Monday 7 October 2024

कोकणची लोककला फुगडी -टिपऱ्या मधून जनजागृती करणारी होतकरु शक्तिवाली शाहिर कु.सोनाली महादेव सनगले !!

कोकणची लोककला फुगडी -टिपऱ्या मधून जनजागृती करणारी  होतकरु शक्तिवाली शाहिर कु.सोनाली महादेव सनगले !!

[रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर  तालुक्यातील मु.पो.मोर्डे येथील कोकण कन्या कोकणची लोककला टिपऱ्या (फुगडी) मधील शाहिर म्हणून काम करणाऱ्या शक्तिवाली शाहिर कु. सोनाली महादेव सनगले अतिशय दिलदार, निस्वार्थी, कष्टाळू, मितभाषी, मनमिळावू  आहेत. सर्वगुणसंपन्न,प्रतिभाशाली अशा या शाहिर कु. सोनाली सनगले प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न ....]

कला ही ज्याच्या -त्याच्या ठायी उपजत असते असे मानल जाते. पण कला, विद्या शास्त्र या पैकी कोणत्याही क्षेत्रात  साधलेला पर्याय नसतो. कुमारी सोनाली महादेव सनगले हे संगमेश्वर तालुक्यातील एक वलयांकित नाव टिपऱ्या फुगड्या या प्रकारात स्वतः गायन करून आपली कला जोपासत  आपले महाविद्यालय शिक्षण घेत आहे. देवादिकांच्या रंग दरबारातही ज्या कळेने मानाचे स्थान मिळवले होते ती कला म्हणजे नृत्यविष्कार. म्हणूनच या कलेला रसिक जणांना अनुभव देण्यासाठी गुरुवर्य वस्तात नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारी सोनालीने टिपऱ्या- फुगड्या या कोकणात कलेला खऱ्या अर्थानी धडे गिरवले. या वर्षीपासून सोनाली महादेव सनगले या टिपऱ्या फुगड्या प्रकारात आपली कला सादर करत आहेत. वयाच्या १७ व्या वर्षी आपल्या कलेतुन संगमेश्वर तालुक्यात मोर्डे गावा सहित संगमेश्वर तालुक्यात, रत्नागिरी जिल्ह्यात आपली कला सर्वोतो परी रसिका जणांना अर्पित करीत आहेत. शिवाय सामाजिक दृष्टिकोन नजरे समोर ठेवून सोनाली यांनी एकता मित्र मंडळ मोर्डे घाटकर वाडी या मार्फत आपल्या मधुर आवाजात महिला वर्ग, जेष्ठ नागरिक सहित तालुका, जिल्हा सहित महाराष्ट मधील रसिक जणांची मने जिंकली आहेत. स्थानिक तालुका, जिल्हा स्तरावर अगदी मार्लेश्वर नगरीत सोनिली सनगले यांच्या गायनानी रसिकांना भुरळ घातली आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवाजी महाजन यांच्या जीवनावर पोवाडे गाऊन रसिकांना तृप्त करून त्यांची मने जोपसण्यात सोनाली हिने सर्वांची मने जोपासली आहेत. 

टिपऱ्या -फुगड्यामध्ये स्वतः भाग घेऊन, स्वतः गायन करून समाज यांच्यातील स्नेह -बंध दृढ व्हावा म्हणून आपले जीवन हीच आपली साधना करणाऱ्या सोनाली महादेव सनगले या तपस्विनीना नव दुर्गातील अंबा देवी म्हणायला काहीच हरकत नसावी. संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे गावातील सत्याची वाडी येथील ती रहिवाशी आहे. आपले प्राथमिक शिक्षण जि.प शाळा मोर्डे नंबर-१ येथे तर शिवाजी माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आपले दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्या नंतर आता आठले सप्रे महाविद्यालय देवरुख येथे अकरावीमध्ये शिक्षण घेत आहे. तिने आपल्या आई -वडील आणि ४ बहिणी यांचा विश्वास संपादन करून आपले वस्तात नाना शिंदे याच्या प्रेरणेने आज आपली कला जोपासात आहे. त्याच बरोबर त्यांना चांगला प्रतिसादही  मिळत आहे. ढोलकीपट्टू मानव कोटकर, प्रतीक शिवगण, रोहन गोताड, पप्पू आंग्रे, ऑक्टोप्याड ओमकार बंडागळे, श्रीदर राऊत, की बोर्ड शुभम गुरव, यश शिर्के यांच्या समवेत गायक सोनाली आणि सहकारी रिया घाटकर, कोयल सनगले, हर्षाली घाटकर, रिया राबाडे, नव्या घाटकर, नंदिणी राबाडे, उज्ज्वला राबाडे, हृद्रिका राबाडे, या सर्व युवती सोनाली सनगले या तरुण युवतीला चांगले सहकार्य करत आहेत. टिपऱ्या फुगड्या या कोकणाच्या कला प्रकारात आज सोनाली या मोर्डे सारख्या ग्रामीण भागात राहून आपले शिक्षण घेऊन आपल्या शिक्षणात कोणतीही हलगर्जीपणा न करता शिक्षणा सोबत टिपऱ्या फुगड्या सहित आपले गायनमध्ये स्थान निर्माण केल आहे. आपले आई -वडील, वस्ताद यांचे नाव जिल्हा, तालुका, गावासह वाडी, वस्तीत कमी वयात सुद्धा कोरले आहे. आज या कलेला महाराष्ट्र शासनाने शासन दरबारी नोंद करून कोकणची लोक कला म्हणून मान्यता देऊन या लोक कलेला न्याय द्यावा. सोनाली सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या या तरुण युवतीला शासन यांनी लोक कलाकार म्हणून  गौरव करावा. एकता मित्र मंडळ मोर्डे घाटकर वाडी या मंडळाने लोक जागृती करत विविध उपक्रम हाती घेतले म्हणून त्यांच्या सुद्धा गौरव होणे आवश्यक आहे. जेणे करून सोनाली सारख्या तरुण युवतीला रोजगार मिळेल. तिच्या सर्व सहकार्य यांना शासन स्तरावर न्याय मिळेल. सोनाली आपल्या गायनातून व्यसन मुक्ती पर गाणी गाऊन जण जागृती करत आहे. मोर्डे, वांझोले, साखरपा, मारळ, आंगवली, देवरुख, कणकाडी, लांजा, रत्नागिरी, गुहागर, मार्लेश्वर, गणपती पुळे सहित आज सोनाली यांच्या फुगड्या -टिपऱ्या या कलेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांचे सातत्याने होणारे प्रयोग आपली कला सादर  करण्याची त्यांना संधी मिळत आहे. आज मोर्डे सारख्या ग्रामीण भागात राहून त्या देवरुख शहरात आपले शिक्षण पूर्ण करायला येत आहेत. त्यांचे आई- वडील, त्यांच्या ४ बहिणी यांना सोबत घेऊन शेती व्यवसाय करतात. आई वडील यांना त्यांच्या उतार वयात सुद्धा मुली  त्यांना चांगला हातभार लावत आहेत. आज सोनाली यांची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. मी गरीब आहे पण मनाने खूप श्रीमंत आहे असं त्या आवर्जून उल्लेख करतात. साध, सरळ व्यक्तीमत्व असणारी एक १७ व्या वर्षात आपले नाव रोशन केले आहे. आंगवली- लाखन वाडी आणि परिसरात गेल्या दोन महिन्यात २५ च्या वरती प्रयोग तीने  सादर केले आहेत. गुरुवर्य आणि शिष्य नाते काय असते तिने कामी कालावधी आपल्या गुरुवर्य यांचा विश्वास संपादन करून दाखवून दिले आहे. गुरुवर्य नाना शिंदे यांची मोलाची साथ त्यांना मिळत आहे. त्या सदालाल घराण्यातील शक्ती वाल्या शाहीर आहेत. त्यांना लागेल ती मदत चैतन्य युवा मंडळ लाखन वाडीचे अध्यक्ष संदीप लाखन करायला तयार आहेत, कारण संदीप लाखन हे सुद्धा सदालाल घराण्यातील शक्ती वाले शाहीर आहेत. मोर्डे मधील सोनाली सनगले या गायिका आहेत. त्यांना टिपऱ्या -फुगड्या किंवा कोणत्याही क्षेत्रात मदत लागली तरी ते करण्यास तयार आहेत. तसेच पत्रकार संदीप गुडेकर यांनी सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली आहे. तसेच त्या कुणबी समाज्यातील युवती आहेत. कुणबी समाज बांधव यांच्याकडून सुद्धा त्यांना पाठिंबामिळत आहे. 

लहानपणापासून कलेची आवड असल्याने आपल्याला काहीतरी इतरांपेक्षा वेगळे असे काही तरी करण्याची भावना शाहिर कु.सोनाली यांना स्वस्थ बसू देत नव्हती. आपण काही तरी वेगळे असे करायचेच असा त्यांनी मनाशी निश्चय करुन आलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोनं करत आपला शाहिरीचा छंद जोपासला. त्यामुळे होतकरु नवोदित कलाकारांनी या संधीचे सोने करत आपल्या अंगी असलेले कलागुण रसिकांसमोर सादर केले तर नक्कीच यश पदरात पडते असे शाहिर कु. सोनाली सनगले आवर्जून बोलताना सांगतात. 

ज्या समाजात आपण जन्म  घेतला त्या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो याचे भान त्यांना आहे.त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. समाजाची सेवा करणे, रसिकांची सेवा करणे हे जणू काही आपले आद्य कर्तव्य ठरावे, समाजाची सेवा, न रसिकांची सेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी असते असे नाही. पण शाहिर कु.सोनाली यांना हे भाग्य  कोकणच्या लोककलेतुन माध्यमातून लाभले. त्या शैक्षणिक, कला, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहेत. विशेषतः कोकणची लोक कला विभाग हा त्यांचा जास्त आवडता विभाग असल्याने  शाहिर कु.सोनाली यांनी शक्ती वाली शाहिर म्हणून मान मिळवला. शिस्तबद्ध पध्दत, अनोखी तालीम,ज्ञहौशी रंगमंचावरील प्रसिद्ध कलाकार आणि ऊत्कृष्ट गायीका अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या क्षेत्रात काम करत असताना घरच्यांना फारसा वेळ देणे फारसे शक्य होत नसले तरी त्यांना कठीण परिस्थितीतही साथ देणारे त्यांचे कुटूंब कायम त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असते. तसेच लहाणपणासूनच आई वडिलांनी घडवलेल्या कडक शिस्त आणि संस्कारांमुळेच हे सर्व करणे शक्य होत असल्याचे मत शाहिर कु.सोनाली व्यक्त करतात. मी माझ्या आई-वडीलांमध्येच देव पाहते. नव्हे ते दैवतच आहेत माझी भावंडे पण मला खूपच संभाळून घेणारी लाभली असून असेच आई-वडील, भावंडे सर्वांनाच मिळायला हवीत अशी ही त्या आवर्जून सांगतात. समाजसेवा, रसिक सेवा हीच ईश्वर सेवा मानून शाहिर कु.सोनाली जमेल तशी जनसेवा करत आहेत. समाजकार्यात सहभागी होताना कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष होत असले तरी त्यांच्या या जनसेवेला सर्वांचा हातभार आहे.  कधीही न थकता हसत मुखाने काम करणे हे शाहिर कु. सोनाली यांचे वैशिष्ट्य आहे. हसरा व प्रसन्न चेहरा, निःस्वार्थी, निगर्वी आणि सदैव मदतीला तयार असणाऱ्या शाहिर कु. सोनाली सर्वांनाच आवडतात. प्रत्येक क्षेत्र असे असते तेथे निःस्वार्थी सेवा करणारी माणसे लागतात. जी आजच्या घडीला दुर्मिळ झालेली आहेत. आणि मग शाहिर कु.सोनाली  यांच्यासारखी माणसे लाभली की त्यांच्या वेळेचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करुन घ्यावा व आपला ग्रुप सर्वांच्या सहकार्याने मजबूत उभा रहावा असे वाटते. अनेक मार्गदर्शन करणारी माणसं, माझे नातेवाईकांकडून मिळालेल्या भरभरुन प्रेम व मार्गदर्शन यामुळेच कोकणची लोक कला व जनसेवा करण्याचा मार्ग सापडला असे शाहिर कु. सोनाली  आपल्या मित्रपरिवार यांना सांगतात. लहान वयात शाहिर कु.सोनाली  ताल-सुर यांचा संगम साधत गायन करत असल्याने  रसिकांच्या हृदयात अधिराज्य गाजवणार यात शंकाच नाही. कु.सोनाली कोकण भुमिपुत्री आहेत याचा प्रत्येक कोकवाशीयाला अभिमान आहे. कोकणची "कोकीळा" असे त्यांना म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. रंगभूमी म्हटलं  की, कलाकार हा आपण कोणी तरी इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मात्र शाहिर कु.सोनाली  याला अपवाद आहेत. सरळसाधे राहणीमान असलेल्या शाहिर कु. सोनाली आपल्या गाण्यातून मात्र जनकल्याणकारी विषयावर गायन करुन जनप्रबोधन करतात. असेच कार्य सातत्याने त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून होत राहण्यासाठी कोकणवाशीय भुमिपुत्रांनो शाहिर कु. सोनाली महादेव सनगले यांच्या या टिपऱ्या -फुगडी  कार्यक्रमाला दाद द्यायला हवी. जेणेकरुन शाहिर कु.सोनाली सारख्या तरुण गायिकेला महाराष्ट्र शासनाने शासनाकडून होणाऱ्या जनकल्याण योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांची निवड होईल. गरज आहे ती फक्त रसिक मायबाप यांच्या प्रेमाची... सहकार्याची. आम्ही सामाजिक क्षेत्राचे भान असलेल्या शाहिर कु.सोनाली सनगले  यांचे कार्य पाहून इतकेच म्हणू इच्छितो की__

सूर्याचे तेज येऊ द्या, तुमच्या कर्तृत्वात
चंद्राची शितलता, बहरावी स्वभावात 
कस्तुरीचा सुगंध, दरवळावा सहवासात 
मकरंदाचे माधुर्य, असावे मुखात.....
कोकणची लोककला फुगडी -टिपऱ्या या कलेतुन लोकजागृतीसाठी झटणा-या शक्ती वाल्या शाहिर कु.सोनाली सनगले यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !


शांत्ताराम गुडेकर 
पार्कसाईट विक्रोळी
भ्रमणध्वनी-९८२०७९३७५९

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...