मुरबाड पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याचा आकस्मित मृत्यु ?
** अतिरिक्त वाढत्या कामामुळे अपुऱ्या कर्मचारी वर्गाचा प्रशासनाला फटका
मुरबाड :- { मंगल डोंगरे } : मुरबाड पंचायत समिती मध्ये अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यावर विविध कामांची जबाबदारी पडत असल्याने गुरुवारी शिक्षण विभागात कार्यरत असणारे संजय यशवंतराव वय ५२ वर्षे, या कर्मचाऱ्याचा आकस्मित मृत्यु झाल्याने कर्मचारी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. तर या घटनेमुळे गटविकास अधिकारी यांनी पंचायत समिती कडे पाठ फिरवली असुन पंचायत समितीच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .
मुरबाड पंचायत समितीच्या अंतर्गत, तालुक्यातील २०६ गावातील ३२९ शाळा, तसेच ७ प्राथमिक आरोग्य केंद्रे.आणि १२५ ग्रामपंचायतीचा कारभार हाताळण्यासाठी प्रत्येक शिक्षक, केंद्र प्रमुख, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी तसेच प्रत्येक विभागात पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यावर गटविकास अधिकारी यांनी सुमारे दहा ते पंधरा टेबलची जबाबदारी टाकली असल्याने अधिकाऱ्यांनी दिलेले काम हे वेळेत पूर्ण झाले नाही तर, कामात कसुर केल्याचा ठपका ठेवत त्याची पगारवाढ रोखली जाते. शिवाय त्यांचे सेवा पुस्तकात तशा नोंदी केल्या जातात. त्यामुळे भविष्यातील अडचणींना सामोरे जाण्यापेक्षा नेमुन दिलेले काम मजबुरीने करावे लागते. हि कामे करत असताना कार्यालयीन वेळ, जेवणाची वेळ, तसेच साप्ताहिक सुट्यां मध्ये देखील कार्यालयात उपस्थित रहावे लागते. काही कर्मचारी हे टाळण्यासाठी विना परवानगी रजेवर गेल्याने दोन जणांचे निलंबन झाले आहे. अशा वातावरणात कर्मचाऱ्यांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. तर दिवसेंदिवस त्यांचे शारिरीक परिणाम जाणवू लागतात.अशा परिस्थितीत किरकोळ आजारांवर सुरू असलेली औषधे घेण्यास देखील वेळ मिळत नसल्यामुळे गुरुवारी संजय यशवंतराव या कर्मचाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो हाॅस्पिटल मध्ये गेला. तेथील डॉक्टरांनी त्यांचेवर तातडीने उपचार सुरू केले. परंतु यशवंतराव यांनी उपचाराला साथ न दिल्याने मृत्युला कवटाळले. या घटनेमुळे तरी मुरबाड पंचायत समिती मध्ये असणारी रिक्त पदे भरली जातील की, यशवंतराव यांच्या सारखा इतर कर्मचाऱ्यांचाही बळी घेतला जाईल अशी संतप्त भावना कर्मचारी वर्गाने यशवंतराव यांना श्रध्दांजली वाहताना व्यक्त केली.
No comments:
Post a Comment