Friday 4 October 2024

ठाण्यात संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प घेऊन गांधी जयंती साजरी !!

ठाण्यात संविधानिक मूल्ये जपण्याचा संकल्प घेऊन गांधी जयंती साजरी !!

ठाणे, प्रतिनिधी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शिकवलेल्या आणि स्वतःच्या आचरणातून दाखवलेल्या सत्य, अहिंसा या मूल्यांचे महत्त्व पुन्हा जागृत करण्यासाठी आज समता विचार प्रसारक संस्था, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय आणि समविचारी संघटनांनी मिळून ठाण्यात गांधींच्या पुतळ्यापाशी जमून गांधींना आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना अभिवादन केलं. आज महात्मा गांधींच्या जयंती दिवशी आम्ही विद्वेषाच्या विरुद्ध संविधानिक अहिंसक क्रांतीची घोषणा करत आहोत.  विद्वेष आणि हिंसाच्या विरुद्ध प्रेम आणि अहिंसाचा झेंडा फडकवून आम्ही शपथ घेतो की भारतातून विद्वेष आणि हिंसेला दूर पळवून लावू आणि भारताच्या नसांतून परत प्रेमाचे अमृत भरू. संविधानाचा सन्मान करण्याचा संकल्प करू, असा तुषार गांधींनी दिलेला संकल्प सर्वानी यावेळी घेतला.
या वेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी सांगितले की या महात्म्यांनी दिलेल्या सत्य, अहिंसा, समता, साधेपणा ही शिकवण, समता, धर्म निरपेक्षता या सारखी मूल्ये जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात समाविष्ट केली, ती देश म्हणून आपण किती पाळतो? आज देशात जी धर्माच्या जातीच्या नावाने विद्वेषाची लाट पसरते आहे. त्या विरुद्ध लढण्याचा आजचा दिवस आहे.

जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे समन्वयक संजय मं. गो. यांनी अहिंसक मार्गाने केले जाणारे लडाखच्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात सोनम वांगचुक यांना अटक झाल्याचे सांगून आज सरकारच्या कामावर टीका करणे गुन्हा समजला जात आहे, त्या विरुद्ध लढायला हवे, असे आवाहन केले. 
गांधी पुतळ्याला अभिवादन केल्यावर सर्व जण मिरवणुकीने तळापाळीला फेरी मारुन बाजाराच्या रस्त्यातून स्टेशन जवळच्या आंबेडकर पुतळ्यापाशी गेले. तिथे सत्य अहिंसा जिंदाबाद, जय जवान जय किसान आशा सारख्या घोषणा दिल्या. भारतीय महिला फेडरेशनच्या उर्मिला पवार यांनी पथ नाट्य सादर केलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी चळवळीची गाणी म्हटली. व्यसन मुक्ती अभियानाच्या ललित मरोठिया यांनी गांधीजींच्या दारुमुक्तीच्या आग्रहाचे आपण पालन करूया असे आवाहन केले. समता विचार प्रसारक संस्थेच्या अजय भोसले यांनी गांधीच्या विचारांची आजच्या नफरतने भरलेल्या वातावरणात नितांत आवश्यकता आहे असे आग्रहाने सांगितले. भारत जोडो अभियानाचे ओसामा रावलगावकर यांनी सर्व धर्म समभाव आणि समाजात शांती राखण्याचे गांधींजींचे तत्त्व आपण लक्षात ठेवले पाहिजे असे नमूद केले.

यावेळी राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी कथा माला, स्वराज अभियान, श्रमिक जनता संघ, आनंदवाटा प्रतिष्ठान, कोळावाडे गावठाण संवर्धन समिती, वुई नीड यू, राज्य सरकारी कर्मचारी संघटना आदी संघटनांचेही प्रतिनिधीही सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ !

आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्यामुळे कल्याण पश्चिमेकडील महत्वाच्या रस्त्यांसाठी ५० कोटींचा निधी‌ ! कल्याण, सचिन बुटाला : ...