हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !!
हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर येथे पार पडली. सदर कार्यशाळा 8 आणि 9 एप्रिल 2025 रोजी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) च्या National Alliance of Climate and Ecological Justice (NACEJ) या राष्ट्रीय मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. हवामान संकट आणि त्याचे परिणाम या विषयावरील या कार्यशाळेत NACEJच्या कामात सहभाग देऊ इच्छिणारे महाराष्ट्रभरातील पर्यावरणीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. हवामान बदलाबद्दल कार्यकर्त्यांत जागरुकता निर्माण करणे व या क्षेत्रात काम करण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केलेली होती.
NACEJच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत हवामान संकटात पर्यावरण व सामाजिक न्यायासाठी वैज्ञानिक हस्तक्षेपाची क्षमता कार्यकर्त्यांत निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. हवामान आणि वातावरण या वैज्ञानिक संज्ञाच्या मूलभूत संकल्पनेपासून ते या संज्ञा मोजण्याच्या प्रात्यक्षिकापर्यंत या प्रशिक्षणात समावेश होता. विविध जनआंदोलनात व पर्यावरणीय लढ्यात सामिल असलेले सामाजिक कार्यकर्ते या मूलभूत संकल्पना समजून घेत होते व हवामान बदलातील विविध घटक विविध उपकरणांच्याद्वारा मोजून पहात होते हे या कार्यशाळेचे महत्वाचे वैशिष्ट्य.
दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत गंभीर हवामान स्थिती समजून घेणे, हवा, पाणी, ध्वनी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियेशन, आयोनाइजिंग रेडियेशन इत्यादी संपूर्ण पर्यावरणीय प्रदूषणाचे निरीक्षण व मोजमाप करणे, त्यासाठीचे सरकारी निकष, वापरण्यात येणारी मानकांची माहिती, दस्तऐवजीकरण आणि प्रदूषण स्रोत आणि दायित्व स्थापित करण्यासाठीची पद्धती, वेगाने उदयास येणारे प्रदूषण धोके जसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियेशन प्रदूषण यांची माहिती प्रशिक्षणार्थींना मिळाली. हवामान बदलाच्या संकटाचा परिणाम उपेक्षित समाजाच्या उपजिविकेवर आणि तब्येतीवर कशा प्रकारे होतो आहे याचीही चर्चा झाली. त्याचबरोबर असुरक्षित समुदायांना जोखीम कमी करण्यात आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी तसेच हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साधे सोपे उपाय कसे योजता येतील ह्यासाठी मार्गदर्शन केले गेले. हवामान बदल, पर्यावरण व सामाजिक न्याय याचा परस्पर संबंध या चर्चेतून समजावून देण्यात आला. या विषयातील तज्ञ डॉ. सौम्या दत्ता यांनी या कार्यशाळेत मुख्यत्वे मार्गदर्शन केले.
NACEJ चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संतोष ललवाणी यांनी हवामान बदलाबाबतचा तेरी या संस्थेने बनवलेला *'महाराष्ट्र स्टेट ॲक्शन प्लॅन ऑन क्लाइमेट चेंज'* हा रिपोर्ट संक्षेपात सादर करुन प्रशिक्षणार्थिंना अशा प्रकारच्या अभ्यासाबाबत अवगत केले व NACEJ च्या वतीने गरज असेल तिथे भविष्यात अशा प्रकारचा अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी संशोधक टीम तयार करण्याची गरज अधोरेखीत केली.
कार्यशाळेचा समारोप NACEJ-महाराष्ट्र द्वारे पुढील स्तरावरील राज्यव्यापी कृतींच्या नियोजनाची कालबद्ध आखणी करुन करण्यात आला. हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तळागाळातील उपेक्षित समाजात काम करण्यासाठी व जनआंदोलनांना वैज्ञानिक डेटा पुरवणाऱ्या सजग कार्यकर्त्यांची फळी उभारण्याची गरज प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केली. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील विविध विभागांत आयोजित करण्याचे नियोजनही उपस्थित प्रतिनिधींच्या मदतीने करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुजय मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.
सौजन्य -
NACEJ, महाराष्ट्र
लेखन : सिरत सातपुते
No comments:
Post a Comment