, व्दारकानाथ धर्मा गायकर, रमेश केणे, भालचंद्र गायकर, विलास गायकर, सुनील आत्माराम केणे, संतोष वारघडे, गजानन काळण आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत, दरम्यान सध्या देशात लोकसभ निवडणुकीचा शिमगा सुरू झाला आहे, उमेदवार आणि राजकीय पक्षांनी धुळवड चालू केली आहे. आम्ही ५ वर्षे कसे चांगले काम केले, विरोधक खोटे आरोप करताहेत, पंतप्रधान गँरटी देताहेत, मात्र सध्य परिस्थितीत सर्व सामान्य जनतेला कोणी ही वाली उरलेला नाही, शेतकऱ्यांला नुकसान भरपाई मिळत नाही, वयाचे कारण पुढे करून लहान मुलांना वैद्यकीय उपचार नाकारले जात आहेत, कष्टकरी, शेतमजूराला घरपट्टी साठी हेलपाटे मारावे लागत आहेत, विविध प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य उध्दवस्त होत आहे, या विरोधात तक्रार करण्यासाठी गेले असता इकडून तिकडे पाठवले जात आहे. असे असेल तर शासन आपल्या दारी येवून नक्की काय करते ? असा सवाल आत्माराम केणे यांनी विचारला आहे. तर रेल्वे प्रकल्पाच्या विरोधामागील कारण कल्याण तहसीलदार सचिन शेजाळ यांनी जाणून घेत शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले, तथापि याबाबत शेतकरी सुनील गायकर यांना विचारले असता, ते म्हणाले आमच्या विरोधाचा विचार न केल्यास, गावा गावात जाऊन बाधित शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून हे अंदोलन अधिक प्रखर व तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांची अवहेलना !! पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजातील प्रत्येक घडामोडींचे...