पडघा बस स्टँडजवळील सार्वजनिक मुतारीची दयनीय अवस्था !!
** नागरिकांत संताप; अस्वच्छता, दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात
ठाणे प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) :
भिवंडी तालुक्यातील पडघा बस स्टँडलगत असलेल्या पुरुषांच्या सार्वजनिक मुतारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. वाढत्या नागरीकरणामुळे पडघा परिसरात नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी अत्यावश्यक सुविधा मात्र पूर्णपणे जोपासल्या जात नसल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. ही मुतारी पडघा बाजारपेठेतील एकमेव सार्वजनिक मुतारी असल्याने दररोज प्रवासी, स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुकानदार यांच्यासह शेकडो लोक ती वापरतात. मात्र मुतारीची मोडकळीस आलेली अवस्था, दरवाजे नसणे, चारही बाजूंना पसरलेला कचरा, अस्वच्छता आणि सतत जाणवणारी तीव्र दुर्गंधी यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अनेकांनी पडघा ग्रामपंचायतीला वारंवार तक्रारी केल्या असूनही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. “मुतारीत शिरायलाही धाडस होत नाही, प्रवासी तर आत जातानाच माघारी फिरतात,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून मिळत आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
पडघा सारख्या महत्त्वाच्या व्यापारी व वाहतूक केंद्रात अशी दुरावस्था राहणे ही गंभीर बाब असल्याने ग्रामपंचायतीकडून तात्काळ कारवाईची नागरिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया -
मुतारी ग्रामपंचायत वेळोवेळी स्वच्छ करते. स्वतंत्र कर्मचारी नसल्यामुळे अडचणी येतात; मात्र आता आठवड्यातून दोनदा साफसफाईसाठी व्यक्ती नेमली आहे. नागरिकांनीही पाण्याच्या बाटल्या तिथे टाकू नयेत. उद्या मुतारीची साफसफाई करण्यात येईल.
-पडघा ग्रामपंचायत अधिकारी, भास्कर घुडे
सध्या मुतारीची अवस्था अत्यंत दयनीय आहे. ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना यातून सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू शकते, त्यामुळे ग्रामपंचायतीने नियमित साफसफाई करून या समस्येकडे तातडीने लक्ष दिले पाहिजे.
-सामाजिक कार्यकर्ते, अशोक शेरेकर
No comments:
Post a Comment