Monday, 8 July 2024

एकलव्यांसाठी संधींची खिडकी उघडली आहे, तिचा उपयोग करा, अलका धुपकर यांचे आवाहन !!


एकलव्यांसाठी संधींची खिडकी उघडली आहे, तिचा उपयोग करा, अलका धुपकर यांचे आवाहन !!

ठाणे, दि. ८,

आपल्या आर्थिक परिस्थितीने खचून न जाता, विषमतेने भरलेल्या सामाजिक, भौगोलिक परिस्थितीला न घाबरता समता विचार प्रसारक संस्थेने उघडून दिलेल्या खिडकीतून अनेक संधी तुम्हाला खुणावत आहेत. त्यांना गवसणी घालण्यासाठी मेहनतीची आणि जिद्दीची गरज आहे. अभ्यासाबरोबर इतर वाचन करा, नियमित वर्तमानपत्र वाचत जा, सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव करुन घ्या, असे आर्जवी आवाहन सुप्रसिद्ध पत्रकार अलका धुपकर यांनी केले. ठाण्यात पार पडलेल्या समता विचार प्रसारक संस्थेच्या ३३ व्या एकलव्य गौरव पुरस्कार समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर होत्या. या वेळी ठाणे महानगर पालिकेच्या शाळेतील आणि अन्य शाळेतील १४६ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. त्या पुढे  म्हणल्या, जगाचं पुढचं भवितव्य तुमच्या हाती आहे. मलाला, ग्रेटा यासारख्या तरुण मुली शिक्षणाचा अधिकार आणि हवामान बदल या विरुध्द करत असलेल्या संघर्षापासून प्रेरणा घ्या आणि तुम्हाला समाजात जाणवत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवा, परिस्थिती बदलण्यासाठी संघर्ष करा. लवकरच तुम्ही मतदान करण्यास पात्र होणार आहात. राजकीय नेत्यांनी काय करायला हवं हे माहीत पाहिजे पण त्याच बरोबर तुमचं देशाप्रति, समाजाप्रति काय कर्तव्य आहे, हे समजून घ्या आणि ते पार पाडा.

या वेळी ठण्यातील राबोडी फ्रेंड सर्कल शाळेचे मुख्याध्यापक डॉ. नसीब मुल्ला हे ही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संत साहित्यावर पीएचडी केलेल्या आणि मातृभाषेतील शिक्षणाचा प्रसार करत असलेल्या नसीब सरांनी त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत जिद्दीने प्राप्त केलेल्या शिक्षणाचे अनुभव कथन करत मुलांना सांगितले, छोट्या खेड्यातून शिक्षणाचा गंधही नसलेल्या कुटुंबातून आलेल्या मला समतावादी शिक्षकांनी घडवले. शिक्षकी पेशामुळे मातृभाषेतून शिक्षणाचे फायदे मला कळून चुकले आहेत. इंग्रजी भाषेला जरी वाघिणीचं दूध म्हणत असले तरीही आईचं दूध वाघिणीच्या दूधापेक्षा वरचढ असतं. वाचन करा, थोर मोठ्यांचे विचार वाचा, ऐका. सोशल मीडियाच्या अति वापरापासून दूर राहा. सोशल मीडियाचा अशा गैरवापर चालू राहिला तर येणारी पिढी संवेदना शून्य होण्याची भीती वाटते आहे. 

माजी एकलव्य आणि आता शाळेत कला शिक्षक असणारे दिनेश जाधव सुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. एकलव्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या आपल्या मनोगतात ते म्हणाले, परिस्थितीचा बाऊ न करता शिक्षणाची कास धरा. पोटाची खळगी भरण्या बरोबरच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करा, सरस्वतीची आराधना करा, लक्ष्मी आपोआप चालत येईल. समता विचार प्रसारक संस्थेने पाठीवर हात ठेवल्याने मला पुढच्या आयुष्याला दिशा देण्याचे बळ मिळाले. समता म्हणजे समाजात महत्व देणारी ताकत मिळण्याचे ठिकाण आहे. आई, वडिलांचे ऋण कधी विसरू नका. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मीनल उत्तुरकर आपल्या भाषणात म्हणाल्या की शाळेच्या सुरक्षित वातावरणातून तुम्ही जगाच्या मुक्त वातावरणात प्रवेश करत आहात. पुढे नाव कमावण्यासाठी आयुष्याची लढाई लढायची आहे. या लढाईसाठी तुमचा आत्मविश्वास, शिक्षण आणि संविधानाने दिलेली मूल्ये ही तुमची अस्त्रे आहेत. यांच्या संवर्धनासाठी संस्थेच्या अनेक उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग घेणे तुमच्या पुढील आयुष्यात उपयोगी पडेल. 

या कार्यक्रमाचे संयोजक अजय भोसले यांनी प्रस्तावना केली. एकलव्य कार्यकर्ता करीना साऊदने सूत्र संचालन केले. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम आणि संस्थेचे माजी विश्वस्त संजय मंगला गोपाळ यांनी पाहुण्यांची ओळख करुन देत संस्थेच्या विश्वस्त मनीषा जोशी आणि जेष्ठ कार्यकर्ते शैलेश मोहिले यांच्या हस्ते त्यांचे स्वागत केले. संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

समता विचार प्रसारक संस्था गेली ३३ वर्षे ठाण्यातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थी जे त्यांच्या प्रतिकूल परिस्थितीतही दहावी उत्तीर्ण होतात त्यांना एकलव्य संबोधून त्यांचा जाहीर सन्मान करते आणि अनेक उपक्रम आयोजित करुन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्यात सामाजिक जाण निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असते.  

हा कार्यक्रमात एकलव्यांचे कौतुक करण्यासाठीं अनेक सहृदय मान्यवर उपस्थित होते. त्यात संस्थेचे विश्वस्त बिरपाल भाल, लतिका सु. मो. आनंदवाटा प्रतिष्ठानचे रवींद्र निर्मल तानाजी आणि त्यांचे सहकारी, महेंद्र मोने, उमाकांत पावसकर, अविनाश कदम, शिवाजी पवार, सुरेखा पवार,  सावरकर शाळेच्या मुख्याध्यापिका समीक्षा कदम, नरेश भगवाने, नितीन क्षीरसागर, शाहीन शेख, सुभाष तंवर आदि मान्यवर होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनामध्ये संस्थेचे एकलव्य कार्यकर्ते निलेश दंत, सुशांत जगताप, किशन सिंग बेदी, वैष्णवी करांडे, हर्षिका जैस्वाल, टीशा दाठिया, अनमोल साळवी, रितीका टोने, प्रमिता साख्यरत्न, अश्रफीया थानकर यांनी खूप मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भव्य शोभा यात्रेने गणेश चुक्कल यांच्या प्रचाराची सांगता !!

घाटकोपर पश्चिम विधानसभेत भव्य शोभा यात्रेने गणेश चुक्कल यांच्या प्रचाराची सांगता !! घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभ...