Saturday 1 June 2024

स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन !!

स्वाधार योजनेच्या अर्जाची प्रत महाविद्यालयात जमा करण्याचे आवाहन !!

पुणे, प्रतिनिधी :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२३ - २४ या शैक्षणिक वर्षापासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज  भरलेल्या जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील वैद्यकीय शिक्षण व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अर्जाची प्रत (हार्डकॉपी) ते शिकत असलेल्या महाविद्यालयाकडे जमा करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत इयत्ता १० वी नंतरच्या इयत्ता ११ वी व १२ वी आदी अभ्यासक्रमांना तसेच इयत्ता १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळालेल्या मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी २०१६-१७ पासून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

२०२३-२४ या वर्षात नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने भरावेत याकरीता लिंक व विहीत मुदत देण्यात आली होती.  वैद्यकीय शिक्षण व नर्सिंग विद्यार्थ्यांचे निकाल इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत उशीरा लागल्याने त्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत २० मे पर्यंत देण्यात आली होती. २० मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरलेल्या वैद्यकीय शिक्षण व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी अर्जाची  हार्डकॉपी ते शिकत असलेल्या महाविद्यालयातील समान संधी केंद्रात लवकरात लवकर जमा करावी.

ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपली असल्याने यापुढे विद्यार्थ्यांनी अर्ज भरू नये, असेही समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त  मल्लीनाथ हरसुरे यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा ! (विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.) ...