गणेशोत्सवापूर्वी रस्ते कायमस्वरूपी खड्डे मुक्त होणार व नाबार्ड चिखले पुलाची उंची वाढवणार !!
मुरबाड ( श्री.मंगल डोंगरे ) : आज मंगळवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी तहसील कार्यालय, मुरबाड येथे मुरबाड -शिरगाव-चिखले व मुरबाड-पवाळे-बोरगाव हे रस्ते तात्काळ कायमस्वरूपी खड्डे मुक्त करण्याविषयी व तालुक्यातील विजेचा लपंडाव थांबवण्यासाठी तहसीलदार श्री अभिजीत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व काँग्रेस तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी सदर बैठकीस ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे, सा. बां. व जि. प. उपअभियंता संजय कोरडे, निवासी नायब तहसीलदार बांगर मॅडम, महावितरणचे अभियंता जाधव, कनिष्ठ अभियंता युवराज यशवंतराव, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, तुकाराम चोरगे, रजाक शेख, नेताजी लाटे आदी मान्यवर उपस्थित होते. चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वाखाली दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी हनुमान मंदिर, शिरगाव ते तहसील कार्यालय मुरबाड पर्यंत शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते व सदरील यात्रेच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने सदरील बैठक लावल्याचे प्रतिपादन तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी केले. सदरील बैठकीमध्ये प्रमुख मागण्या वरींल रस्ते तात्काळ दुरुस्त करुन रूंदीकरण करा आणि चिखले पुलाची उंची- रुंदी वाढवा तसेच महावितरणचा भोंगळ कारभार ह्या मुद्द्यांवर विस्तृत चर्चा झाली.
उपअभियंता संजय कोरडे यांनी शिष्टमंडळाला आश्वासित केले की सदरील दोन्ही रस्ते हे तात्काळ खड्डे मुक्त केले जातील व गणपती उत्सवा अगोदर कायमस्वरूपी खड्डे मुक्त करण्यात येणार तसेच नाबार्ड मध्ये चिखले नवीन पुलाचा व सा. बां. कडून मुरबाड ते चिखले साडेपाच मीटर रुंद सिमेंट काँक्रीट रस्त्याचा डी पी आर तयार करून तात्काळ वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे मत यावेळी सर्वांसमोर केले. विजेच्या लाईन मध्ये येणाऱ्या सर्व अडचणी यापुढील सात दिवसात सोडणार असल्याचे मत श्री जाधव यांनी व्यक्त केले तर २४*७ संपर्क क्रमांक उपलब्ध असल्याचे सांगितले. प्रशासकीय व्यवस्था म्हणून अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून व आढावा घेऊन तालुक्यातील उपेक्षित भागाचा तसेच गरजेच्या समस्यांचे निराकरण लोकप्रतिनिधिंच्या व्यतिरिक्त करणे सामान्य नागरिकांना अपेक्षित असल्याचे मत चेतनसिंह पवार यांनी व्यक्त केले आणि वरील विषय मुदतीमध्ये पुर्ण करा अशी सुचना यावेळी दिली.
No comments:
Post a Comment