चिरनेर- रांजणपाडा येथे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा देखावा पहाण्यासाठी भक्तांची रीघ !!
उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील चिरनेर - रांजणपाडा येथे निर्मिती करण्यात आलेल्या शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाने नवरात्र उत्सवाची ३६ वर्षापूर्वी मुहूर्तमेढ रोवली आहे. मातृभूमी जगतमाता जगदंबा ही भारतीय संस्कृतीची श्रीमंती आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, महागडची रेणुका देवी, वणीची सप्तशृंगी देवी अशी साडेतीन शक्तीपीठे महाराष्ट्रात आहेत. या महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठातील मातृभूमी जगतमाता जगदंबांचे एकत्रितपणे दर्शन व्हावे, त्याचबरोबर या साडेतीन शक्तीपीठांच्या महिम्याचा अनुभव येथील भक्तांना यावा, यासाठी चिरनेर - रांजणपाडा येथील शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने या साडेतीन शक्तीपिठातील आदिमाया शक्तींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.भक्तांना भुरळ घालणाऱ्या देवीच्या मंदिराच्या देखाव्यातून चार वेगवेगळ्या गाभाऱ्याच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
त्याच्यात मन प्रसन्न करणाऱ्या आणि प्रत्येक भक्ताला भावणाऱ्या महाराष्ट्राच्या कुलस्वामी, आदिशक्तीच्या रूपांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. या महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील कुलस्वामींचे दर्शन घेण्यासाठी उरण तालुक्यातील नव्हे तर पनवेल, नवी मुंबई, ठाणे, मुंबई येथील देवीच्या भक्तगणांची रीघ लागली आहे. चिरनेर येथील शिल्पप्रसाद कला केंद्राचे शिल्पकार प्रसाद गजानन चौलकर व त्यांचे पिताश्री ७३ वर्षीय जेष्ठ मूर्तिकार गजानन शांताराम चौलकर यांनी या आदिमातांच्या मूर्ती अगदी हुबेहूब साकारल्या आहेत.गव्हाण, उलवे नोड येथील श्री समर्थ आर्ट्स डेकोरेशनचे सजावटकार वैभव कोळी व चंद्रशेखर बनसोड यांनी देखाव्यातून आदिशक्तींच्या मंदिराची प्रतिकृती मोठ्या कलात्मकतेने साकारली आहे. विद्युत रोषणाईची व्यवस्था महागणपती डेकोरेशनचे सचिन घबाडी यांनी केली आहे.
या मंडळाच्या कार्यकर्त्यांची आदिशक्ती जगतमाता जगदंबेवर अपार श्रद्धा आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना देवीच्या श्रद्धेची मोट्ठी अनुभूती येत असल्याचे सांगण्यात येत आहे.भक्तांच्या हाकेला धावणारी, मनोकामना पूर्णतःवास नेणारी हि दुर्गामाता असल्याची त्यांची श्रद्धा सांगत असली, तरी त्यांना देवीच्या भक्तीचा अनुभव येत आहे. म्हणून या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता अगदी नऊ दिवस देवीची मनोभावे सेवा करत असल्याची माहिती, या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. नवरात्र उत्सवात देवीचा होम हवन, देवीचा जागर गोंधळ, दुर्गा मातेची महाआरती, महाप्रसाद आणि भंडाऱ्याची उधळण व भव्य मिरवणूक असे धार्मिक कार्यक्रम मंडळाकडून मोठ्या भक्तीभावाने केले जातात. मंडळाच्या पुरुष कार्यकर्त्यांबरोबर महिला कार्यकर्त्या देखील देवीच्या नवरात्र उत्सवात मोठे परिश्रम घेत आहेत.
उरण तालुक्यातील चिरनेर गावात शिवसेना प्रणित सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने साजरा होणारा हा नवरात्र उत्सव तालुक्यातील नव्हे तर मुंबईतील देखील भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. चिरनेर गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत आहेत. परिसरातील हे सर्व लोक एकत्र येऊन या उत्सवाच्या माध्यमातून, येथील नागरिकांमध्ये सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करण्याचे काम करत आहेत. दरवर्षी देखाव्यातून भक्तीचा व समाज प्रबोधनाचा वारसा जपण्यात हे मंडळ अग्रेसर आहे. सलग ३६ वर्ष समाज प्रबोधनाचा वारसा सुरू आहे. यातून सामाजिक ऐक्य वाढविण्यात यश आले आहे. चिरनेर रांजणपाडा ही कष्टकरी नागरिकांची वसाहत असून, या परिसरात मंडळाकडून समाज प्रबोधनावरअधिक भर दिला जात आहे. यातून मंडळाचे स्त्री पुरुष कार्यकर्ते जनजागृती करत आहेत.यामध्ये मंडळाच्या सर्वच स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे.
No comments:
Post a Comment