Monday 3 June 2024

भाजपा आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा - मा. मंत्री जगन्नाथ पाटील

भाजपा आमदार किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करा - मा. मंत्री जगन्नाथ पाटील 


कल्याण, प्रतिनिधी : मुरबाड विधानसभेतील भाजप आमदार किसन कथोरे यांची भाजपमधून हकालपट्टी करावी. कथोरे यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप तथा महायुतीचे उमेदवार कपील पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्याऐवजी उघडपणे विरोधात काम केले. पक्षविरोधी काम केल्यामुळे आमदार कथोरे यांची तात्काळ भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी मागणी भाजप नेते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


लोकसभेच्या निवडणूकीत सर्वानी चांगले काम करून विजय मिळावा यासाठी आपण चांगले प्रयत्न केले. त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद आणि आभारही जगन्नाथ पाटील यांनी मानले आहेत. 


कपील पाटील यांच्या विजयासाठी आपल्या सांगण्यावरून मुरबाड मतदारसंघात मेळावे झाले. तेथे कथोरे उपस्थित होते. त्यानंतर कथोरे यांनी पडद्यामागून आपल्या कार्यकर्त्यांना जेथे आगरी समाजाची गावे आहेत तेथे महाविकास आघाडीचे बाळ्या मामा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे नीलेश सांबरे यांना मत देण्याचे फर्मान सोडले. अशा १०० कार्यकर्त्यांची यादी आपल्याकडे आहे. भाजपच्या विजयासाठी वरिष्ठांकडून आदेश असताना कथोरे यांनी त्या आदेशाला काडीचीही किमत दिली नाही. प्रदेशाध्यक्षांच्या प्रयत्नांना धुडकावून लावले, असा आक्षेप जगन्नाथ पाटील यांनी पत्रात घेतला आहे. कथोरे यांच्या या कृतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूप असंतोष आहे. पक्षाच्या विरोधात आणि कपील पाटील यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या किसन कथोरे यांची तात्काळ पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.



No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...