कांजुरमार्ग येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा ; पहिल्याच कार्यक्रमास रसिकांचा उस्फूर्त प्रतिसाद !!
मुंबई, (पंकजकुमार पाटील) : मागील वर्षी केंद्र सरकारकडून आपल्या मायमराठी भाषेवर अभिजात भाषेचे शिक्कामोर्तब झाले. याच मराठी भाषेचा जागर करून मराठी साहित्य, संस्कृतीशी संबंधित कार्यक्रम राज्यात साजरे केले जात असतात. दि. २७ फेब्रुवारी रोजी दरवर्षी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
याच दिवसाचे औचित्य साधून विक्रोळी विधानसभा आमदार श्री. सुनिलभाऊ राऊत यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने तसेच कोकण मराठी साहित्य परिषद , भांडूप - मुलुंड शाखा आणि संतोष क्लासचे संस्थापक श्री. संतोष पासलकर सर यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा दिन" रविवार दि. २ मार्च २०२५ रोजी सायं. ५.०० वा. नवमहाराष्ट्र व्यायामशाळा, कांजुरमार्ग (पूर्व) येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रम स्थळी लावण्यात आलेल्या फलकावर मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक, पदाधिकारी तसेच मराठी भाषिक यांनी "मराठीत स्वाक्षरी लेखन" करून या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर प्रमुख मान्यवर यांनी ज्ञानेश्वरी, गाथा व दासबोध हे ग्रंथ हाती घेऊन ते कार्यक्रम स्थळी सन्मानपूर्वक नेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व मराठी ग्रंथांच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर कु. आराध्या धोंडकर हिने शिववंदना म्हणून दाखवली. तर मराठी गौरव गीत-गौरी मयेकर यांनी सुमधुर आवाजात सादर केले.
कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका व महत्व याबाबतचे प्रास्ताविक आनंद गवस यांनी केले. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, मुलुंड शाखा अध्यक्ष प्रकाश गोठणकर यांनी मराठी साहित्य व साहित्यिकांबद्दल कोमसापची भूमिका तसेच या माध्यमातून कोकणातील कवी लेखक यांना उपलब्ध झालेले व्यासपीठ याबद्दल आपले मत व्यक्त केले. कोमसाप चे सभासद होण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
त्यानंतर सहभागी कवी व कवीयत्रींनी आपल्या काव्यरचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. त्यांच्या कवितांना उपस्थित रसिकांनी दाद दिली. यावेळी प्रत्येकास पुष्प गुच्छ व पुस्तक भेट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन कोमसापचे मुलुंड कोषाध्यक्ष श्रीकांत म्हात्रे यांनी केले. दरम्यान रुद्र जाधव व ओम शिंदे या शाळकरी मुलांनी छत्रपती शिवरायांवरील पोवाडा आपल्या खणखणीत आवाजात गाऊन उपस्थितांची वाहवा मिळवली.
प्रमुख वक्ते तसेच ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्राध्यापक श्री. अशोक बागवे सर यांचे व्याख्यान बहारदार झाले. मराठी भाषा गौरव दिवस, मराठी भाषेचे महत्व, मराठी साहित्यिक यांचे योगदान यावर सरांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाष्य केले. मराठी भाषा जशी रांगडी आहे तसेच ती अमृता इतकी गोड सुद्धा आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली हि भाषा अभिजातच होती व आहे.
फक्त तिला केंद्राकडून आता अभिजात भाषेचे प्रमाणपत्र मिळाले आहे असे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. संवाद साधताना, बोलताना क्लिष्ट, अवघड मराठी शब्दांऐवजी साधे सोपे शब्द वापरल्याने मराठी भाषा खुलून दिसते असेही ते यावेळी म्हणाले. सरांनी केलेल्या भाषणास रसिकांनी कधी हसून.. तर कधी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमास मुन्सिपल कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम, मा. विजय भाई तोडणकर,रविंद्र महाडिक, तानाजी मोरे, अनंत पाताडे, श्वेता पावसकर इत्यादी राजकीय नेत्यांसह सरस्वती शाळेचे मुख्याध्यापक पुंडे सर, ॲड. गोरखनाथ सावंत व कवी, साहित्यिक, रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष सर यांनी केले व यापुढे साहित्याशी निगडीत कार्यक्रम कांजुरमध्ये होत राहतील अशी अपेक्षा व्यक्त केली. शेवटी अल्पोहार देऊन व पसायदान म्हणून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली.
No comments:
Post a Comment