Sunday, 13 April 2025

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !!

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !!

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या झळा सहन करत पर्यावरणाच्या गप्पा मारतो. वृक्ष तोड आणि वृक्षांची कमी होणारी संख्या याबाबत तावातावाने चर्चा करतो. लेख लिहितो, वाचतो. परंतु याचे मूळ काय याकडे बहुतेकांचे दुर्लक्षच असते. त्यानंतर

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा (?) करतो.  या दिवशी आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतो.  त्यासाठी विविध कार्यक्रमांचं नियोजन करतो. परंतु पर्यावरण रक्षण ही गोष्ट मूळ कशावर अवलंबून आहे आणि ते टाळता येणे शक्य आहे का याचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा विचारांचा पूर्ण गोंधळ उडालेला असतो. 

आपल्या भारताचाच विचार करू भारताची लोकसंख्या जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तेहेतीस कोटी होती आणि आज ती जवळपास १३३+ कोटी झाली. म्हणजे शंभर कोटीची भर पडली. फक्त सत्तर वर्षात. परंतू आताही भारताची जमीन १९४७ साली जेवढी  होती तेवढीच  आहे. जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी आहे. पण लोक मात्र १०० कोटीने वाढले. या सर्व १०० कोटी लोकांची राहण्या-खाण्याची सोय त्यांना सुख सोयी देण्याची व्यवस्था आपल्याला करणे भाग आहे.  लोकसंख्या तर आपण काही कमी करू शकत नाही. तैहेतीस कोटी लोकांचे ऐवजी १३३ (आता म्हणे १४० कोटीच्या वर झाली) कोटी लोकांची सोय करण्यासाठी तेवढी घरे, रस्ते, तेवढी मार्केट, इतर सुखसोयी एकूण संपूर्ण पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेतच. त्यासाठी आपण उपलब्ध असलेली जमिनच वापरणार.  उपलब्ध असलेला पाणीसाठाच वापरणार. उपलब्ध असलेली खनिजे वापरणार.वगैरे वगैरे.  म्हणजे तेवढ्या संख्येने झाडे कमी होणार, जंगले कमी होणार, पाणीसाठे कमी होणार. एक चादर एका माणसांसाठी वापरायच्या ऐवजी जर चार माणसांसाठी वापरायची ठरवली तर ओढाताण  होणारच. चादर फाटणारच. त्याला पर्याय काय ? सध्या आणखी नवीन नवीन शोध लागत आहेत. नवीन नवीन उत्पादने निर्माण होतायत. त्या सगळ्यासाठी नैसर्गिक शक्तींचा वापर होणारच आहे. तसेच नवीन नवीन औषधांचे शोध लागतात नवीन नवीन आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत गेल्या शंभर वर्षांमध्ये असे म्हटले जाते की माणसाचे वयोमान सरासरी ६० वर्षावरून ८० वर्षापर्यंत जात आहे. बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येची भर सतत पडणारच आहे. त्यासाठी कोणताही उपाय किंवा कोणतीही उपाययोजना माणसांच्यावर लादता येत नाही.  लोकसंख्या वाढ कमी करता येत नाही. त्यासाठी कुणी समाज प्रबोधन करतानाही दिसत नाही. फक्त पर्यावरण रक्षणाचा कंठशोष करून पर्यावरणाचे रक्षण होणे शक्य आहे का ?   

मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे व लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळे त्याबाबत आपण काहीही उपाय योजना करण्यास असमर्थ आहोत. माझ्याच आयुष्याचा प्रवास पाहिला तर ५० वर्षापूर्वी मी पाहिलेली मुंबई आणि पुणे आणि आज मी पहात असलेलं मुंबई व पुणे तसेच पन्नास वर्षांपूर्वीची त्याहीपेक्षा लहान शहरे आणि खेडेगावे सुद्धा. त्याचप्रमाणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावाच्या कमी होत असलेल्या पिकाऊ जमिनी आणि उत्पादन वाढ व माणसांच्या सवयीमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. पर्यावरण रक्षणाचे प्रमाण व प्रयत्न पाहिल्यानंतर फक्त एवढेच जाणवते की आज पासून एक हजार वर्षांनी पृथ्वीचा विनाश होणार असेल तर फक्त तो ५-६ वर्षांनी पुढे ढकलता येईल यापेक्षा त्या प्रयत्नांना फार यश येणार नाही. हे क्षीण प्रयत्न ही सुद्धा चिंतेची बाब आहेच. आपण लोकसंख्येची वाढ कमी करू शकत नाही. प्रदूषणाचे प्रमाण कमी करू शकत नाही. पाण्याचा वापर कमी करू शकत नाही.  माणसांच्या सवयी बदलू शकत नाही. जंगले वाचवू शकत नाही. प्राणीजीवन वाचवू शकत नाही. वनस्पती संवर्धन ज्या प्रमाणात होत आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त वनस्पतींचे नष्टचर्य सुरू आहे. माणसाच्या कोणत्याही सवयींना अमुलाग्र बदलणे हे अशक्य आहे. आपल्याला विकास पाहिजे आणि हा विकास वरील नष्टचर्य चालू ठेवूनच होऊ शकला पाहिजे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यास पर्यावरण नष्ट करून पृथ्वी नष्ट करणे व संपूर्ण मानवजातीचे नष्टचर्य याचा वेळ वाढवणे यावर आपण काहीही करू शकत नाही. 

तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे. याशिवाय आपल्या हातात काय आहे. फक्त आपण मनातल्या मनात म्हणत राहायचे 'बुडते हे जन देखवेना डोळा' !

—-- सुनील देशपांडे ९६५७७०९६४०.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...