इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींना महामंडळाचा आधार - विशेष लेख
राज्यातील इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरजू, कुशल व्यवसायिक व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कृषी संलग्न व पारंपरिक उपक्रम, लघु व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र आदी व्यवसायाकरीता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळामार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कुशल महाराष्ट्र घडविण्यात महामंडळाचा खारीचा वाटा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
इतर मागासवर्गीयांच्या कल्याण व विकासासाठी विविध व्यावसायिक क्षेत्रातील व्यापार किंवा उद्योग यांची योजना आखून त्यांना चालना देण्यासोबत महामंडळाकडून इतर मागासवर्गातील तरुणांच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू करुन त्यासाठी वित्त पुरवठा करण्यात येतो. त्यांना व्यापार किंवा उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक ती तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरवून त्यांची आर्थिक स्थिती, उत्पादन निर्मिती, व्यवस्थापन आणि पणन यांचा विकास महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
महामंडळाकडून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील व्यक्तींसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (१० लाखापर्यत), शैक्षणिक कर्ज व्याज परतावा (२० लाखापर्यंत) व थेट कर्ज पुरवठा (१ लाखापर्यत) योजना राबविण्यात येतात.
*वैयक्तिक कर्ज व्याज परतावा:*
व्याज परतावा योजनेत बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे व्याज १२ टक्क्यापर्यंत महामंडळाकडून अर्जदाराने कर्जाचे हप्ते वेळेत, नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम अर्जदाराच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. यामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँका तसेच सहकारी बँकातून घेतलेल्या कर्जाचा समावेश करण्यात आला आहे.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना:
उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरीता इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बँकेमार्फत शैक्षणिक कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. या रक्कमेवरील व्याजाचा परतावा करण्याची ही योजना आहे. उच्च शिक्षणासाठी बँकेकडून राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी १० लाख रुपये व परदेशातील अभ्यासक्रमासाठी २० लाख इतके कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.
थेट कर्ज पुरवठा योजना:
इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिला व पुरुष लाभार्थ्यांना किरकोळ व छोट्या व्यवसायाकरीता एक लाख रुपयापर्यंतचे थेट कर्ज उपलब्ध करून देणे. या योजनेमुळे प्रवर्गातील गरीब व गरजू व्यक्तीला याचा लाभ देऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होत आहे.
इच्छुक व्यक्तींना https://msobcfdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड, शिधापत्रिका, वीज देयक, कर भरल्याबाबतची पावती, रहिवासी दाखला, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, शैक्षणिक पुरावा आणि जातीचा दाखला ही कागदपत्रे अपलोड करावी.
अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारत क्र. बी, मेंटल हॉस्पिटल कॉर्नर, विश्रांतवाडी पोलीस चौकी समोर, येरवडा पुणे येथे समक्ष किंवा कार्यालयाचा दूरध्वनी ०२०-२९५२३०५९ किंवा dmobcpune@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा.
रविंद्र दरेकर, जिल्हा व्यवस्थापक: इतर मागासवर्गीय प्रवर्गांतील व्यक्ती, कुटुंब व समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. आज अखेर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत २३ प्रकरणे, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना ४ व थेट कर्ज पुरवठा योजनेअंतर्गत २ प्रकरणे मंजूर करण्यात आलेली आहेत. समाजातील गरजू व्यक्तींनी या योजनांचा लाभ घ्यावा.
*संकलन*
जिल्हा माहिती कार्यालय, पुणे
No comments:
Post a Comment