Sunday, 30 March 2025

श्री कांडकरी विकास मंडळाचा शिमगोत्सव-२०२५ मोठ्या उत्साहात साजरा !

श्री कांडकरी विकास मंडळाचा शिमगोत्सव-२०२५ मोठ्या उत्साहात साजरा !

कोकण (शांताराम गुडेकर) :

            श्री कांडकरी विकास मंडळ, कासार कोळवण, ता. संगमेश्वर, जि.रत्नागिरी हे मार्लेश्वर पंचक्रोशीत गेली ३३ वर्षे निरंतर कार्यरत असलेले आणि गावच्या विकासासाठी समाजसेवेचा वसा घेतलेले एक नामांकित मंडळ आहे. शिमगोत्सव म्हणजे कोकणवासीयांसाठी भक्तीची, उत्साहाची, आनंदाची आणि परम सुखाची पर्वणी असते. श्री कांडकरी विकास मंडळाच्या उत्साही आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांच्या उत्साहाला शिमगोत्सवात उधाण येते. याही वर्षीचा श्री कांडकरी विकास मंडळाचा शिमगोत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. गेले सहा महिने कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फलद्रूप झाली.अत्यंत विलोभनीय आकर्षक विद्युत रोषणाईत न्हावून निघालेले मनोहारी श्री कांडकरी देवाचे मंदिर आणि रंगीबेरंगी पडद्यांच्या सजावटीच्या झगमगाटाने सजलेला परिसर हे वाडीच्या शिमगोत्सवाचे मुख्य केंद्र होते.

             श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित तीन दिवशीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन अप्रतिम होते. गुरूवार, दिनांक २० मार्च रोजी सायं. ४ ते ६ स्थानिक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन, सायं. ७ ते रात्रौ ९ पुरुषांच्या विविध स्पर्धा पार पडल्या. शुक्रवार, दिनांक २१ मार्च रोजी सायं. ४ ते ६ उर्वरित क्रिकेट स्पर्धा आणि संध्या. ७ ते ९ महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. शनिवार दिनांक २२ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत श्री कांडकरी मंदिरात श्री सत्यनारायण महापूजा मोठ्या भक्तीभावाने साम्रसंगीत संपन्न झाली. दुपारी १ ते ३ भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेला महाप्रसाद (भंडारा) सर्वांना भावभक्तीची आणि अन्नदानाची महती सांगणारा तसेच एकत्रित  सहभोजनाचा आनंद देणारा ठरला. 
             श्री कांडकरी देव मंदिराच्या मागे वाहणाऱ्या ओढ्यावर बंधारा बांधणे नियोजित आहे. त्या बंधाऱ्याचा भूमीपूजन सोहळा सायं. ४ वाजता आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय शेखरजी निकम सर यांच्या पत्नी आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा, माजी सभापती मान. सौ. पुजा शेखर निकम मॅडम आणि सरपंच सौ. मानसी करंबेळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी गावातील बहुतांश मान्यवर मंडळी उपस्थित होती. 
              दरवर्षी होणारा हळदीकुंकू समारंभ म्हणजे मंडळाचे खास वैशिष्ट्य होय. सायं. ४.३० ते ६ या वेळेत हळदीकुंकू समारंभ पार पडला. वाडीतीलच नव्हे तर गावातील सकल महिला वर्ग तसेच माहेरवाशिणी या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सन्माननीय सौ. पुजा निकम मॅडम आपल्या महिला सहकाऱ्यांसह या हळदीकुंकू समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे या समारंभाला विशेष वलय प्राप्त झाले. मान. सौ. पुजा निकम मॅडमच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी वाटप करण्यात आले. सरपंच सौ. मानसी करंबेळे यांच्या सौजन्याने दहा पैठणी साड्या प्राप्त झाल्या होत्या. या समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रचंड प्रतिसाद मिळाला.सायं. ७ वाजता श्री कांडकरी देव मंदिराच्या प्रांगणात सांबा देव पालखी नाचविण्याचा नयनरम्य सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. श्री सांबा देवाची पालखी नाचवताना चाकरमानी आणि ग्रामस्थ यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. देवाची पालखी नाचवताना पाहणे हे सुद्धा आगळेवेगळे सुख अनुभवायला मिळाले.
           श्री कांडकरी विकास मंडळ आयोजित शिमगोत्सवात यावर्षीही अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी सन्मानाने उपस्थित होती. त्यांनी मंडळाच्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.रात्री ९ वाजता बक्षीस वितरण आणि सत्कार समारंभ गावचे पोलीस पाटील मान. श्री. महेंद्र करंबेळे, सरपंच मान.सौ. मानसी करंबेळे आणि गावचे गावकर मान. नथुराम करंबेळे, वाडी गावकर मान. सूर्यकांत करंबेळे आणि श्री कांडकरी विकास मंडळाचे अध्यक्ष मान.श्री.संतोष करंबेळे तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.रात्री ११ वाजता करबुडे गावचे सुप्रसिध्द आणि गाजलेले अभिनय संपन्न नमन मनोरंजनाचे प्रमुख आकर्षण होते. या ग्रामीण कलेला मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता. विशेषत: गणगौळण, रावणाचे गर्वहरण हा वग वैशिष्ट्यपूर्ण होता आणि शेवटी रावणाबरोबरचे वाडीतील युवकांचे 'अनोखे युद्ध' विशेष गाजले.अशाप्रकारे श्री कांडकरी नगरीत (मावळती वाडीत) श्री कांडकरी देवालयात भक्तीमध्ये रंगलेला आणि ग्रामस्थ-मुंबईकर यांच्या उत्साहाने ओथंबलेला तीन दिवशीय महोत्सव फार सुंदररित्या पार पडला. या तीन दिवशीय महोत्सवात बालकलाकारांपासून महिला वर्गापर्यंत तसेच युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिलांच्या स्पर्धांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. युवकांच्या क्रीडा स्पर्धाही गाजल्या. मोठ्या प्रमाणात साजरा झालेल्या या उत्सवात लहानथोर सगळ्यांनी हातभार लावला. युवकांचे उत्तम पाठबळ लागले तर श्री कांडकरी महिला मंडळाने खूप मेहनत घेतली. श्री कांडकरी विकास मंडळाच्या सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि वाडीतील ग्रामस्थ यांनी मोलाचे योगदान दिल्यामुळे या वर्षीचा शिमगोत्सव अभुतपूर्व यशस्वी झाला.शिमगोत्सवाचे हे मंत्रमुग्ध करणारे दिवस पुढच्या शिमगोत्सवापर्यंत वर्षभर आनंद देत राहतील. श्री कांडकरी विकास मंडळाची देदीप्यमान कामगिरी यापुढे अशीच चालू राहिल अशी ग्वाही मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष करंबेळे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर !

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर ! **तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार पुणे, प्...