एक बातमी आणि मी __
गुरुवार दिनांक नऊ जानेवारी २०२५ रोजी इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, यांनी एक अभूतपूर्व यशस्वी प्रयोग घडवून आणला. अंतराळात दोन उपग्रह एकमेकांना जोडण्याचा आणि पुन्हा एकमेकांपासून विभक्त करण्याचा हा तो प्रयोग म्हणजे ‘स्पॅडेक्स’.
अशा तऱ्हेने अंतराळात उपग्रह एकमेकांना जोडणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. त्याचप्रमाणे अंतराळामध्ये चवळीचे बी रूजवून त्यांना मोड आणि पाने फुटल्याचा सुद्धा एक यशस्वी प्रयोग याआधी संस्थेने घडवून आणला आहे.
खरं म्हणजे इस्रो या संस्थेची सुरुवातीपासून आतापर्यंतची यशस्वी घोडदौड हा सर्व माध्यमांचा सर्वात जास्त आकर्षणाचा विषय असला पाहिजे. एखादी कादंबरी अथवा सिनेमाची कथा किंवा एखादी फॅन्टसी म्हणजेच अद्भुतकथा म्हणून सुद्धा ती खूप आकर्षक आहे. असे असताना एवढी महत्त्वाची मोठी बातमी लोकांना आकर्षक आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचा एखादा कार्यक्रम म्हणजे एखाद्या अद्भुत कथेच्या कथाकथनाचा कार्यक्रम होऊ शकेल.
देशात बनलेला पहिला उपग्रह आर्यभट्ट, देशामध्ये बनलेले पहिले रॉकेट पीएसएलव्ही, मंगळयान, चांद्रयान आणि आत्ताचा हा स्पॅडेक्स हे प्रकल्प म्हणजे आपल्या आगामी चांद्र मोहिमेची यशस्वी पूर्वतयारीही नक्कीच म्हणता येईल. तसेच हे सर्व प्रयोग म्हणजे भारताकडे आता अंतराळातील प्रयोगशाळा उभारण्याची संपूर्ण क्षमता आली आहे याची खातरजमा आहे.
एच जी वेल्सच्या कल्पनेपेक्षाही सुरस अशा या कथा. कथा कसल्या? प्रत्यक्ष घटनाच. आपल्या देशातील तरुणांना केवढी मोठी प्रेरणा देऊ शकतील याची कुणाला जाणीव का होत नाही?
दुसरा एक विचार मनात येतो आपल्या देशात सर्व सरकारी यंत्रणा अनेक वेळा अनेक अनैतिक चक्रात सापडलेल्या, प्रचंड नुकसानीत सापडलेल्या किंवा बंद पडलेल्या दिसून येतात. पण ही संस्था अशी नासली नाही, दुराचाराने ग्रासली नाही. हे सुद्धा आपल्या शास्त्रज्ञांचे फार मोठे यश म्हणता येणार नाही काय?
खरं म्हणजे माझ्या दृष्टीने गुरुवारची स्पॅडेक्स संबंधीची बातमी सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी. निदान भारतीय माध्यमांनी तरी या बातमीची मोठ्या प्रमाणावर दखल घ्यायला हवी होती. माझ्या दृष्टीने सगळ्या वर्तमानपत्रांची मथळ्याची बातमी (हेड लाईन) ही असायला हवी होती. सगळ्या वाहिन्यांवर दिवसभर ही बातमी प्रामुख्याने झळकायला हवी होती. त्यावर सतत चर्चा किंवा चर्चासत्रे आणि व्याख्याने यांचे आयोजन केले जायला हवे होते. ज्या काही बातम्या आपल्या सर्व वाहिन्यांवर झळकत आहेत त्यापेक्षा कितीतरी महत्त्वाची आणि अभिमानाची ही बातमी सर्वांच्या दृष्टीनेच असायला हवी होती. वृत्तपत्रांनी कुठेतरी कोपऱ्यात किंवा ई-आवृत्तीमध्ये चार ओळीत या बातमीची वासलात लावली. मराठी वाहिन्यांवर तर मला कुठेच ही बातमी आढळली नाही. अर्थात कुणीतरी कुठेतरी एक दोन वाक्यात ती गुंडाळली असण्याची शक्यता आहे. पण ती दिवसभर सतत दाखवण्यासारखी महत्त्वाची बातमी नक्कीच होती. त्या प्रयोगाचे काय झाले हे जाणून घ्यायला मी इच्छुक होतो. म्हणून अनेक वाहिन्यांवर फिरलो. परंतु गुरुवारी काही मला ती बातमी समजू शकली नाही. शुक्रवारी व्हाट्सअप वर किंवा गुगल वर ही बातमी शोधून सापडली. अशी बातमी शोधावी लागते हे आपले आणि आपल्या देशाचे दुर्दैव आणि माध्यमांचा नाकर्तेपणा समजावा काय?
खरे म्हणजे सगळ्या मराठी वाहिन्यांनी त्यांचा वार्ताहर स्वतंत्रपणे बेंगलोरला पाठवून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या मुलाखती घेणे, ही माहिती मिळवून प्रस्तुत करणे, अशा प्रकारे खूप काही करणे आवश्यक होते. आपल्या देशाच्या दृष्टीने आणि संपूर्ण जगाच्या दृष्टीने सुद्धा या बातम्यांना मोठे महत्त्व आहे हे आपल्या स्वकीयांना समजेल तो सुदिन.
आदरणीय पूर्व राष्ट्रपती श्री अब्दुल कलाम यांनी इस्रायलच्या भेटीतील त्यांची एक आठवण सांगितली होती. इस्रायल मध्ये ते गेले असताना त्यावेळी इस्राईलचे युद्ध चालू होते. परंतु जेव्हा त्यांनी सकाळी तेथील वर्तमानपत्र पाहिले, तेव्हा वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर मथळ्याच्या बातमीवर (हेडलाईन वर) त्या देशामध्ये एका शेतकऱ्याने शेतीचा एक यशस्वी प्रयोग करून दाखवला त्याबद्दलची माहिती व फोटो संपूर्ण पहिले पान त्या प्रयोगावर आधारले होते. युद्धाच्या बातम्या आतील पानांवर होत्या. कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे हे जेव्हा आपल्या माध्यमांनाही समजेल तो सुदिन.
सध्या आपण आपल्या देशाच्या भावी पिढ्यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भविष्याकडे नजर लावून आशावाद जपायला हरकत असू नये असे वाटते. आपण आपल्या आयुष्यात या राष्ट्रासाठी फारसे काही करू शकलो नाही असे वाटणाऱ्या माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांनी जाता जाता निदान या आशेचा सुगंध वातावरणात पसरून जावे एवढी तरी इच्छा धरू या !
—-- सुनील देशपांडे (९६५७७०९६४०)
No comments:
Post a Comment