महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि पोलंड–इंडिया चेंबर ऑफ कोऑपरेशन (PICC) मध्ये सामंजस्य करार ...
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर आणि पोलंड–इंडिया चेंबर ऑफ कोऑपरेशन (PICC) मध्ये व्यापार,उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योगाचा विकास, माहितीची देवाण घेवाण, गुंतवणूक आणि सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे व पोलंड–इंडिया चेंबर ऑफ कोऑपरेशनच्या अध्यक्षा सुश्री क्रिस्टिना व्रोब्लेव्स्का यांनी सामंजस्य करारावर सहया केल्या. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी महाराष्ट्रातील उद्योगांना युरोपियन बाजारपेठेत प्रवेश सुलभ होणार असून नवीन गुंतवणुकीच्या संधी निर्माण होतील. दोन्ही देशांदरम्यान व्यापार उद्योग करण्यासाठी, व्यवसायाशी संबंधित प्रश्न, अडचणी सोडविण्यासाठी दोन्ही चेंबरच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय आणि पोलंडमधील औद्योगिक क्षेत्र यांच्यात थेट संवाद वाढवून सहकार्याची नवीन दालने उघडण्यासाठी व भारत–पोलंड व्यापारी संबंधांना नवीन दिशा देण्यासाठी हा करार महत्वपूर्ण असल्याचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष रवींद्र माणगावे, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, मानसी खानोलकर, पोलंड–इंडिया चेंबर ऑफ कोऑपरेशनच्या अध्यक्षा क्रिस्टिना व्रोब्लेव्स्का, उपाध्यक्ष व्हिन्सेंट पीटर उपस्थित होते.
मंगळवार,दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (MACCIA) च्या मुख्य कार्यालयात दुपारी 3 वाजता भारत–पोलंड व्यापारी संबंधांना नवीन दिशा देण्यासाठी बैठक संपन्न झाली. त्याप्रसंगी सामंजस्य करार करण्यात आला.
पोलंड–इंडिया चेंबर ऑफ कोऑपरेशनच्या अध्यक्षा क्रिस्टिना व्रोब्लेव्स्का आणि उपाध्यक्ष व्हिन्सेंट पीटर यांनी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी चर्चा करून भारतीय बाजारपेठेतील संधींचा आढावा घेतला. महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी उद्योग आणि पोलंडमधील व्यापार उद्योग परस्पर संबंध वाढविणे, सहकार्य करण्यावर भर देण्यात येईल असे अध्यक्षा क्रिस्टिना व्रोब्लेव्स्का यांनी सांगितले. तसेच बैठकीत निर्यात वाढीसाठी लागणारी प्रमाणपत्रे, युरोपियन बाजारपेठेतील नियम, गुंतवणूक आणि संयुक्त उपक्रमांची संधी, तंत्रज्ञान हस्तांतरण, स्टार्टअप्ससाठी सहकार्य, औद्योगिक भागीदारी, रोजगार निर्मिती, तसेच युरोपला निर्यात करताना भेडसावणाऱ्या लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन समस्यांवर उपाययोजना अशा महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली.
याप्रसंगी राज्य समन्वयक वेदांशू पाटील, कार्यकारीणी सदस्य दिपाली चांडक, रेखा पागधरे, सरकार्यवाह सुरेश घोरपडे आदींसह उद्योजक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* फोटो कॅप्शन - सामंजस्य कराराप्रसंगी अध्यक्ष रवींद्र माणगावे, विश्वस्त मंडळाचे चेअरमन आशिष पेडणेकर माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब, मानसी खानोलकर, पोलंड–इंडिया चेंबर ऑफ कोऑपरेशनच्या अध्यक्षा क्रिस्टिना व्रोब्लेव्स्का, उपाध्यक्ष व्हिन्सेंट पीटर*
सौजन्य - राहुल बैसाणे (पत्रकार)
No comments:
Post a Comment