उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक महेंद्र घरत यांना मुंबई विद्यापीठाची पीएचडी प्रदान !!
विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक प्रा. महेंद्र लक्ष्मण घरत यांना मुंबई विद्यापीठ कला शाखेअंतर्गत शिक्षणशास्त्र या विषयातील विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी मुंबई विद्यापीठामार्फत प्रदान करण्यात आली.
“पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने डॉ. महेंद्र घरत यांनी सेवासदन महाविद्यालय उल्हासनगर येथील शिक्षणशास्त्र विभागातील प्रा. डॉ. संजय निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली सात वर्ष संशोधन केले. त्या संशोधनाची फलितनिष्पत्ती म्हणून मुंबई विद्यापीठाने डॉ. सुनिता मगरे मॅडम विभागप्रमुख शिक्षणशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली विद्यावाचस्पती पदवी देण्यात आली.
आपण केलेले संशोधन खऱ्या अर्थाने आश्रमशाळेतील आणि तळागाळातील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत बहिस्थ परीक्षक म्हणून लाभलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या प्रा. डॉ. रझिया पटेल यांनी संशोधनाविषयी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले. डॉ. महेंद्र घरत हे पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजाचे आहेत. त्यांनी अत्यंत कष्टाने मिळवलेल्या या पदवी बद्दल संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि कुणबी समाजातील लोकांकडून कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment