समाज हितासाठी झटणारे सामाजिक कार्यकर्ते - अशोक भोईर
---------------------------------------------------------------------------------
कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील न्हावा गावचे मूळ रहिवाशी नोकरीनिमित्त चेंबूर आर. सी. एफ वसाहत येथे वास्तव्यास असणारे आर.सी.एफ कर्मचारी, समाजसेवक अशोक भोईर अतिशय दिलदार, निस्वार्थी, कष्टाळू, भितभाषी, मनमिळावू आहेत. समाजामध्ये ते लोकप्रिय आहेत. त्यांचा जन्मदिवस १५ जुलै आहे. अशा सर्वगुणसंपन्न, प्रतिभाशाली गरजवंतांच्या हाकेला घरच्या माणसासारखा धावून जाणारा जनसेवक अशोक भोईर म्हणजे एक आदर्शवत जीवन मानावे लागेल. अशा या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याबद्दल बोलावे लिहावे तितकं कमीच आहे. घरची परिस्थिती बेताचीच. वडिलांचा फुलांचा छोटासा व्यवसाय. वडिलांसोबत ते मुंबईकर झाले. आई -वडील आणि दोन भाऊ असा हा परिवार.
परिवाराला उपाजीविकेचे साधन म्हणून फुलांचा व्यवसाय होता. त्यातच कसं बसं घर चालत असे. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच अशोक भोईर यांच्या वडिलांचे अकाली निधन झालं. अशा बिकट आर्थिक परिस्थितीत अशोक भोईर यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडून मुंबई मधील प्रसिद्ध अशा आर. सी. एफ (राष्ट्रीय कॅमिकल अँड फर्टीलायसर्स लिमिटेड) मध्ये नोकरी स्वीकारली. प्रतिकूलता आणि अडचणी यांनी सतत सोबत केलेले अशोक भोईर यांनी तळागाळातील समाजामधील समस्यानी ग्रासलेल्यांना मदत करून त्यांना उभारी देणे या विचाराचे बालकडू अशोक भोईर यांना लहानपणीच मिळाले होते. मुळातच जिद्दी स्वभाव आणि समाजहितासाठी काही तरी चांगले करण्याची उर्मी यामुळे त्यांनी आपले शिक्षण पदवी पर्यंत पूर्ण केले. चांगले शिक्षण आणि कायमस्वरूपी नोकरीला असल्यामुळे अशोक भोईर स्वतः आर्थिक सक्षम झाल्यावर आपल्या सामाजिक कार्याचा आलेख नेहमी चढत्या क्रमांकावर ठेवला.
आयुष्यात संघर्षमय जीवन जगत असताना जन्म पासून माणसाला काही ना काही छंद असतोच, पण असा छंद असणे हे फारच कमी लोकांमध्ये आढळून येते....! असा कोणता छंद असू शकतो... असा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न पडतोच, असा छंद अर्थातच परोपकाराचा...! फक्त आपलाच विचार न करता... आपल्या बरोबर इतरांचा हि विचार करणे.... इतरांना मदत करणे, त्यांना वेळ देणे, असा हा परोपकाराचा धर्म, परोपकार करणे जेवढे सोपं वाटत असले तरी अंमलात आणणे त्याहून ही कठीण आहे...! अशी समाजात कमीच व्यक्तीमहत्व आढळतात. दुसऱ्यासाठी मोकळ्या मनाने जगणे, इतरांना सहकार्य करणे, निस्वार्थी पणाने समाज सेवा करणे असे अनेक पैलू परिपूर्ण असणारे तसेच समाजसेवेमुळे व पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) या संघटनेच्या माध्यमातून सर्वपरिचित असणारे जनसेवक म्हणजेच आर. सी. एफ कर्मचारी श्री.अशोक भोईर होय.
समाजात भेडसावत असल्या अनेक समस्या सोडवणे, आपली युवा पिढी चांगले उच्चशिक्षण घेऊन मोठं मोठे हुद्यावर असणे. मोठया कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत राहून स्वतः ला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, दरवर्षी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे, दरवर्षी गावी वृक्षारोपण करणे, स्वच्छता अभियान राबविणे असे अनेक उपक्रम राबवत समाजाला नवप्रेरणा देण्याचे काम अशोक भोईर सातत्याने करत आहेत.
कमी शिक्षण असल्याने किंवा शिक्षण न घेतल्याने नोकरी मिळणासाठी होणारा त्रास तसेच अशिक्षित असल्यामुळे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी स्वःताच्या पगारातून काही पैसे बाजूला करुन हे मंडळ शिकवण्यासाठी गरिब, होतकरु युवकांच्या मदतीला धावत आहे. मंडळाचे कार्य होतकरु व गरजू विद्यार्थीवर्ग व त्यांच्या पालकवर्गासाठी असून आदिवासी भागातील रहिवाशांसाठी, अपंग, अंधांसाठी आहे. श्री. अशोक भोईर आणि मंडळतर्फे दरवर्षी होत असलेल्या मदतीमुळे आदिवासी भागातील युवक-युवती शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत. महिला-पुरुष वर्गाला रोजगार उपलब्ध होत आहे. पदरमोड करुन दुसऱ्याला आनंदीत बघण्यासाठी अशोक भोईर कायम झटत असतात.
समाजसेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी असते असे नाही. पण अशोक भोईर यांना आर. सी. एफ / पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)च्या माध्यमातून लाभले. गेली अनेक वर्षे ते शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहेत. उपरोक्त संघटनांमध्ये त्यांनी अध्यक्ष हे महत्त्वाची पद भूषवत आहेत. कार्यक्रमाचे सु नियोजन करणे भोईर यांना खूप चांगले जमते. भोईर यांनी पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) स्थापन झाल्यावर मुंबईसह कोकणात समाजसेवेला सुरुवात केली. ते चेंबूर येथे आर. सी. एफ वसाहत येथे वास्तव्यास असून विभागातील गरजूंच्या हाकेला घरच्यांसारखे धावत जाऊन होईल तितकी मदत करतात.
समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून अशोक भोईर जमेल तशी जनसेवा करत आहेत. गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे, आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य मार्ग दाखवणे, क्रिडा स्पर्धाचे आयोजन करुन स्वतः सहभागी होणे, आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन इ. मध्ये भोईर कायम सहभाग घेऊन तो कार्यक्रम यशस्वी करतात. समाजकार्यात सहभागी होताना कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष होत असले तरी पत्नी सीमा अशोक भोईर (गृहिणी), मुलगे आदित्य अशोक भोईर (एम.बी.ए), आमिष अशोक भोईर (इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग) व मित्रपरिवार त्यांना समजून घेत त्यांच्या या जनसेवेला हातभार लावतात. अशोक भोईर पंचरत्न मित्र मंडळ (रजि ) चे अध्यक्ष असून अनेक मंडळ, प्रतिष्ठान,संस्था, सामाजिक उपक्रम यामध्ये पदाधिकारी आहेत.
कधीही न थकता हसत मुखाने काम करणे हे भोईर यांचे वैशिष्ट्य आहे. हसरा व प्रसन्न चेहरा, निःस्वार्थी, निगर्वी आणि सदैव मदतीला तयारअसणारे अशोक भोईर सर्वांनाच आवडतात. कारण नागरी समस्या सोडवणे व लोकोपयोगी उपक्रम राबविणे यासाठी ते विभागात जास्त परिचित आहेत. प्रसंगी सनदशीर/संसदीय मार्गाने लढे देऊन कारवायांना यशस्वीरित्या तोंड देत लोकांच्या अडीअडचणींवर उपाय शोधत ती समस्या मार्गी लावतात. आजच्या वेळेला एक व्यक्ती आपल्या बरोबरच्या व्यक्तीचे गुण गाताना फारसे दिसत नाहीत.पण भोईर याला अपवाद आहेत.ते सहकारीवर्गाला नेहमी सांगतात की, ध्येय, तत्त्व, नियोजन, चिकाटी, सहनशीलता, स्वाभिमान याच्याबरोबर कोणतेही काम करण्याची तयारी ठेवल्यास आत्मविश्वास आपोआप येतो. जे-जे लोक निःस्वार्थी भावनेने काम करतात तसेच काम मलाही करायचे असल्याचे अशोक भोईर कायम सांगतात.त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार /सन्मानचिन्ह/ सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे. कामगार कल्याण मंडळ चा "कर्तबगार कामगार, गुणवंत कामगार याशिवाय अन्य संस्थाकडून मुंबई रत्न, युवा गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासन कडून भोईर यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद देऊन सन्मान केलेला आहे.
प्रत्येक क्षेत्र असे असते तेथे निःस्वार्थी सेवा करणारी माणसे लागतात. जी आजच्याघडीला दुर्मिळ झालेली आहेत. आणि मग अशोक भोईर यांच्यासारखी माणसे लाभली की त्यांच्या वेळेचा उपयोग सामाजिक संघटनेसाठी करुन घ्यावा व आपली संघटना सर्वांनच्या सहकार्याने मजबूत उभी रहावी असे वाटते. अनेक मार्गदर्शन करणारी माणसं, माझे नातेवाईकांकडून मिळालेल्या भरभरुन प्रेम व मार्गदर्शन यामुळेच ही जनसेवा करण्याचा मार्ग सापडला असे अशोक भोईर आपल्या मित्रपरिवार यांना कायम सांगतात. अशा या जनसेवकाला १५ जुलै या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!
श्री. शांताराम गुडेकर
दै. अग्रलेख मुंबई /कोकण विभागीय संपादक
विक्रोळी (प.)मुंबई -७९
भ्रमनध्वनी-९८२०७९३७५९
No comments:
Post a Comment