रायते येथील सुभेदार फार्म हाऊसवर जेसीबीच्या साह्याने तोडफोड ; ९४ हजार रुपयांचे नुकसान !
**प्रमिला घोडबंदेसह तिघांना अटक करण्याची मागणी
संदीप शेंडगे, टिटवाळा : गेल्या 35 वर्षापासून रायते गाव सुभेदार फार्म हाऊस येथे राहत असलेले महेंद्र सुभेदार यांच्या फार्म हाऊसवर जेसीबीच्या साहाय्याने तोडफोड करण्यात आली असून, या घटनेत पत्र्याच्या शेडचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना 26 मार्च 2025 रोजी रात्री 8.30 वाजता घडली असून या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र सुभेदार यांनी संभाजी सुरोशी यांच्याकडून सर्वे नंबर 68, हिस्सा नंबर 13 मधील 94 गुंठे जमीन खरेदी केली होती तिचे उपनिबंधक यांच्याकडे रीतसर रजिस्टर करून घेण्यात आले आहे. या जमिनीवर गेल्या 35 वर्षापासून त्यांचा ताबा असून पत्नी सुनीता सुभेदार यांच्यासोबत ते येथे राहत आहेत मात्र, या जमिनीवर हक्क सांगत या जमिनीमध्ये माझी दहा गुंठे जमीन आली आहे असे सांगून प्रमिला विकास घोडबिंदे, उज्ज्वला यशवंत सुरोशी, यशोदा यशवंत सुरोशी आणि जयवंत यशवंत सुरोशी यांनी बेकायदेशीरपणे जेसीबीच्या साहाय्याने फार्म हाऊसचे कंपाउंड आणि पत्र्याच्या शेडची तोडफोड केली. या तोडफोडीत 94 हजार रुपयांचे नुकसान झाले असून, शेडमध्ये असलेल्या 70 ते 80 कोंबड्या पळून गेल्या आहेत. यामध्ये सुभेदार यांचे 94 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 333, 324, 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जेसीबीच्या साह्याने तोडफोड करतानाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रण महेंद्र सुभेदार यांच्याकडे उपलब्ध असून व्हिडिओ चित्रे करण्याच्या माध्यमातून आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल असे टिटवाळा पोलिसांनी सांगितले आहे.
या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुभेदार कुटुंब भयभीत झाले आहे. तसेच आम्ही या फार्म हाऊस वर एकटे राहतो वरील आरोपींकडून आमच्या जीवाला धोका असून आम्हाला पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा तसेच आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी महेंद्र सुभेदार यांनी केली आहे
No comments:
Post a Comment