Sunday, 6 July 2025

दाखल्यांच्या विलंबावर संविधान हक्क परिषदेचे आक्रमक पाऊल; तहसीलदारांना निवेदन, दलालांवर कारवाईची मागणी !!

दाखल्यांच्या विलंबावर संविधान हक्क परिषदेचे आक्रमक पाऊल; तहसीलदारांना निवेदन, दलालांवर कारवाईची मागणी !!

महेंद्र उर्फ अण्णा पंडीत / कल्याण :

कल्याण - सध्या शालेय व उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असताना विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, रहिवाशी दाखला यांसारख्या विविध शासकीय दाखल्यांसाठी पालकांची धावपळ सुरू आहे. मार्च महिन्यापासून अनेक पालकांनी कल्याण तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात अर्ज केले असूनही, अनेकांना अद्यापही दाखले मिळालेले नाहीत. या प्रक्रियेत प्रचंड विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, अनेक वेळा कार्यालयाच्या फेऱ्या मारूनही दाखले मिळत नाहीत. विशेष म्हणजे दलालांच्या माध्यमातून हेच दाखले अवघ्या दोन दिवसांत मिळत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

याच पार्श्वभूमीवर संविधान हक्क परिषदेच्या वतीने परिषदेचे महासचिव अनिल अहिरे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार सचिन शेजुळ यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात सेतू कार्यालयातील कर्मचार्‍यांच्या मनमानीवर आळा घालणे, दलालांची भूमिका चौकशी करणे, गरज पडल्यास अतिरिक्त कर्मचारी नेमणे, तसेच दाखल्यांचे वितरण जलदगतीने करण्यात यावे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वर्तनावरही तीव्र आक्षेप नोंदवुन निवेदनात हेही नमूद करण्यात आले की, कल्याण सेतू केंद्रातील कर्मचारी विद्यार्थी व पालकांशी अरेरावीने वागतात. कार्यालयात अर्ज स्वीकारण्याची वेळ दुपारी १.३० वाजेपर्यंत असली तरी वेळेत गेलेल्या गरजवंतांचे अर्ज नाकारले जातात. याउलट ३ जुलै २०२५ रोजी रात्री ७.३० वाजता एका दलालामार्फत अर्ज स्वीकारल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकाराची चौकशी करून संबंधित कर्मचारी व दलालांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिष्टमंडळात ठाणे जिल्हा अपंग सेल अध्यक्ष आनंद गांगुर्डे, परमेश्वर माटे, अमित साळवे, सुमेध भालेराव, हनुमंत केदारे यांचा समावेश होता. निवेदनाची प्रशासनाने गांभीर्याने दखल न घेतल्यास संविधान हक्क परिषद १० जुलै रोजी विधानभवनावर मोर्चा काढेल, असा इशारा महासचिव अनिल अहिरे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

पावसाळी भव्य रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा चेंबूर येथे संपन्न !!

पावसाळी भव्य रबर बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा चेंबूर येथे संपन्न !! ** श्री राजकोजी रेवाळेवाडी, आंगवली झाला विजेता संघ तर मोरया तळेकांटे, क...