Sunday, 13 April 2025

भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चिंतन

असाध्य ते साध्य, करिता सायास ।
कारण अभ्यास ! तुका म्हणे ।। 

**भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चिंतन 

या विश्वगुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ! 

विद्यार्थीदशे पासूनच शिक्षणासाठी किती अभ्यास केला आणि त्या अभ्यासासाठी किती सायास केले हे त्यांच्या चरित्रावरून साऱ्यांनाच माहिती आहे. आपल्याजवळ कोणतीही साधने असोत किंवा नसोत. कोणाचेही पाठबळ असो किंवा नसो. प्रत्यक्ष शिकवणारा असो किंवा नसो. ग्रंथ हेच गुरु मानून आणि अभ्यासाचा प्रचंड सायास करून त्यांनी जे करून दाखवले ते खरोखरच असाध्य होते परंतु ते साध्य करून दाखवले. 
विशेषतः त्यांच्या घटना समितीच्या शब्दांकन विभागाच्या प्रमुख पदाच्या कामगिरीबद्दल हे मोठेपण विशेष करून जाणवते. 

वकील झाल्यानंतर त्यांनी विशेष आवड म्हणून अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करणे हा छंद म्हणून जोपासला होता. त्यामुळे घटना समितीमध्ये त्यांना सामावून घेताना त्यांच्या या अभ्यासाचा मान राखून त्यांना या शब्दांकन उपसमितीचे प्रमुख बनवले. 

तरीसुद्धा त्यांचे खरे मोठेपण पुढेच आहे __

या शब्दांकन उपसमिती मध्ये त्यांचे शिवाय आणखी काही सदस्य होते. परंतु वेगवेगळ्या कारणाने ते सदस्य ही उपसमिती सोडून गेले. शेवटी शब्दांकन समितीचे ते एकमेव सदस्य त्या समितीत शिल्लक राहिले. तरीसुद्धा त्यांनी या समितीमध्ये माझ्या मदतीसाठी आणखी कोणी सदस्य मला द्या. सोडून गेलेल्या सदस्यांबद्दल कोणी पर्यायी सदस्य माझ्या मदतीला हवेत. अशी कोणतीही मागणी न करता. नेटाने एकट्याने रात्रंदिवस खपून आणि अभ्यास करून घटना समितीच्या शब्दांकन उपसमितीची जबाबदारी सर्वोत्कृष्ट पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण केली. हे त्यांचे कार्य हे एकमेवाद्वितीयच आहे. 
आज त्यांच्या जयंतीदिनी या सर्व सायासातून घडलेल्या आणि आपल्या देशाची घटना घडवलेल्या या महान तपस्वी अभ्यास विभूतीला माझा साष्टांग प्रणिपात! 

परंतु या व्यक्तीच्या या सर्व सायासांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे हे मात्र आज कुणाच्याही खिजगणतीतही नाही. 

स्व. भारतरत्न बाबासाहेबांनी राज्यघटनेनुसार आम्हाला एखाद्या न्याय्य मागणीसाठी किंवा हक्कासाठी आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे एवढेच आमच्या लक्षात आहे. परंतु ते आंदोलन करताना त्यातून हिंसात्मक उद्रेक किंवा बेकायदेशीर नुकसानकारक कृत्य किंवा राष्ट्रीय संपत्तीचा नाश करण्याची राष्ट्र विघातक कृती घडू नये यासाठी जे नियम आहेत ते मात्र आम्ही पाळणार नाही. अशा पद्धतीने आम्ही जर वागू लागलो तर त्यात स्व. बाबासाहेबांच्या सायासांचे आम्ही विडंबन करतो आहोत असे नाही का वाटत? 

ज्या जातीअंताची लढाई स्व. बाबासाहेबांनी आरंभली आहे त्या जातींअंताकडे आमचा प्रवास चालू आहे की त्या विरुद्ध दिशेने चालू आहे याचा कोणी विचार करतो आहे का? व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक समतेकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असलेले किती कार्यकर्ते समाजात दिसतात? 

कोणत्याही चांगल्या कृतीमध्ये कालांतराने विकृती घुसत जातात हे जगात सगळीकडेच दिसून येते. परंतु लोकशाही सारख्या चांगल्या विचारांमध्ये घुसलेल्या सामाजिक विकृती विरोधात कार्य करण्यासाठी सायास करणारे व स्व. बाबासाहेब यांच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक राहून कार्य करणारे कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने निर्माण होतील का? या प्रश्नाचिन्हावर भविष्याकडून काही आशादायक घडावे एवढी प्रार्थना करून आज स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!!!

—----- सुनील देशपांडे (९६५७७०९६४०)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...