Sunday, 13 July 2025

कामगार हेच माझे दैवत आहे - भूषण पाटील

कामगार हेच माझे दैवत आहे 
    - भूषण पाटील 

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : गेली ३६  वर्षे मी जेएनपीटी मध्ये काम केले, २२ वर्षे मी विश्वस्त म्हणून काम पाहिले. कामगारांमुळेच मला हा बहुमान मिळाला आहे.कामगारांचे माझ्यावर जीवापाड प्रेम व संघटने बद्दलची कामगारांची निष्ठा यामुळेच मी येथे उभा आहे. कॉम्रेड हीच माझी ओळख आहे.मला शेठ म्हणू नका.मला साहेब म्हणू नका. मला कॉम्रेड म्हणा. माझ्यासाठी सर्वात मोठे पद कॉम्रेड आहे. मी अनेक देश विदेशात गेलो तिथल्या अनुभवाच्या, ज्ञानाचा फायदा कामगारांच्या हितासाठी केला. देशभरात फिरून आलो मला प्रवाशासाठी फोरविलर वाहन सुद्धा कामगारांनी घेऊन दिला. त्यामुळे माझ्या जीवणामध्ये व प्रत्येक यशामध्ये सर्वात मोठा वाटा माझ्या कामगारांचा आहे. त्यामुळे कामगार हेच माझे दैवत आहेत. कामगारांना मी कधीच विसरणार नाही. निवृत्तीनंतर सुद्धा शरीरात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी प्रत्येक कार्यक्रमात, संप, आंदोलनात सक्रिय राहीन. गोर गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन असे प्रतिपादन कॉम्रेड भूषण पाटील यांनी उरण येथे केले.

जेएनपीटीचे माजी विश्वस्त, जेएनपीटीचे कर्मचारी कॉम्रेड भूषण पाटील यांच्या ६० व्या वाढदिवसाचे तसेच जेएनपीए सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन बहुउद्देशीय सभागृह जेएनपीए उरण येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कॉ. भूषण पाटील, कुंदा भूषण पाटील, कामगार नेते मनोज यादव, माजी अध्यक्ष किशोर घरत, डेप्युटी जनरल सेक्रेटरी एम एस कोळी, विद्यमान अध्यक्ष  दिनेश घरत, कार्याध्यक्ष गणेश घरत,उपाध्यक्ष जगजीवन भोईर, उपाध्यक्ष नंदू म्हात्रे, राजेश घरत, नामदेव चिमणे, माजी अध्यक्ष एच यु म्हात्रे, माजी अध्यक्ष प्रशांत भगत, माजी उपाध्यक्ष मदन पाटील, युनियन पदाधिकारी संदीप पाटील, हिरामण पाटील, किसन म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना कॉम्रेड भूषण पाटील यांनी जनशक्ती हीच मोठी शक्ती आहे. युनियनला विसरू नका. जनसेवा सेवा हीच ईश्वर सेवा आहे. साधू संतांनी मानवतेची सेवा केली. तशीच सेवा तुम्ही करा. जो समाजासाठी काम करतो समाज त्याला कधीच विसरत नाही. सर्वांनी एकत्र येऊन अन्याया विरुद्ध लढा उभारा. बाळ रडल्याशिवाय आई दूध देत नाही तसेच जोपर्यंत आपण लढत नाही, संघर्ष करत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही असे सांगत संघटनेशी एकनिष्ठ राहत कामगारांना संघटनेला साथ देण्याची विनंती केली. यावेळी विविध कामगार नेत्यांची, मान्यवरांची भाषणे झाली. भाषणात जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. अनेक जण या प्रसंगी भावुक झाले होते. असा नेता पुन्हा होणार नसल्याचे प्रत्येकाच्या भाषणातून भावना व्यक्त झाल्या.जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर, उद्योजक विकास भोईर, भाजपचे नेते पंडित घरत, कामगार नेते रवि घरत, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, रायगड भूषण यशवंत ठाकूर, महिला सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती भोईर आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कॉ. भूषण पाटील यांना भेटून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. न्हावा शेवा बंदर कामगार संघटनेचे युनियन उपाध्यक्ष जगजीवन भोईर यांनी जेएनपीए परिसरात विविध फळांची ६० झाडे व विविध फुलांची २५ झाडे असे एकूण ७५ हुन अधिक झाडे लावली व ती झाडे जगविण्याचा, वाढविण्याचा संकल्प केला. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमातून त्यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचा संदेश सर्वांना दिला आहे. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्हावा शेवा बंदर कामगार संघटना (अंतर्गत)च्या सर्वच आजी माजी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रसिद्ध निवेदक नितेश पंडित यांनी केले. याप्रसंगी आर आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट, न्हावा शेवा बंदर कामगार संघटना अंतर्गत यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जनतेचा, नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. जेएनपीटी चेकर बंधू यांच्या कडुन आदिवासी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले होते. स्नेह भोजनाने कार्यक्रमाचे सांगता झाली.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून जेष्ठ कलावंत साहित्यिक वारकरी दरमहा ५ हजार रूपये मानधन !!

महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून जेष्ठ कलावंत साहित्यिक वारकरी दरमहा ५ हजार रूपये मानधन !! **भारत सरकार मान्यता प्राप्त ; अखिल भारतीय क...