संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये चार समित्यांची संयुक्त बैठक यशस्वीरीत्या पार पडली !!
कुर्ला पश्चिम (प्रतिनिधी) – संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम येथे दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी शालेय व्यवस्थापन समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती, भौतिक सुविधा विकसन समिती व महिला तक्रार निवारण समिती यांची संयुक्त बैठक मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.
या बैठकीस शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. हेमा विनायक पवार, उपाध्यक्षा सौ. सुशीला सावंत, शिवसेनेच्या कार्यकर्त्या सौ. कविता गोठणकर, डॉ. अंजली तळवलकर, विनोबा भावे पोलीस स्टेशनच्या पोलीस प्रतिनिधी पूजा सावंत मॅडम आणि मासूम संस्थेच्या प्रोजेक्ट मॅनेजर निकिता पोळ मॅडम यांची उपस्थिती लाभली. तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने या बैठकीस हजर होता.
शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार समित्यांची स्थापना करण्यात आली. सर्व उपस्थित सदस्यांनी एकमताने बैठकीस अनुमोदन दिले असून, या समित्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे. समित्यांच्या स्थापनेत सखी सावित्री आणि महिला तक्रार निवारण समितीचाही समावेश करण्यात आला असून, पोलीस प्रतिनिधी श्रीमती पूजा सावंत मॅडम यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेबाबत अत्यंत आवश्यक व उपयुक्त मार्गदर्शन केले.
तसेच, डॉ. अंजली तलवलकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्यासाठी उपाय व मार्गदर्शन दिले. आगामी काळात आरोग्य शिबिराचे आयोजन शाळेत करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात उपाययोजना करण्याबाबतचे महत्वाचे मुद्दे समितीकडे मांडण्यात आले.
समितीच्या अध्यक्षा सौ. पवार यांनी “शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी नेहमीच सहकार्य करू,” असे सांगून शाळेसाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली. बैठकीचे सूत्रसंचालन श्री. समाधान खैरनार (शिक्षक) यांनी केले तर सर्व बैठकीचे पदसिद्ध सचिव म्हणून रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री. विश्वनाथ शांताराम राऊत यांनी काम पाहिले.
मासूम संस्थेच्या प्रतिनिधी सौ. निकिता पोळ यांनी आपल्या संस्थेच्या शाळेसाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांच्या विकासात संस्थेचे योगदान अधोरेखित केले.
विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे अध्यक्ष मा. नगरसेवक श्री. संजय तुर्डे साहेब काही अपरिहार्य कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी संदेश पाठवून शाळेसाठी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीमुळे शाळेच्या विविध समित्यांचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवले जाणार असून, शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
No comments:
Post a Comment